सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: रविवार, 20 मार्च 2022 (10:44 IST)

मंगेश पाडगावकर कविता : चिऊताई दार उघड

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
 
वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
 
दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !
 
फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
 
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .
 
कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
 
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
 
दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !
 
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
 
मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
 
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
 
प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
 
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
 
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो
 
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
 
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
 
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
 
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड ! 
 
– मंगेश पाडगावकर