शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (18:25 IST)

प्रभु! जन्म सफल हा व्हावा

मम जीवनतरु फुलवावा ॥ प्रभु.... ॥
सत्संगतिसलिला देई
सद्विचार रविकर देई
वैराग्य बंधना लावी
हे रोप वाढिला लावा ॥ मम.... ॥
 
तू विकार वादळि पाळी
मोहाचे कृमि तू जाळी
श्रद्धेचे खत तू घाली   
टवटवित हरित शोभावा ॥ मम.... ॥
 
धैर्याचा गाभा भरु दे
प्रेमाचे पल्लव फुटु दे
सत्कर्मसुमांनी नटु दे
सच्छील-सुरभि पसरावा ॥ मम.... ॥
 
गुंगोत भक्तिचे भृंग
नांदोत ज्ञान-विहंग
कूजना करुत नवरंग
शांतिच्या फळी बहरावा ॥ मम.... ॥
 
बंधूंस सावली देवो
बंधूंस सौख्यरस देवो
सेवेत सुकोनी जावो
हा हेतु विमल पुरवावा ॥ मम.... ॥
 
-धुळे तुरुंग, मे १९३२
 
रचनाकार: पांडुरंग सदाशिव साने