Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावण सरी

Updated: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (16:34 IST)
 
नभ मेघांनीं आक्रमिलें,
तारांगण सर्वहि झांकुनि गेले
कड कड कड कड शब्द करोनी
लखलखतां सौदामिनी
जातातचि हे नेत्र दिपोनी
अति विरही जन ते व्याकुळ झाले’
 
नवकवितेच्या आधुनिक काळातले कवी ग्रेस म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने समजून घ्यावेत. बाकी काही असो,
पाऊस कधीचा पडतो,
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली,
दुःखाच्या मंद सुराने
पेटून कशी उजळेना,
ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी,
पाऊस असा कोसळला 
 
किंवा
 
ती गेली तेव्हा रिमझिम,
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता
 
ही ग्रेसगाणी कोणालाही व्याकूळ करतात. आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर जरा ओसरू लागलेला असतो. पण त्यानं निसर्गावर हिरवी पोपटी जादू केलेली असते. श्रावण महिना आणि बालकवींची कविता यांचं युगानुयुगांचं नातं जुळलेलं आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे…
 
बालभारतीच्या पुस्तकात हे गाणं चिरंजीव झालं आहे. प्रत्येक पिढीचं हे गाणं तोंडपाठ आहे. सिनेमा आणि पावसाची गाणी ही तर  एकमेकांच्या हातात हात गुंफूनच येतात. श्रावणाची आठवण निघालीय आणि कविवर्य भा. रा. तांबे आठवत नाहीत, असं होतच नाही. त्यांची

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवे गार शेत हे सुदंर साळीचे
झोके घेती कसे चहुकडे हिरवे गालिचे..’
 
ही कविता ओठ गुणगुणू लागतातच. आभाळ भरून कोसळू लागलं की ग. दि. माडगूळकरांनी `वरदक्षिणा’ सिनेमासाठी लिहिलेलं गाणं 
 
मनात वाजू लागतं.
घन घन माला नभी दाटल्या,
कोसळती धारा
केकारव करी मोर काननी
उभवून उंच पिसारा’

मल्हार रागात बांधलेलं हे गाणं ऐकूनच जणू मेघांमधला पाऊस धरतीवर बरसत असावा. यौवनसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या मुलीनं आधार घ्यावा तो पावसाचाच. आशा भोसलेंनी गायलेल्या

आज कुणीतरी यावे,
ओळखिचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर,
तसे तयाने गावे
 
या गाण्यानं कित्येक नवपरिणीतांना हुरहूर लावली. रानकवी ना. धों. महानोरांनी लिहिलेली पाऊसगाणी तर अजरामर झालीत.`जैत रे जैत’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं
 
नभं उतरू आलं,
चिंब थरथर वलं,
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात’

परदेशस्थ मराठी माणसं हे गाणं आयपॉडवर ऐकत आपलं मराठीपण जागवत असतात. पावसाच्या सोबतीनं ताल धरणारी धम्माल कोळीगीतं तर इतर भाषिकांनाही ताल धरायला लावतायत. कवयित्री शांता शेळकेंनी लिहिलेलं

वादलवारं सुटलं गो,
वाऱ्यानं तुफान उठलं गो
भिरभिर वाऱ्यात,
पावसाच्या माऱ्यात
सजनानं होडीला पान्यात लोटलंय
वादलवारं सुटलं गो…
 
हे गाणं अजूनही कोणालाही रोमांचीत करतं. शांताबाईंच्या सुंदर गीतांना सुधीर फडकेंनी अप्रतिम चाली लावल्या. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनीही नव्याकोऱ्या पध्दतीच्या संगीतरचना करून शांताबाईंची गाणी बसवली. त्यातलं श्रावण महिमा सांगणारं हे गाणं –

ऋतु हिरवा, ऋतु बरवा,
पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर
सरसरतो मधु शिरवा,
ऋतु हिरवा’
 
शांता शेळकेंनी पावसावर प्रेमगीतं लिहिली, कोळीगीतं लिहिली, तशीच बालगीतंही लिहिली. 
असंच एक गोड गाणं त्या काळातल्या बालगायिका सुषमा श्रेष्ठ हिच्या आवाजात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलंय.
 
पाऊस आला, वारा आला,
पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे,
भर भर गारा वेचू’
 
आपल्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी भुरळ घातली. नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची दृष्टीही दिली. त्याचं अरुण दातेंनी गायलेलं,

भेट तुझी माझी स्मरते
अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची
 
हे गाणं पाऊस आला की अजूनही आपोआप ओठांवर येतं. मुंबईतल्या गर्दीत अन् लोकलच्या खडखडाटात कसला आलाय श्रावण, असं तुम्ही म्हणाल. पण पाडगावकर तुमची विकेट घेतील.
 
श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन
अवचित हिरवा मोरपिसारा ..
 
हे अतिव सुंदर गीत त्यांनी याच धावपळीत लोकलमध्ये जाता येता लिहिलंय. कॉलेजवयात आरती प्रभूंचं आकर्षण वाटू लागलं ते त्यांच्या पाऊसगाण्यांमुळं.
ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना’
 
पावसाचा अन् मनभावन श्रावणाचा हा गंध मनात असाच दरवळत राहावा. त्याच्या पोपटी कोवळ्या रुपाचा तजेला तनमनाला उल्हसित करीत राहावा. बस्स!आणखी काय हवं ?

- सोशल मीडिया

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Nag Panchami 2026 Wishes Image नागपचंमी शुभेच्छा इमेज

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

श्रावण शुक्रवार जिवती पूजन विशेष पारंपरिक नैवेद्य पाककृती

कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास खरंच होते नुकसान? जाणून घ्या यामागचं सत्य!

१०वीनंतर करिअरची नवी दिशा! विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील हे टॉप डिप्लोमा कोर्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments