सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (11:44 IST)

भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती

भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.
भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला ।
गेल्या बरोबर पाट बसायला । विनंती करून यशोदेला ।
सर्व मुली गोळा झाल्या । टिपर्‍या मध्ये गुंग झाल्या ।
प्रसाद घेऊन घरी गेल्या ।
 
या गीतांचे गायन भुलाबाई विधिचे वेळी होते. भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो.
 
गणपतीच्या आगमनानंतर भुलजा-भुलाबाई येतात. १६ वर्शाखालील मुली हा भुलाबाई महोत्सव साजरा करतात. हयामध्ये शिव-शक्तीच्या पुजेकरिता म्हणजेच भुलाबाई नऊवारी साडी नेसलेल्या आणि भुलजा धोतर नेसलेला आणि फेटा बांधलेल्या असतो या लोकखेळाचे मूळ कृशी परंपरेतून आलेले आपल्याला दिसते.
 
भुलाबाई हा सृजनाचा विधी असतो. भुलजा-भुलाबाईला पाटावर बसवतात व ज्वारीच्या पाच धांडयाचा मखर त्यांच्या भौवती ठेवतात. त्यांना पिवळे वस्त्र चढवितात. हा कुळाचार आहे. शेजारी अन्नाच्या ढिगार्‍यावर कळस ठेवण्याची पध्दतही काही ठिकाणी आहे.
 
विदर्भातील हा लोककथा-गीत कला प्रकार फार मजेशीर आहे. या उत्सवा मध्ये ज्यांच्या घरी भूलाबाई बसतात त्यांच्या घरी शेजारच्या मुली गोळा होतात. आणि भुलाबाई समोर बसून मजेशीर गाणी म्हणतात. या उत्सवामध्ये ज्यांच्या घरी भुलाबाई बसतात ते घर म्हणजे भुलाबाईच माहेर आणि ज्या मुली गाणी म्हणतात त्या मुलींना जणू काही भुलाबाईने आपल्या सासुरवासाच्या सर्व कथा तेथील त्रास, आनंद सगळा स्वत: प्रत्यक्ष सांगितला आहे. आणि या मुली भुलाबाईच्या प्रतिनिधी म्हणून जणू काही सगळयांना त्या कथा गीतांद्वारे सांगत आहे असे वाटते. या लोककथा-गीत कला प्रकारात कुठल्या ही प्रकारचे वाद्य वाजविले जात नाही, परंतु मुली एकमेकींना दोन हाताची टाळी देऊन ही गाणी म्हणतात. व ती खूपच दूतगतीने म्हटली जातात.
 
कधी-कधी भुलाबाई आपल्या सासरच्या मंडळींना तिला माहेरी जायचे आहे त्यासाठी विनवणी करते. जसे-
 
सासुबाई-सासुबाई मला मूळ आलं
जाऊ द्या मला माहेरा-माहेरा
कारल्याची बी पेर गं सुनबाई
मग जा आपल्या माहेरा-माहेरा
कारल्याची बी पेरली हो सासुबाई
 
भुलाबाईच्या गरीब स्वभावाचा सासू कसा फायदा उचलते हयाचे उदाहरण या गीतातून दिसते. तर हया सगळया त्रासाला कंटाळून जेव्हा भुलाबाई रूसून बसते तर सासरची मंडळी तिला कसे मनवतात ते ही यापुढील गीतातून आपल्याला दिसते.
 
यादवराया राणी रूसून बैसली कैसी
ससुरवास सोसून घरात येईना कैसी
सासु गेली समजावयाला चला चला
सुनबाई आपल्या घराला
पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
पाटल्यांचा जोड नको मला
मी नाही यायची तुम्हच्या घराला
 
या गीतात सासरची मंडळी तिला अनेक प्रकारचे अमिष दाखवून घरी घेऊन जायला आले आहेत. पण ती कोणाच्या विनंतीला मान देत नाही, परंतु शेवटी जेव्हा नवरा समजावतो तेव्हा ती लगेच तयार होते. कारण जेव्हा तिला माहेरी यायच होत. तेव्हा तिला नवराच घेऊन आला होता. आणि दुसरे असे दिसून येते की भुलाबाईला दागिन्यांची ओढ नाही तर प्रेमाची ओढ आहे. नवर्‍याच्या प्रेमासाठी ती सासरवास सहन करायला तयार आहे. भुलाबाई ही सामान्य मुलींच किंवा सासुरवासी मुलींच एक प्रतिक रूप आहे. भुलाबाई लोकगीत-कथा कला प्रकार हा मुलींना सासरी कस वागवावं याची शिकवण देते कारण सासर म्हणजे फक्त एक कुटूंब नाही तर समाज आहे आणि भुलाबाईच्या स्वरूपातील प्रत्येक मुलगी दोन कुटूंबांना एकत्र करून भावी आदर्श समाजाचे सृजन करणारा एक दुवा आहे.
 
बाणाबाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा.
 
भुलाबाईचे गाणे संपले की प्रसाद वाटला जातो, परंतू हा प्रसाद ही गमतीशीर आहे कारण हा प्रसाद नसून हया प्रकाराला खिरापत म्हटले आहे. जे प्रसादा सारखे उघड नसून लपवून ठेवला जातो आणि मुलींनी ते पदार्थ ओळखायचे आणि ओळखला गेला की मग त्या खिरापतचे वाटप होते.
 
पहिली ग भुलाबाई देवा देवा साजे
घातिला मंडपा खेळ खेळ खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वणी वणी अवसानं
अवसनेचं पाणी तस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याने वैरिला भात
जेविला कंथ लोकिला रांध
हनुमंत बाळाचे लांब लांब झोके
भुलाबाई झोके अवस्नर फुगे
भाउ भाउ केकती माया फुले झळकती