रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (11:30 IST)

बालपणीचा काळ सुखाचा

शाळा सुटल्यावर चड्डीवर करदुडा चढवून या असल्या मग्रुर ऊन्हात 
भर बाराच्या ठोक्याला पायात चपल्या नं घालता धूळ ऊडवत चालायचो.
 
चालता चालता त्याच फुफाटयातला बाबळीचा निबरढोक जुन काटा 
काचदिशी पायात मोडून मस्तकात कळ जायची.
 
मोडलेला काटा काढायला काटयाची पांजर शोधत लंगडत भीरी भीरी हिंडायचो.
तिथंच रस्त्याकडेला मांडी घालुन पायाला थुका लावून काटा काढायला घ्यायचो.
 
काढलेला काटा तळहातावर घेवून पापणीचा केस खसकन तोडायचो.
तोडलेला पापणीचा केस काटयाला चिकटवून हळूहळू वर ऊचलायचो..
काटा ऊचलून वर यायचा...भारी वाटायचं
 
तेव्हा पापणीच्या केसानेही वेदना हलकी व्हायची.काटयासारखी...
 
कारण तेव्हा व्यवहाराचा स्पर्श नं झालेली निरागस स्वप्नं होती डोळ्यात..
 
ऊन्ह तेव्हाही होतंच की..
 
आता डोक्याला कॅप, डोळ्यावर गौगल चढवूनही ऊन्ह लागतं.
 
भौतिकाची बाधा झाली की सावलीही सलू लागते.
ऊन्हाची तर गोष्टच वेगळी....
बालपणीचा काळ सुखाचा
रस्त्याने जाताना येणारी माझी शाळा मला विचारते ..._
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना ? 
 
मी उत्तर दिले दप्तर आता खांद्यावर नाही, एवढंच ..!
...बाकी लोकं अजून शिकवून जातात ..!!