शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्ह शायरी
Written By वेबदुनिया|

प्रेम संदेश ऐक सखे...

WD
माझ्या अंतराची हाक फक्त तुला खुणवते आहे. चांगले जीवन जगण्यासाठी लागणारी आचारसंहिता प्रत्येकाच्या मनात डोकावत आहे. खरंच आपले काही चुकले का? हा प्रश्न आज प्रत्येकाला पडलेला आहे. म्हणून सांगतोय गं सखे, तुला जर हा प्रश्न पडला असेल तर तो तुझ्या अंत:करणाच्या खोडरबरने कायमचा खोडून टाक अन् चांगले जीवन जगण्यास शीक. जिथे राहशील तिथे सुखाने राहा! व ज्याचे खाशील त्याच्याशी बेइमानी करू नकोस. त्याला पावलागणिक साथ दे, त्यांचे दु:ख जाणून घे अन् ते हलके करण्याचा मनापासून प्रयत्न कर. मग येणारा प्रत्येक क्षण हा फक्त तुझाच असेल! फक्त तुझाच! येणारा प्रत्येक दिवस तुझे गोडवे गायिल्याशिवाय राहणार नाही. अगं माणसाला कितीही मिळाले तरी त्याची आशा संपत नाही. ती क्षणोक्षणी वाढतच जाते. म्हणून तुला सांगतोय, आहे त्या परिस्थितीत सुख- समाधान मान व आनंदाने आपल्या जोडीदाराला साथ दे.. व आपले जीवन सार्थक कर... माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर अन् जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घे..प्रत्येक क्षणी दुस-यांना आनंद देण्याचा प्रयत्न कर... यातच तुझे हित सामावलेले आहे. तू जिथे राहशील तिथे स्वर्ग निर्माण करशील अशी माझी खात्री आहे.म्हणून तुझ्या प्रत्येक चांगल्या कामाला माझ्या शुभेच्छा! दु:ख न बाळगता, सर्वस्व संपलंय असं न समजता शून्यातून विश्व निर्माण कर आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घे.. जसे फूल असते तसेच तुझे जीवन व्हावे एवढीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. तुला तुझ्या शत्रूंशी लढण्यास ईश्वर सुखकर बळ देवो, अशी मागणी करतो. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर काटे असतात, असे समजून तू वाटचाल करशील आणि प्रत्येक काट्याचे रुपांतर फुलात करशील अशी तुझ्याकडून आशा बाळगतो... आणि माझा हा मित्राकडून ‘प्रेम संदेश’ थांबवतो.

- गोविंद मस्के