सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2016 (11:49 IST)

संसारामधला खमंगपणा...!

लग्नाला बारा वर्ष झाल्यावर
अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं …
 
तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?
तो बावचळला … गोंधळला …
आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं … !
 
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं
हो … तिच्याकडून दिवसातनं
एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि
त्याच्याकडे ही एकदम भारी
भारी उत्तरं तयार असायची …
 
पण मग लग्न झालं …
संसार नावाची प्रश्नपत्रिका
सोडवता सोडवता ही असली
तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली …
 
आणि काल परवा अचानक हा
गुगली पडला …
त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा
ती पोळ्या करत होती ..
 
हातात लाटणं …
समोर तापलेला तवा …
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
 
आणि ‘सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो …’
असं म्हणून तो कामावर सटकला … !
 
तो घरातून बाहेर पडला खरा …
पण घर काही डोक्यातून बाहेर
पडलं नव्हतं .. !
 
अख्खा दिवस शब्दांची
जुळवाजुळव करण्यात गेला …
कठीण असतं हो …
 
नात्याचं गणित एकदा भावनेत
अडकलं की ते
शब्दांतून सोडवणं कठीण
असतं .
 
तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?
मी राजा .. तू माझी राणी वगैरे
काही म्हणावं का …
 
नको .. फार फिल्मी वाटतं ..
तू खूप छान आहेस …
असं म्हणावं … नको …
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची
शक्यता आहे ..
 
समजूतदार सहनशील वगैरे
म्हणावं …
तर ती नक्की म्हणेल …
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस …
 
त्याला काहीच सुचेना …
बायकोला आवडेल असं वागणं
आणि तिला पटेल
असं बोलणं …
 
हे दोन्ही शिकवणारे क्लासेस
असायला हवे …
लाईन लागेल नवर्यांची …
त्याच्या मनात असले भलभलते
 
विचार येत होते ..
सूर्य मावळला …
घरी जायची वेळ झाली ..
 
आपल्याला पाहिल्या पाहिल्या
तिच्या उजव्या डोळ्याची भुवई
वर जाणार …
 
याची त्याला खात्री होती …
घरचा अभ्यास न करता शाळेत
गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा
चेहरा झाला होता …
 
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच
नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं …
 
आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या
भजीचा घमघमाट नाकात शिरला …
मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला … भजी केलीत आईनं …
 
पटकन हातपाय धुवून या …
तो मान डोलावून आत गेला …
आणि पुढच्याच क्षणी टेबलवर
हजर झाला …
 
बायकोनं भज्यांची प्लेट समोर
मांडली …
त्यानं विलक्षण अपराधी चेहर्यानं
तिच्याकडे पाहिलं …
 
तिनं तोंडभर हसून विचारलं ..
काही सुचलं … ?
त्यानं नकारार्थी मान हलवली …
तशी ती पटकन टाळी
वाजवून आनंदानं म्हणाली …
मलाही नाही सुचलं … !
 
तो पुन्हा गोंधळला …
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया … ?
आणि ती बोलतच होती …
काही दिवसांपूर्वी माझ्या एका
मैत्रिणीनं मला विचारलं …
तुला तुझ्या नवर्याबद्दल काय
वाटतं … ?
 
सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना …
मग भीति वाटली …
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की
काय .. ?
 
अपराधी वाटायला लागलं – काय
करावं कळेना …
मला स्वतःविषयी शंका होती
 
पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम
कणभर ही आटलेलं नाही याची
खात्री होती.
 
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला …
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण ‘ऋर्रीश्रीं’ मध्ये आहोत ..
पण नाही … तुलाही उत्तर देता
 
आलं नाही …
म्हणजे आपण आता अशा
वळणावर आहोत …
जिथे फक्त ‘वाटणं’ संपून
‘वाटून घेणं’ सुरु झालंय …
 
आता शब्द सापडत नाहीत …
आणि त्याची गरजही वाटत नाही …
 
कारण आता एकमेकांसमोर
स्वतःला सिध्द करण्याची धडपड
संपलीय ..
 
असं म्हणून तिनं एक कांदा भजी
त्याला भरवली …
 
शपथ सांगतो …
त्याच्या बारा वर्षाच्या
संसारामधला सगळा खमंगपणा
त्या भजीत उतरला होता !!!