शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

ज्ञानदेवें ‍रचिला पाया

प्र. द. सरदेशमुख

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया।।
नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत।।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।
- संत बहिणाबाई

MH GovtMH GOVT
या अभंगात तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील भागवत-धर्ममंदिराचा पाया श्री ज्ञानदेवांनी घातला असे निक्षून सांगितले आहे. श्री ज्ञानदेवांनी घातलेल्या भक्कम पायाच्या आधारावर हे महाराष्ट्र भागवत धर्ममंदिर, ही वारकरी संप्रदायाची इमारत सुदृढ स्थितीत आजही उभी आहे. लक्षावधी प्रेमळ भक्तांच्या भावजीवनाचे ते आजही विश्वसनीय आलंबन आहे. महाराष्ट्रात आजवर अनेक धर्ममार्गांचे प्रवर्तन करण्यात आले. तथापि भक्कम तात्त्विक, नैतिक तसेच वैचारिक अधिष्ठानाच्या अभावी त्यातील काही धर्मपंथांचा र्‍हास झाला, तर कित्येक धर्मपंथांमध्ये अनेक प्रकारच्या अपप्रवृत्तींचा शिरकाव होऊन शेवटीं अनाचार- भ्रष्ट्राचार माजल्याचे दिसून आले.

वारकरी धर्मपंथ मात्र श्री ज्ञानदेवांच्या काळी होता तसाच पवित्र नि तेजसंपन्न आजही आहे. याचे कारण ज्ञानदेवांनी घातलेल्या अतिशय भक्कम व विविधांगी पायांत आहे. आपण जर आस्थेने व श्रद्धेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानदेवांनी घातलेल्या या भक्कम पायाची विविध अंगे आपणांस स्फटिकाप्रमाणे स्वच्छ दिसू शकतात. आपण भागवत धर्ममंदिराच्या किंवा वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवांनी घातलेल्या पायाची विविध अंगे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया -

1. पारमार्थिक पाया :
  गीता सर्वांना - अगदी स्त्री शूद्रांनाही सेव्य असून तिच्यावर सर्वांचा समानतेने अधिकार आहे, म्हणून गीता पवित्र आहे.       
श्रीमत् भगवद्गगीता हा पवित्र ग्रंथ आहे, याबद्दल सर्व गीता भाष्याकारांचें एकमत आहे. लोकमान्य टिळकांनी तर गीतेला सर्व धर्मग्रंथांतील 'सर्वांत निर्मळ हिरा' असे म्हटले आहे. गीता पवित्र का? या प्रश्नाचे उत्तर देताना बहुतेक सर्व गीता-भाष्यकार म्हणतात की, गीता पवित्र आहे कारण ते वेदांचे मूळसूत्र आहे. हे त्यांनाही मान्यच आहे, तथा‍पि गीतेच्या पवित्रपणाबद्दलची ज्ञानदेवांची कारण-मीमांसा ही पारंपारिकांपेक्षा थोडीशी निराळी आहे. श्री ज्ञानदेव म्हणतात की वेद आपल्या ठिकाणी संपन्न - श्रीमंत आहेत, परंतु त्यांच्यासारखा कंजूष विद्या-दाता नाहीं. ते फक्त त्रैवर्णिकांच्याच उपयोगी पडले व स्त्री शूद्रांची त्यांनी उपेक्षा केली. ज्ञानदेव म्हणतात, वेदांना आपल्या पूर्वकाळाच्या व्यंगाची जाणीव झाली वे वेदच गीतेचा अवतार घेऊन प्रकट झाले. गीता सर्वांना - अगदी स्त्री शूद्रांनाही सेव्य असून तिच्यावर सर्वांचा समानतेने अधिकार आहे, म्हणून गीता पवित्र आहे.

