सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (11:01 IST)

'गर्ल्स'सोबत आता 'बॉईज'ही थिरकणार !

'आयच्या गावात' म्हणत सर्वांना ठेका धरायला लावल्यानंतर आता 'गर्ल्स' घेऊन येत आहेत 'स्वॅग माझ्या फाट्यावर' हे पार्टी सॉंग. नुकतेच हे गाणे सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. बेधुंद होऊन प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे उत्स्फूर्त गाणे धमाल, मजामस्तीने भरलेले असून या गाण्यातही अंकिता लांडे, केतकी नारायण आणि अन्विता फलटणकरची अनोखी अदा पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त या गाण्यात एक सरप्राईज आहे ते म्हणजे आपले 'बॉईज' अर्थात सुमंत शिंदे, प्रतीक लाडही या गाण्यात तिघींसोबत थिरकताना दिसतील. त्यामुळे या गाण्यात 'बॉईज'आणि 'गर्ल्स'चा जल्लोष पाहायला मिळेल. या गाण्यात आणखी एक धमाका आहे. उत्कृष्ट संगीतासोबतच संगीत दिग्दर्शक स्वप्नील यांच्या नृत्यकौशल्याची झलकही या गाण्याच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. एकदंरच 'हॅपनिंग' असणारे हे गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल.
 
   वरून लिखाते यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून मुग्धा कऱ्हाडे आणि स्वप्नील गोडबोले यांनी या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. तर वरून लिखाते आणि मुग्धा कऱ्हाडेच्या रॅपने गाण्याची रंगत अधिकच वाढली आहे. 'स्वॅग माझ्या फाट्यावर' या जल्लोषमय गाण्याला प्रफुल -स्वप्नील यांचे संगीत लाभले आहे. एव्हरेस्ट एन्टरटेनमेंन्ट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत, कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित या चित्रपटाचे निर्माता नरेन कुमार आहेत. तर विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मुलींच्या रंजक भावविश्वाची सफर घडवणारा हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.