शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (10:41 IST)

आता मी पाहुणी आहे....

मंगळसुत्र आणि जोडवे 
या सगळ्यांमुळे नाही..
तर भरलेल्या बॅगमुळे 
परके वाटते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
आई म्हणते अगं 
हे बॅगमध्ये लगेच भर 
नाहीतर जाताना विसरशील, 
प्रत्येकवेळी काहीना काही विसरते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
माहेरी येण्याआधीच 
परत जाण्याच्या बसचे 
तिकीट बुक असते, 
किती जरी सुट्टी असली 
तरी ती कमीच पडते..
वाळुसारखी माहेरपणाची 
वेळ निसटून जाते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
आता परत कधी येणार ?
हा सगळ्यांचा प्रश्न ऐकून 
वाईट वाटते, 
मन आतल्या आंत रडू लागते.. 
मग जबाबदारीची जाणीव होऊन 
पुन्हा शहण्यासारखे वागते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
माझ्या माहेरच्या खोलीचा 
कोपरा अनं कोपरा 
फक्त माझा आणि 
मी म्हणेल तसा असायचा 
पण आता पंखा आणि 
दिवा लावताना सुद्धा 
बटणाचा गोंधळ उडतो.. 
प्रत्येक क्षण आता 
मी पाहुणी आहे 
हे जाणवुन देतो..
 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
शेवटच्या दिवशी घरातुन निघतांना 
आईच्या डोळ्यात मी बघूच शकत नाही 
कारण तसं केलं तर कधीच
मी जाऊ शकणार नाही..
मग तसंच पाणवलेले डोळे 
आणि गच्च भरलेली  
बसमध्ये बसावे लागते, 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
४ दिवसांची माहेरपणाची सुट्टी 
संपलेली असते..
पाहुणचार घेऊन पाहुण्यासारखे 
आपापल्या घरी जावे लागते..
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..
 
आता मी पाहुणी आहे 
हे प्रत्येक क्षणी जाणवते..         
 
- सोशल मीडिया