पवित्रतेच्या पारंपरिक कल्पनेपेक्षा ज्ञानदेवांची पावित्र्याची कल्पना थोडी निराळी आहे. त्यांच्या मते जे ज्ञान फक्त भाग्यवंत मूठभरांनाच नव्हे, तर सर्वांना समानतेने उपलब्ध असते तेच ज्ञान पवित्र असते कारण ते सर्वांना समानतेने तारक व उद्वारक असते. या विचाराचा पाया श्री ज्ञानदेवांनी घातला. परमार्थ-मार्गाचा, ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाचा अधिकारी कोणी? श्री ज्ञानदेव या प्रश्नाचे मोठे मार्मिक उत्तर देतात, की अर्जुनाच्या पंगतीला बसून परमार्थ श्रवण करण्याची ज्याची पात्रता आहे, असा प्रत्येक जण परमार्थ-मार्गाचा अधिकारी आहे, आपण सर्वच जण अर्जुनाच्या पंगतीला बसू शकणारे आहोत. अर्जुन हा सुमती, सुमन, प्रज्ञावंत होता. त्याशिवाय तो गुरुकृपेने अधिकारी झालेला होता. त्यामुळे त्याला सद्योमुक्ति मिळाली. आपण अगदी निरक्षर, अडाणी असलो, तरीही आपण जर नैष्ठिक साधक असू तर त्याच सायुज्यमुक्तीचे अधिकारी आहोत. फरक इतकाच की अर्जुन एका क्षणांत सायुज्यमुक्तीचा अधिकारी झाला. आपण सामन्यांना तीच मुक्ती क्रमाक्रमाने मिळेल.

  श्रीज्ञानदेव म्हणतात, साधकाने वर्णाश्रमधर्मानुसार त्याच्या वाट्याला आलेल्या नित्य व नैमित्तिक कर्मांचे ईश्वरार्पण बुद्धीने आचरण करून ती चोख म्हणजेच वासनांनी लिप्त न झालेली कर्मे ईश्वर-चरणांवर अर्पण करावीत.      
श्री ज्ञानदेवांचा दृष्टांत देऊन सांगायचे तर पक्षी एका उड्डाणात झाडावरच्या फळाला झोंबतो, मनुष्याला हळूहळू, क्रमाक्रमाने झाड चढून फळापर्यंत पोहोचावे लागते पण अंती तो त्याच फळाप्रत जातो. ज्या क्रमाने सामान्य साधकाला ईश्वररूप होता येते तो क्रम कोणता? ज्ञानदेवांनी ज्या दोन ओव्यांमध्ये हा क्रम सांगितला आहे (ओवी 18- 1247 व 1248) त्यांना ज्ञानेश्वरीचे सार म्हणता येईल, इतक्या महत्त्वाच्या त्या आहेत. श्रीज्ञानदेव म्हणतात, साधकाने वर्णाश्रमधर्मानुसार त्याच्या वाट्याला आलेल्या नित्य व नैमित्तिक कर्मांचे ईश्वरार्पण बुद्धीने आचरण करून ती चोख म्हणजेच वासनांनी लिप्त न झालेली कर्मे ईश्वर-चरणांवर अर्पण करावीत. चोख कर्माचरणाने मन:प्रसाद तसेच चित्तशुद्धि प्राप्त होते. अशा शुद्ध चरितांमध्येच ज्ञानाचा उदय होतो. ज्ञाननिष्ठा दृढ झाली की ब्रह्मस्वरूप करतलामलकवत् स्पष्ट होते. ज्ञान पक्के झाले की साधकाच्या जीवनात ईश्वरभक्ती आनंदाने नाचू लागते - 'तेथ भक्ती माझी उल्लासे' या ईश्वरभक्तीच्या प्रभावाने साधकाला कर्मसाम्यदशेचा अनुभव येऊन तो क्रमयोगी 'सुखिया' म्हणजेच ईश्वराशी एकरूप होतो. आधी कर्म, नंतर ज्ञान व अखेरीस साधकाला ईश्वररूप करून टाकणारी भक्ती हा ज्ञानदेवांनी सांगितलेला क्रमयोग म्हणजेच त्यांनी घातलेला भागवत धर्ममंदिराचा भक्कम पारमार्थिक पाया होय.

