शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (17:36 IST)

न्यूमोनिया म्हणजे काय? तो कशामुळे होतो आणि त्यावर उपचार काय?

Pneumonia virus
'न्यूमोनिया' म्हणजे फुफ्फुसात विषाणू किंवा बॅक्टेरिया (जीवाणू) किंवा बुरशीमुळे झालेला संसर्ग. बोलीभाषेत याला फुफ्फुसात पाणी होणं असंही म्हटलं जातं. न्यूमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार आहे. 
 
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही 'न्यूमोनिया'चा त्रास होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2019 मध्ये जगभरात 5 वर्षाखालील 7 लाख 40 हजार मुलांचा 'न्यूमोनिया'मुळे मृत्यू झाला होता.    
 
कोव्हिड-19 विषाणू संसर्गामुळे कोरोनाकाळात लाखो रुग्णांना 'कोव्हिड-न्यूमोनिया'चा त्रास झाला. यामुळे काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.   
 
12 नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक न्यूमोनिया दिन' म्हणून साजरा केला जातो. न्यूमोनिया म्हणजे काय? कसा होतो आणि यावर उपचार काय? तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
 
न्यूमोनिया म्हणजे काय? 
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 'न्यूमोनिया' हा श्वसनमार्गाचा आजार आहे. विषाणू, जीवाणू (Bacteria) किंवा बुरशी संसर्गामुळे (fungi) फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो. न्यूमोनियाचा संसर्ग सौम्य किंवा काही प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरतो. 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'न्यूमोनिया'मध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज यते. फुफ्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या-छोट्या पिशव्या (Air sacs) असतात. यांना 'अल्वेओली' असं म्हटलं जातं. यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. 
 
'अल्वेओली'चं कार्य शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत फुफ्फुसातील या पिशव्या आणि रक्त यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईडची देवाण-घेवाण होते. 'अल्वेओली'मधून पास झालेला ऑक्सिजन शरीरातील सर्व पेशींपर्यंत पाठवला जातो.       
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, न्यूमोनियात जंतूसंसर्गामुळे 'अल्वेओली'मध्ये पाणी किंवा पू साठून त्याचं कार्य मंदावतं. श्वासोच्छवास करण्यासाठी खूप त्रास होतो. या पिशव्यांमध्ये पाणी साचल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.  
 
न्यूमोनियाची लक्षणे काय?  
'न्यूमोनिया' हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होण्याची शक्यता असते.
 
न्यूमोनियाची लक्षणे -
 
श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणं.
जोरजोरात आणि कमी श्वास घेणं 
हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढणं
ताप अंगात थंडी भरणं आणि खूप घाम येणं 
कफ, छातीत दुखणं, नॉशिया, उलट्या होणं किंवा डायरिया 

तज्ज्ञ सांगतात, न्यूमोनियाची लक्षणे तात्काळ ओळखणं उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. सलिल बेंद्रे सांगतात, "प्रत्येक प्रकारचा न्यूमोनिया जीवघेणा नसतो. पण, याचं निदान योग्यवेळी आणि उपचार तात्काळ सुरू होणं अत्यंत महत्त्वाचं आहे."
 
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जिवाणू आणि विषाणूंमुळे झालेला न्यूमोनियाचा संसर्ग सारखाच दिसतो. पण याची लक्षणे वेगळी असतात. विषाणूंमुळे झालेल्या संसर्गात जास्त लक्षणं दिसून येतात. 
 
डॉ. बेंद्रे पुढे म्हणतात, "न्यूमोनिया झालेल्या रुग्णांमध्ये पांढरा, हिरवा किंवा लाल रंगाचा कफ, ताप, अंगात थंडी भरणं आणि श्वास घेण्यास अडथळा ही लक्षणं समान्यत: आढळून येतात."   
 
न्यूमोनिया कशामुळे होतो? 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, जीवाणू (Bacteria) आणि विषाणूंमुळे (Virus) प्रामुख्याने न्यूमोनिया होतो. 
 
बॅक्टेरिअल न्यूमोनिया 
बॅक्टेरिया म्हणजे जिवाणू न्यूमोनियाचं प्रमुख कारण आहे. यामुळे लोकांमध्ये संसर्ग पसरतो. न्यूमोनिया ग्रस्त 50 टक्के प्रकरणांमध्ये 'स्ट्रेप्टोकोकस' न्यूमोनिया हा सामान्यत: आढळून येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लहान मुलांमध्ये जिवाणूमुळे होणारा आजार या प्रकारचा असतो.
 
हिमोफिलिअस न्यूमोनिया, क्लॅमिडोफिला न्यूमोनिया आणि मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया याचे इतर काही प्रकार आहेत. 
 
विषाणूमुळे होणारा न्यूमोनिया 
पॅरा इन्फ्लूएन्झा, इन्फ्लूएन्झा विषाणू, कोरोनाव्हायरस आणि रायनोव्हायरस (rhinovirus) यामुळे देखील न्यूमोनियाचा संसर्ग होण्याची शक्यता असेत. कोव्हिड-19 विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करत असल्यामुळे कोरोनासंसर्ग झालेल्या अनेक रुग्णांना न्यूमोनियाचा त्रास झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. 
 
विविध प्रकारच्या बुरशीमुळे देखील न्यूमोनियाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. व्होकार्ट रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसीनतज्ज्ञ डॉ. हनी सावला सांगतात, "लहान मुलं आणि 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार गंभीर असण्याची शक्यता असते."
 
