1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (10:00 IST)

शतायुषी

नको गणित हिशोबाचं
बेरीज, वजाबाकी, गुणाकाराच
हिशोब पुरा होण्याआधी
बाकी शून्य राहण्याचं
 
नको गणित वेळेचं
सेकंद, मिनीट, तासाचं
घड्याळाच्या तालावर
नाचून नाचून थकण्याचं
 
नको गणित व्यवहाराचं
भलं-बुरं ठरविण्याचं
नाती-गोती बंधनांत
स्वत:ला जखडण्याचं

नको गणित पैशाचं
लाख-कोटी व्यवहाराचं
मोहाला बळी पाडून
काळीमा फासण्याचं
 
गणित मांडाव सौख्याचं
गणित मांडाव आनंदाचं
गणित मांडाव समाधानाचं
निर्भेळ सुख़ देत देत
शतायुषी करणारं, शतायुषी करणारं
शतायुषी करणारं, शतायुषी करणारं
 
- अर्चना शुक्ल