शनिवार, 7 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

आगळिक

सौ. माधुरी अशिरगडे

माधुरी अशिरगडे
WD
खूप वाटायचं तुझी ही
जीवलागण शिळी होऊ नये
कदापि म्हणून...
कारण माझ्या मानसिकतेला
मी चौफेर घायाळ केलं होतं
मुझी जवळिक उदरात बाळगताना
माझ्या जीवनप्रेरणा मला
कदापि नकोयत कालबाह्य
व्हायला...
आणि नको व्हायला त्यांनी
माझ्याशी वैचारिकदृष्ट्या बदफैली
तुला ही आगळिक वाटतेय.
का माझी?
जो सूर मी आपल्या उभय स्नेहगर्भात लावला तो
अनैतिक, बेसूर वाटतोय का तुला ?
तू मला वचन देत आलायस
चेहरयावरील स्मिताच्या सातत्याचे
त्या सातत्याचा ओघ
आता तुला सावरता
येणार नाही
हा जिव्हाळा आता आक्रसून
चालणार नाही
मी काय करू या
शरीरखुणा उजळविणारया दातृत्वाचं
माझी आत्ममग्नता तूच अमर केलीस
आता, आता तर कुठे नवसृजनाचा
जन्मकांड सुरू होतोय
आता तुला काढता पाय
घेता येणार नाही.