लहान मुलं आणि वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना न्यूमोनियाचा धोका जास्त असतो. या वयोगटात रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचं प्रमाण जास्त आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. 'न्यूमोनिया'चा प्रसार कसा होतो? 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,'न्यूमोनिचा'चा संसर्ग विविध कारणांमुळे पसरण्याची शक्यता असते. 
 
आजार पसरवणारे जिवाणू, विषाणू लहान मुलांच्या नाकात आणि घशात असतात. या जंतूंनी फुफ्फुसात शिरकाव केल्यास, फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो. खोकला किंवा कफ यामुळे देखील हवेच्या माध्यमातून लहान ड्रोपलेट्समधून हे जंतू लोकांमध्ये पसरतात. 
 
अर्भकाचा जन्म होत असताना किंवा जन्मानंतर रक्ताच्या माध्यमातूनही न्यूमोनिया पसरण्याची शक्यता असतेतज्ज्ञांच्या माहितीनुसार, भारतात टीबी (Tuberculosis) न्यूमोनिया संसर्ग होण्याचं एक प्रमुख कारण आहे.  
 
'न्यूमोनिया'चं निदान आणि उपचार
न्यूमोनिया सौम्य किंवा काही रुग्णांमध्ये वाढलेल्या संसर्गामुळे जीवघेणा ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे याचं निदान तात्काळ होणं गरजेचं आहे. 
 
पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना छातीत कफ असेल किंवा श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत असेल तर त्यांच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवरून न्यूमोनियाचं निदान करता येतं. 'न्यूमोनिया'साठी कारणीभूत विषाणू किंवा जंतू संसर्ग झाल्यानंतर काही दिवस ते आठवडे हा संसर्ग शरीरात पसरण्यासाठी लागतो.  
न्यूमोनियाचा आजार जिवाणूंमुळे (बॅक्टेरिया) झाला असेल तर अॅन्टीबायोटिक्स देऊन (प्रतिजैविकं) उपचार केले जातात. सामान्यत: न्यूमोनियाचा संसर्ग औषधांनी बरा होतो. पण, काही गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. तज्ज्ञ म्हणतात, न्यूमोनियाग्रस्त रुग्णांनी जास्तीत जास्त आराम आणि शरीरात पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवलं तर फायदा होतो. 
 
तज्ज्ञ सांगतात, बहुतांस न्यूमोनिया ग्रस्त रुग्णांना लक्षणांवर आधारीत औषधं दिली जातात. आणि त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. पण, रुग्णांनी स्वत:च औषध घेऊ नयेत. 
 
लहान मुलांमध्ये न्यूमोनियाची 5 लक्षणं कशी ओळखावी?  
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2019 मध्ये जगभरात 5 वर्षाखालील 7 लाख 40 हजार मुलांचा 'न्यूमोनिया'मुळे मृत्यू झाला होता. ही टक्केवारी जवळपास 14 टक्के होती.
 
डॉ. जेसल सेठ मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ आहेत. नवजात मुलांमध्ये न्यूमोनियाची पाच लक्षणं कोणती आणि पालकांनी ती कशी ओळखायची याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली.
 
ताप येणं 
लहान मुलांना ताप विविध कारणांमुळे येतो. बऱ्याचवेळा जंतू नष्ट झाले की ताप बरा होतो. ज्यामुळे मुलांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ताप खूप जास्त असेल किंवा औषधांनी बरा होत नसेल, मूल अॅक्टिव्ह नसेल तर तात्काळ त्यांना डॉक्टरांकडे न्यावं. 

जोरजोरात श्वास घेणं 
लहान मुलांचा श्वास घेण्याचा रिदम दिवसातून अनेकवेळा बदलतो. न्यूमोनिया फुफ्फुसांचा आजार आहे. त्यामुळे संसर्ग झाला असेल तर मुलं जोरजोरात श्वास घेण्यास सुरूवात करतात. तर काही मुलांमध्ये श्वास घेताना शिटीसारखा आवाजही येतो. 
 
श्वासोच्छवास उथळ (Shallow) होत जाणं  
न्यूमोनियात फुफ्फुसांमध्ये पाणी साठतं. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. उथळ श्वासोच्छवास लहान मुलांसाठी चांगला नाही. अशा परिस्थितीत मूल खूप शांत असेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या 
 
ओटीपोटाची हालचाल
पालकांनी मुलांच्या ओटीपोटाच्या हालचालीवर लक्ष ठेवावं. जेणेकरून मुलाला श्वास घेण्यास अडचण होतेय किंवा त्रास होतोय का याची माहिती मिळते. मुलांना सर्दी झाली म्हणजे पाठोपाठ न्यूमोनिया होईलच असं नाही. पण, या पाच प्रमुख गोष्टींवर लक्ष ठेवलं तर आपण न्यूमोनियाच्या लक्षणांवर लक्ष ठेऊ शकतो.   
 
तज्ज्ञ म्हणतात, लसीकरणाच्या मदतीने आपण न्यूमोनियावर नियंत्रण करू शकतो. 'नारायणा हेल्थ' रुग्णालयाने यू-ट्यूबवर व्हिडीयोच्या माध्यमातून न्यूमोनियाबाबतजनजागृतीसाठी करण्याचा प्रयत्न केलाय.
 
यात रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय शर्मा सांगतात, "जंतूंपासून होणाऱ्या न्यूमोकोकल न्यूमोनियापासून बचावासाठी न्यूमोकोकल व्हॅक्सीन उपलब्ध आहे. 'फ्लू' विरोधातही लस उपलब्ध आहे. तर लहान मुलांना होणाऱ्या 'हिमोफिलस इन्फंजी' विरोधातही लस असल्यामुळे सुरक्षा मिळते."
 
Published By - Priya Dixit