2. साहित्यिक सांस्कृतिक पाया :
  'परतत्त्वाचा बोध करणे आणि संसार-दु:ख मूळवणें' हे ज्ञानेश्वरीचे उद्दिष्ट आहे.      
मराठी भाषेतील आद्य साहित्यिक म्हणून ज्ञानदेवांचे स्थान अनन्यसाधारण आहे व ज्ञानेश्वरी हा साहित्यदृष्टया अत्युकृष्ट ग्रंथ आहे, याबद्दल दुमत नाही. तथापि विचारांती असे दिसून येते की, आपल्या परिचयाच्या ललित साहित्यापेक्षा या संत साहित्याची बैठक फार वेगळी आहे. ज्ञानेश्वरीने सार्‍याच संत साहित्याचा पाया घातलेला आहे, असे आपणांस निर्धास्तपणे म्हणता येईल. ज्ञानेश्वरी इतकी सुंदर आहे, की मूळचे गीताशरीर अधिक सुंदर की त्यावर ज्ञानदेवांनी चढविलेला हा भाष्यालंकार अधिक सुंदर असा साधकाला संभ्रम पडतो. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये रसप्रकर्षाची पराकाष्ठा केली आहे. तथापि ही 'कथा' म्हणजे रसविलासाची क्रीडाभूमी नव्हे, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. 'परतत्त्वाचा बोध करणे आणि संसार-दु:ख मूळवणें' हे ज्ञानेश्वरीचे उद्दिष्ट आहे. यावर असा प्रश्न विचारला जाईल की परतत्त्वाच्या निरूपणासाठी ज्ञानदेवांनी उपनिषदांसारखा शास्त्रग्रंथ लिहायचा सोडू न काव्यग्रंथ लिहिण्याचा उद्योग कशासाठी केला? या प्रश्नाला ज्ञानदेवांचे उत्तर (ज्ञा. 3-19, 20, 4-224) मोठे मार्मिक आहे. ते सांगतात -

वेदोपनिषदे क्लिष्ट व दुर्बोध आहेत, त्यामुळे चांगल्या परिणतप्रज्ञ लोकांनाही त्याद्वारे मोक्षफल मिळविणे फार कठिण जाते. या उलट काव्य मनोहर व रसवत्तापूर्ण असल्याने अल्पबुद्धी लोक तेच मोक्षफल काव्याद्वारे विनासायास अल्पावधीमध्ये प्राप्त करू शकतात. अशा स्थितीत कोणता शहाणा मनुष्य वेदोपनिषदांच्या बिकट मार्गाकडे वळेल? तेंव्हा ज्ञानेश्वरीतील सर्व रसप्रकर्ष व सारे कलात्मक सौंदर्य ही मोक्षफल प्राप्त करण्याची 'अतिरुच्य' साधने आहेत. असे असेल तर ज्ञानेश्वरी या कथा-काव्याचा प्रधान रस कोणता? अर्थात् 'शांतरस' हाच तो प्रधान रस होय. अनेकांनीं श्रृंगाररसाला रसांचा राजा मानले आहे. परंतु ज्ञानेश्वरीसारख्या ब्रह्मविद्येचे निरूपण करणार्‍या काव्यात शृंगार रसाचा प्रभाव कसा पडणार? अद्भभुताचा आविश्कारही संयमानेच घडेल आणि इतर रसांनाही प्रसंगोपात्त, प्रतिपादनाच्या ओघाच्या अनुरोधानेच आवाहन करता येईल. परंतु या सर्व कथेचा मूळ रस हा शांतरसच आहे हे निश्चित. शांतरसाचे ज्ञानेश्वरीतील प्राधान्य ज्ञानदेवांनीं अगदी आरंभापासून संधी सांपडेल तिथे स्पष्ट केले आहे. ज्ञानदेव म्हणतात की त्यांच्या 'कथे'त शांतरसालाच अग्रपूजेचा मान आहे. त्यांची ज्ञानेश्वरी शांतरसाने ओथंबलेली आहे आणि विश्वव्यापक शृंगाराची - शृंगारसाची धुंदी उतरविण्याचे विलक्षण सामर्थ्य तिच्या ठायी आहे.

भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रांत आठच रस मानले आहेत. (अष्टौनाट्यरसा:स्मृता:) भरतानंतर आलेल्या साहित्य शास्त्रकारांनी नववा शांतरस मान्य केला. मम्मट आपल्या काव्य प्रकशांत म्हणतात - 'निर्वेद्ये स्थायीभावेसि शांतेसि नवरसा:।' शांत हा नववा रस मानावा व त्याचा स्थायी भाव निर्वेद/शम हा मानावा. निर्वेद किंवा शम म्हणजे वैराग्यपूर्ण अवस्था. अशा विरागावस्थेवर अधिष्ठित असलेला शांतरस हा केवळ ज्ञानेश्वरीचाच नव्हे, तर सार्‍याच संत साहित्याचा पाया आहेत. आणि हा पाया श्री ज्ञानदेवांनी घातला. ज्याच्यावरून बाकीचे आठही रस ओवाळून टाकावेत अशा श्रेष्ठ शांतरसाचे एकछत्री, निष्कंटक राज्य संबंध ज्ञानेश्वरीभर पसरलेले आहे, असे प्रतिपादन करून श्रीज्ञानदेव पुढे म्हणतात की, संत सज्जनांचे विश्रांती -स्थान असलेल्या शांतरसाने निथळणारे अर्थपरिपूर्ण व समुद्राहूनही गंभीर असे माझे मराठी बोल ऐका -

जयाचिया बरवेपणी। कीजे आठा रसांची बोवाळणी।
जो सज्जनाचिये आयणी। विसांवा जगीं।। ज्ञा. 4:212।।
तो शान्तुचि अभिनवेल । ते परियेसा मर्‍हाटे बोल।
जे समुद्राहूनी खोल। अर्थभरित ।। 4:213।

शांतरसाला सर्वश्रेष्ठ मानणे आणि मनुष्यमात्राच्या अंत:करणावर अमर्याद प्रभाव गाजविणार्‍या श्रृंगार रसालाही पराभूत करण्याचे सामर्थ्‍य शांतरसाच्या ठिकाणी आहे असे ठामपणे म्हणणे हे श्रीज्ञानदेवांनी भागवत धर्ममंदिराच्या घातलेल्या मजबूत पायाचे साहित्यिक - सांस्कृतिक स्वरूप आहे.

3. तात्त्विक पाया - विश्वस्वरूपाचे आकलन :
  हे विश्वही तितकेच सत्य आहे हा सिद्धांत प्रस्थापित करून जनमानसावर बिंबविला. हाच तो ज्ञानदेवांचा सुप्रसिद्ध चिद्धिलासवाद होय.       
श्री ज्ञानदेवांची आरती लिहिणारे रामा-जनार्दन ज्ञानदेवांचे कार्य सांगतांना म्हणतात- 'प्रकट गुह्य बोले । विश्व ब्रह्माचि केलें।।' ज्ञानदेवांचे हे कार्य फार थोर आहे. ज्ञानदेवांच्या काळीं 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' या वचनाचा जनमानसावर फार मोठे पगडा होता. या विचारसारणीमुळे एक तर्‍हेची प्रपंच-विन्मुख, समाज-विन्मुख वृत्ति तसेच, संन्यास-धर्माबद्दल एक विचित्र आकर्षण लोकांच्या मनात निर्माण झाले होते. या विकृत आकर्षणाचे वर्णन ज्ञानदेवांनी 'संत ते कोण, संत ते कोण?' या अभंगात केले आहे. ज्ञानदेवांनी संन्यास-धर्म प्रवणतेची ही लाट मोठ्या समर्थपणे परतवून लावली, आणि ब्रह्म जसे सत्य आहे तसेच ब्रह्माचाच विलास असणारे हे जग, हे विश्वही तितकेच सत्य आहे हा सिद्धांत प्रस्थापित करून जनमानसावर बिंबविला. हाच तो ज्ञानदेवांचा सुप्रसिद्ध चिद्धिलासवाद होय.

