संकर्षण Via स्पृहा : निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग
संकर्षण व्हाया स्पृहा... नावाप्रमाणेच सर्वांचे आवडते आणि लाडके कलाकार संकर्षण कर्हाडे आणि स्पृहा जोशी यांनी गप्पा, किस्से, कविता आणि गाणी या अत्यंत मधुर कार्यक्रमाने इंदूर येथील प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले.
खोल अर्थ असणारी मात्र हलक्या फुलक्या पद्धतीने साजरी होत असलेली कविता मराठी रसिकांच्या पदरात पडली आणि त्यांच्या मनाला भावून गेली. संकर्षण आणि स्पृहा प्रेक्षकांना बालपण, तारुण्य, प्रेम, मैत्री, नाती, जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अशा जिव्हाळ्याच्या प्रवासाला घेऊन गेले. बालगीत ''असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'' असो वा आई आणि माहेरपणाचा विषय असो सर्व वयोगटातील लोक खूप रोमांचित होते. सोप्या भाषेत सुंदर मांडणी केल्यामुळे श्रोता सहज प्रसंगाशी जुळत होते.
इंदूरात सानंद न्यास द्वारे आयोजित फुलोरा या कार्यक्रमात ही मैफिल सजली. मुख्य पाहुणे अभय गीद आणि सुप्रिया गीद यांनी कार्यक्रमास सुरुवात केली आणि सानंद ट्रस्टचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास कुटुंबळे आणि मानद सचिव श्री. जयंत भिसे यांच्याद्वारे अतिथी स्वागत केल्यानंतर संकर्षण आणि स्पृहा यांनी मंचाची जबाबदारी घेतली. काही क्षणातच त्यांनी इंदूर शहरातील मराठी भाषिकांना आपलेसे केले. संकर्षण आपले किस्से सांगत बालपणात घेऊन गेले तर स्पृहाने अभ्यास आणि परीक्षेवर आपल्या आयुष्यातील पहिली कविता ऐकवली.
संकर्षण यांनी प्रसिद्ध मराठी कवि ग. दि. माडगूळकर लिखित कविता ''ओटीत घातली मुलगी'' याची सुंदर प्रस्तुती देऊन प्रेक्षकांना भावूक केले. दोघांनी अडीच तास सर्वांना जणू बांधूनच ठेवले. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसिक आपल्या कुटुंब आणि मित्रांसह उपस्थित होते.