शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2015 (12:48 IST)

मेंदूतील हिप्पोकॅम्पसचे नैराश्यामुळे आकुंचन

मेंदूतील हिप्पोकॅम्पस (अश्वमीन) भागाचे अनेक वर्ष जुन्या नैराश्यामुळे आकुंचन होण्याची शक्यता असते. मेंदूच्या याच भागात नवीन स्मृती तयार होत असतात, असे नऊ हजार लोकांचा अभ्यास करून सादर केलेल्या जागतिक अहवालात म्हटले आहे.
 
वारंवार नैराश्य असलेल्या लोकांचा हिप्पोकॅम्पस भाग हा निरोगी लोकांपेक्षा लहान असल्याचे दिसून आले आहे. नैराश्यावरचे हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय संशोधन आहे. ज्या लोकांना नैराश्य नसते त्यांच्या मेंदूचे आकारमानही नैराश्य असलेल्यांपेक्षा मोठे असते.
 
त्यामुळे नैराश्याची लक्षणे दिसताच त्यावर उपचार करणे आवश्यक असते. किशोरवयीन मुले व प्रौढांमध्ये नैराश्य मोठय़ा प्रमाणात आढळते. मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे चुंबकीय सस्पंदन पद्धतीने नैराश्याचा विकार असलेल्या 1728 व विकार नसलेल्या 7188 लोकांच्या मेंदूच्या प्रतिमा घेण्यात आल्या होत्या व त्याचे पंधरा माहिती संच करण्यात आले. युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियातील व्यक्तींना त्यात सहभागी केले होते. कमालीचे नैराश्य ही नेहमी आढळणारी बाब आहे व जीवनात सहापैकी एका व्यक्तीला कधी ना कधी नैराश्य घेरत असते. अतिशय गंभीर असा रोग म्हणून त्याकडे पाहता येईल. दु:ख, नैराश्य, संताप यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक मानसिक उलथापालथी होत असतात. ज्या लोकांना नेहमी नैराश्य येते अशा लोकांचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला त्यांचे प्रमाण 65 टक्के होते. वयाच्या 21 व्या वर्षापूर्वी नैराश्य आलेल्या व्यक्तींचा हिप्पोकॅम्पस भाग लहान असतो व त्यांना वारंवार नैराश्य येत असते. ज्या व्यक्तींना प्रथम नैराश्याचा झटका आला होता त्यांच्यात म्हणजे 34 टक्के प्रतिसादकांमध्ये हिप्पोकॅम्पसचा भाग लगेच लहान झालेला नव्हता कारण त्यांचे नैराश्य काही वर्षापूर्वीपासूनचे नव्हते. नैराश्य जसे वर्षानुवर्षे राहते तसे हिप्पोकॅम्पसचा आकार कमी होत जातो. सिडनी विद्यापीठाच्या मेंदू व मन संशोधन संस्थेचे सहायक प्राध्यापक जिम लागोपोलॉस यांनी सांगितले की, मेंदूवर नैराश्याचा होणारा परिणाम यात अभ्यासण्यात आला आहे व त्यात मेंदूच्या रचनेत बदल होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे किशोरवयीन किंवा प्रौढ व्यक्तींना मग ती स्त्री-पुरुष कुणीही असो उपचारांची तातडीने गरज असते, असे मत संस्थेचे सहसंचालक आयन हिकी यांनी मांडले आहे. लागोपोलॉस यांनी सांगितले की, नैराश्यामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पसचा आकार कमी होतो ही गंभीर बाब सामोरी आली असून त्यामुळे या मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मॉलिक्युलर सायकिअँटी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.