हा सिद्धांत सांगताना ज्ञानदेवांनी एकाहीपेक्षा एक सरस अशा दृष्टांतांची अक्षरश: बरसात केली आहे. ज्ञानदेव इतर भाष्यकारांप्रमाणे गीतेवर प्रतिपद भाष्य लिहीत नव्हते तर गीतेचा भाव प्रकाशमान् करणारी भावार्थदीपिका लि‍हीत होते. ज्ञानेश्वरीप्रमाणेच अमृतानुभवात व चांगदेव-पासष्टीतही ज्ञानदेवांनी विविध दृष्टांतांद्वारें विश्वाचे, जगताचे सत्यत्व खुलवून सांगितले आहे. सूर्यप्रकाश सूर्याइतकाच सत्य, चंद्रिका चंद्राइतकीच सत्य, दीपप्रभा दीपाइतकीच सत्य, त्याचप्रमाणें ब्रह्मसत्तेचा - चैतन्यसत्तेचा विलास असलेले हे विश्वही ब्रह्माइतकेच सत्य नाही का? चांगदेव पासष्टीत श्रीज्ञानदेव म्हणतात, 'चांगदेवा, अरे अलंकारचे रूप घेतल्याने सोन्याला उणेपणा येतो का? कल्लोकाळाच्या रूपाने प्रकट झाले म्हणून पाण्याचे 'पाणीपण' बाधित होते का? विविध कलांच्या रूपाने एकच चंद्रमा नटलेला असतो ना? तर मग विविधतेने नटलेल्या या विश्वाच्या रूपाने एक विश्वंभरच तुझ्या प्रत्ययाला येतो ना?' असे शेकडो दृष्टांत सांगता येतील.

सगळ्या विश्वांत एका नारायणाच्याच चैतन्यसत्तेचा प्रत्यय येत आहे आणि आपणही त्याच चैतन्यसत्तेचा भाग आहोत, असा मनोमन अनुभव आल्यावर मनुष्याने विश्वाशी व्यवहार तरी कसा करावा, असा अर्जुनाला प्रश्न पडला असता श्रीज्ञानदेव भगवंताच्या मुखाने आपणा सर्व अल्पज्ञ जीवांना सांगतात की सर्वत्र एकाच चैतन्यसत्तेचा मनोमन प्रत्यय आल्यानंतर प्रत्येकाने स्तव:मधील चैतन्याला (ईश्वराला) सेवकाची भूमिका द्यावी व स्त: व्यतिरिक्त इतरत्र भरून राहिलेल्या चैतन्याला (ईश्वराला) सेव्य (स्वामी) समजून त्याची अखंड सेवा करीत रहावे. असे निरिच्छवृत्तीने, सेवाभावाने जीवन व्यतीत करणे हा अध्यात्म जीवनाचा पाया आहे. (ज्ञा. 18/1360) विश्वाचे सत्यस्वरूप आकलन होण्यासाठी 'किंबहुना श्रीनारायणें । विश्व कोंदलें।।' या भावनेमध्ये वृती स्थिर होण्यासाठी अत्यंत उपयुक्तच नव्हे तर आवश्यक असलेला हा अध्यात्म-जीवनाचा पाया श्रीज्ञानदेवांनी घातला.

4. लोक-व्यवहाराचा पाया - दीन दुर्बलांची सेवा :
मनुष्य ब्रह्मज्ञानी झाला, स्थितप्रज्ञ झाला, अन्त:करणात शांत झाला- मग पुढे काय? नुसते समाधी लावून ध्यानस्थ बसायचे? ज्ञानदेवांसारख्या लोकसेवक संतांना ही वृत्ती पसंत पडणे कदापि शक्य नव्हते. लोकनन्द: समाधिसुखम्। अत: लोकनंदकुरू भव।' असा वसिष्ठांचा श्रीरामाला उपदेश आहे. आत्मज्ञान झालेल्या योगी पुरुषाने निष्क्रियपणे समाजात वावरणे योग्य नव्हे. लोक अशा आत्मज्ञानी, योगी पुरुषाच्या, साधकाच्या संगतीत सुखी, आनंदी, चिंतामुक्त होतात की नही हाच त्यांच्या समाधीचा खरा निकष आहे. जोपर्यंत योगी पुरुषाच्या बारीक -सारीक कृतीत लोकांच्या सुखदु:खांचा विचार घेतला जात नाही, तोपर्यंत त्या योग्याची समाधी दृढ नाही, निर्मलसुद्धा नाही आणि निर्विकल्प तर नाहीच नाही.

