हा सूर्य तो नव्हे जो मी मावळताना पाहिला माझ्या गावाच्या माळावर गोदेच्या तीरावर, किंवा तोही नव्हे जो उतरला समुद्राच्या अथांगात कारवार गोव्याच्या बीचवर, नर्मदेच्या घाटावर अनेक डोंगरांवर, अनेक क्षितिजांवर, तो हा नव्हे - हा सूर्य आहे खास राजस्थानी शंभर सरोवरांच्या निळ्या जांभळ्या रुजाम्यावरून चालत आलेला, एकलिंगजीच्या दाराशी विसावलेला दिलवराच्या संगमरमरी स्वप्नात हरवलेला हळदीघाटाच्या पिवळ्या मातीत माखलेला, दुर्गांच्या उध्वस्तातून ओधळलेला हा सूर्य - -केशरी पागोटे किरमिजी फरगोल - होतो आहे अदृश्य - अलगद - वरच्यावर - सोनेरी धुळीच्या कालसागरात या भूमीच्याच इतिहासासारखा.