सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (20:11 IST)

लग्नानंतर म्हणे अस्स होतं...

लग्नानंतर म्हणे अस्स होतं,
लग्नानंतर म्हणे तस्स होतं,
प्रत्येक जण काहीं न काही म्हणतो,
पण जो भोगतो तोच खरं जाणतो !
राखली जातात का खरंच मन एकमेकांची,
जपणूक होते का हो एक दुसऱ्याच्या भावनांची!
सतत सोबत राहिल्याने चेहेरे दिसू लागतात सारखे!
पण सोबत असले तरी, नसतात का परके!
लोकांना दिसावं म्हणून हसतात कित्ती तरी खोटं,
तुटू नये म्हणून तोलून धरतात खोपट,
असतात असें ही आपल्या अवती भवती,
ओळखायचं कसं, मुखवटे चढवतात न चेहेऱ्यावरती!
घुसमटतात, व्याकुळ होतात पण राहतात सोबत,
खऱ्या लग्नाची मात्र मोजावी लागते किंमत!
....अश्विनी थत्ते