  आईला तिची सगळी मुले सारखीच असतात हे सामान्यत: खरे असले तरी 'वेडेशी बहुआवडी' या न्यायानुसार 'मंदबुद्धी' मुलावर ‍तिची विशेष माया असते.      
योग्याने जनसामान्यांच्या सुखदु:खांशी कशा प्रकारे एकरूप व्हावे? यावर एक उपाय सामान्यपणे सुचविला जातो - 'योग्याने सर्वांकडे समबुद्धीने पाहावे.' परंतु श्री ज्ञानदेवांच्या मते समत्वाची ही कल्पना मर्यादित अर्थानेच खरी आहे. ज्या योग्याला सुखी आणि दु:खी, गरीब आणि श्रीमंत, दुर्बळ आणि बलवंत, प्रतिष्ठित आणि उपेक्षित हे सगळे सारखेच दिसतात, त्या योग्याच्या चित्ताच्या समत्वामध्ये फार मोठा दोष आहे, असेच म्हटले पाहिजे. ज्ञानदेवांनी ज्या भागवत- धर्माच्या देवालयाचा पाया घातला, त्या देवालयातील देवमूर्ति आहे दीनस्वरूप ईश्वर! आईला तिची सगळी मुले सारखीच असतात हे सामान्यत: खरे असले तरी 'वेडेशी बहुआवडी' या न्यायानुसार 'मंदबुद्धी' मुलावर ‍तिची विशेष माया असते. त्याचप्रमाणे आत्मज्ञानी योगीजन सर्वांकडे समान बुद्धीने बघतात, हे सामान्यत: खरे आहे. पण दीन-दुर्बलांबद्दल, निर्धन, उपेक्षितांबद्दल, दुर्जन-खलांबद्दल योगीजनांच्या पोटांत फार माया असते.

देव 'न्यायी' असतो, परंतु' निजज्ञाने चोखडीं। संत ही माझीच रूपडीं।।' असे देवाचेच सगुण रूप असणारे संत-योगीजन मात्र 'दयाळू' असतात. ज्ञानदेव मातृहृयाचे महाकवी होते. केवळ अज्ञान, प्रमाद व सदोष प्राक्तन यामुळे खलत्वाकडे प्रवृत्त झालेल्या दुर्जनांविषयी त्यांच्या मनात अपार कळकळा होता. हेच आत्मज्ञानी योगी पुरुषाच्या समत्वाला आलेले पूर्णत्व. अशा समत्वाच्या पूर्णत्वाकडे जाण्याची प्रेरणा देणे हाच श्रीज्ञानदेवांनी घातलेला भागवत-धर्माच्या लोकव्यवहाराचा पाया होय. तात्पर्य- श्रीज्ञानदेवांनी भागवत धर्म मंदिराच्या घातलेल्या पायाचे स्वरूप असे चतुर्विध आहे -
1. त्यांनी परमार्थ - साधनेचा अधिकार सर्वांना समानतेने उपलब्ध करून दिला. 2. शांत रसाचे अधिष्ठान सर्व संत साहित्याला दिले. 3. ब्रह्मसत्तेइतकेच त्या सत्तेचा विलास असलेले विश्वही सत्य आहे हा चिद्विलासवादी सिद्धांत प्रस्थापित केला. 4. समत्वाच्या पारंपारिक कल्पनेच्या मर्यादा स्पष्ट करून समत्वाच्या पूर्णत्वाकडे जाण्याची प्रेरणा दिली. श्रीज्ञानदेवांनी घातलेल्या या विविधांगी पायाचा परिणाम म्हणून भागवत धर्माचे देवालय आज सातशे वर्षांनंतरही सुस्थितीत उभे आहे व वारकारी पंथ आजही पूर्वीसारखाच सत्त्वसंपन्न, तेजसंपन्न व नीतिसंपन्न अवस्थेत सेवारत आहे.