बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By © ऋचा दीपक कर्पे|

नात्याला काही नाव नसावे

© ऋचा दीपक कर्पे

नात्याला काही नाव नसावे
पण हे समजायला तरी कुणी असावे
 
हळव्या मनाच्या वेदना जेंव्हा 
असह्य होवून जातात
आणि विचारांचा नुसता एक 
काहूर माजतो डोक्यात
जेंव्हा खडतर मार्गावर 
कुणाचीच नसते साथ
आणि राब राब राबूनही
रिकामाच राहातो हात...
 
डोक्याला एक खांदा हवा सा वाटतो
करायला सांत्वन..
आणि मनाला हळुवार 
फुंकर घालणारे एक मन...
हाताला हवासा वाटतो एक हात
प्रेमाने हलकेच थोपटून 
देणारा आपुलकीने आधार 
 
डोकं ठेवलेला तो खांदा 
किंवा हातात घेतलेला हात
स्त्री किंवा पुरुष नसतो
तो असतो फक्त एक खांदा
गळणारे अश्रू टिपणारा
त्या हातांना धर्म नसतो 
भाषा अन् वयही नसतं 
तो असतो फक्त एक हात
प्रेमळ स्पर्श मानवतेचा

मग का 
त्या खांद्यावर ठेवलेल्या डोक्याला
अन् हातात घेतलेल्या हाताला
असंख्य प्रश्नार्थक डोळे दिसावे?
नात्याला काही नाव नसावे
 पण 
हे समजायला तरी कुणी असावे...
 
 
© ऋचा दीपक कर्पे