शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|
Last Modified: सांगली , शनिवार, 18 जून 2011 (12:53 IST)

ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांचे निधन!

आपल्या प्रयोगशील लिखाणाने मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केलेल्या लेखिका कमल देसाई यांचे आज सकाळी नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. मेंदूज्वरामुळे त्या आजारी होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. साहित्य, चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रांतील नव्या पिढीशी त्यांचा सतत संवाद असे. त्यांचा सार्वजनिक वावर शेवटपर्यंत कायम होता. कमलताईंचा जन्म कर्नाटकातील यमकनमर्डी गावात १० नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण धारवाडमध्ये झाले. इंग्रजी भाषा आणि साहित्यावरील अलोट प्रेम होते, तरीही त्यांनी मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एम. ए. केले.

साठ-सत्तरच्या दशकांमध्ये 'सत्यकथा' मासिकामधून पुढे आलेल्या आधुनिक जाणिवेच्या लेखक-लेखिकांमध्ये कमल देसाईंची गणना होते. पॉप्युलर प्रकाशनाने कमलताईंचा 'रंग-१' हा कथासंग्रह १९६२ मध्ये प्रकाशित केला. या कथासंग्रहातील'तिळा बंद'कथेने इतिहास निर्माण केला. आशिया खंडातील स्त्रीवादी साहित्यातून निवडलेली ही कथा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलीनॉय इथे अभ्यासक्रमासाठी लावली. त्यानंतरच्या विविध नियतकालिकांतील त्यांच्या कथा 'रंग २' नावाने प्रसिद्ध झाल्या. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी, 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या.