बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. रक्षाबंधन
Written By वेबदुनिया|

कर्तव्याची जाणीव करून देणारा सण

सौ. भाग्यश्री कुलकर्णी

NDND
रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा हा सण उत्तर-भारतात मोठ्‍या प्रमाणावर साजरा केला जातो. पूर्वी इतिहासात हा सण फक्त राजपूत लोक आणि उत्तर भारतीय प्रदेशात साजरा होत असे. पण हल्ली संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. इतिहासकालीन वाङमयात या बद्दल असे सांगितले जाते की पूर्वी राज्याच्या रक्षणाची जबाबदारी असणार्‍या राजाला म्हणजेच पर्यायाने प्रजेच्या रक्षणासाठी राजाला बद्ध करण्यासाठी त्याच्या हातात पांढरी मोहरी, सोने व तांदुळ यांची पुरचुंडी करून ती हातावर राखी मंत्रांचे उच्चारण करून मग बांधली जात असे. त्या काळी राजा हाच रक्षणकर्त्ता असल्याने त्याच्या रक्षणासाठी हे समंत्रक सुरक्षाकवच रक्षेच्या रूपाने त्याला बांधणे हे त्याच्यावरील प्रेम, आदर, तर व्यक्त करतेच पण त्याला कर्तव्याची जाणीवही करून देते.आज मात्र बहिणीने भावाला स्वत:च्या रक्षणासाठी बांधलेली राखी असा याचा अर्थ मानला जातो.

भारतावर परकीय सत्तांनी विशेषत: मोगलांनी आक्रमण केले त्यावेळी त्यांच्या आक्रमणापासून स्वत:चा व आपल्या राज्यांचा बचाव करण्यासाठी राजपूत स्त्रियांनी आपल्या शेजारच्या राज्यातील राजांना राखी बांधण्यास सुरवात केली.याला उच्च नीचतेची उतरंड नव्हतीच पण जातीभेदाचीही तमा नव्हती. एका हिंदू राणीने आपल्या पतीपश्चात राज्याच्या रक्षणासाठी बाजूच्या मुसलमान राजाची मदत मागण्यासाठी राखीचा नजराणा पाठवला. त्या राजानेही हिंदू परंपरेचा मान ठेवून तिला आपल्या बहिणीचा दर्जा बहाल केला.

हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.

द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.

स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची
NDND
जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.
NDND
तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.)

असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते.


राखीच्या परंपरेचा आधुनिक संदर्भ
1992 मध्ये जगदलपूर (छत्तीसगढ़) येथील आदिवासी व मागास भागातील घनदाट जंगल परिसरातील दुर्मिळ झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर असताना (औद्योगिकीकरण, लघुउद्योग यासाठी) त्यांच्या रक्षणासाठी सुनी‍ती यादव नावाच्या एका गृहिणीने वेगळाच मार्ग शोधला. आजूबाजूच्या अशि‍क्षीत स्त्रियांना धार्मिक गोष्टींच्या सहाय्याने तीने वेगळाच अर्थ शिकवला, ''भावाने आपले रक्षण करावे म्हणून आपण त्याला राखी बांधतो तसेच वृक्षही पर्यावरण शुद्ध राखून एकप्रकारे आपले रक्षणच करतात तेव्हा या पौर्णिमेला 5 वृक्षांना राखी बांधून त्यांची पूजा करू.'' तिच्या या प्रस्तावावर 30-40 बायकांनी नटूनथटून झाडाला राख्या बांधून, हार घालून, फेर धरले. गाणी म्हटली हे पाहून गावकरीही त्यांच्यात सामील झाले आणि ही लोकजागृती आल्यामुळे जमीनदाराने वृक्षतोडीचा विचार रद्द केला.

हेच ते जुन्या धार्मिक कल्पनांना दिलेले आधुनिक रूप याची दखल घेऊन केंद्र सरकारने, वनमंडल हे सर्व राज्यात राखीसूत्राचा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.