Daily Horoscope
✕

डोहाळे गीत

Updated: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (17:40 IST)
पांचव्या ग महिन्यांत दिला मंडप बागेंत
पांची पक्वान्नांचा थाट पंक्ति बसल्यात आचाट
मधिं बसवा रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला
किष्ण पूस रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला
 
सहा महिन्यांची सोहाळी किष्ण पूशीतो डोहाळी
आंबे पाडाचे पिवळे रुक्मिनीचें वय कवळें
वारा विंझनांनीं घाला दिवस सोनीयाचा आला
किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला
 
सातव्या महिन्याच्या परी आंबुळी ग वेळा खिरी
अंगीं चोळी भरजरी पिवळं पातळ केशरी
वारा विंझनाचा घाला दिवस सोनीयाचा आला
किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला
 
आठव्या महिन्या आठुंगूळ हार गजरे ग गोकूळ
माळ उंबराची घाला दिवस सोनीयाचा आला
किष्ण पुसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला
 
नऊ महिने नऊ दिवस झाली रुक्मिनी प्रसूत
बाळ जन्मलें मदन जैसें सूरव्याचे किरन
चांद लाजूयिनी गेला दिवस सोनीयाचा आला
किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला
 
*****************
बाई मी पहिल्या माशीं उभी ग अंगणांत
मशी पावला रघुनाथ
 
बाई मी दुसर्‍या माशीं उभी ग वृंदावनीं
डाव्या कुशीला चक्रपाणी
 
बाई तिसर्‍या माशीं मुखावर दिसती लाली
भैना कोणत्या महिन्यांत न्हाली
 
बाई चवथ्या माशीं वर्णांचा येतो वास
माझ्या भैनाला गेले दिवस
 
बाई पांचव्या माशीं निरीबाई उंच दिस
तिचा भ्रतार एकांतीं पुस
 
बाई सहाव्या माशीं खाऊशी वाटे बहु
चल अंजनी बागत जाऊं
 
बाई सातव्या माशीं इच्छा झाली डाळींबाची
मला शिवा चोळी रेशमाची
 
बाई आठव्या माशीं मुलीनं ग घेतला छंद
मायबापांशीं झाला आनंद
 
बाई नवव्या माशीं नऊ महिने झाले पूर्ण
पोटीं जन्मलें श्री भगवान
 
बाई दहाव्या माशीं आणा दाई बोलवून
साडी चोळीची करा ग बोळवन
 
*****************
बाई पैल्या दिवशीं रुक्मिनीला न्हान आलं
गोताला बोलावनं केलं
 
बाई दुसर्‍या दिवशीं रुक्मिनी तोंड धुती
चिमन्या पानी पितीः
 
बाई तिसर्‍या दिवशीं धाडा सोनाराला चिठ्ठी
मागा चांदीची ताटवाटी
 
बाई चवथ्या दिवशीं घाली सासू ऊनऊन पानी
हातीं आईच्या तेलफनी
 
बाई पांचव्या दिवशीं बागेंत गेला माळी
रुक्मिनीच्या मखराला केळी
 
बाई सहाव्या दिवशीं धाडा सोनाराला पत्र
मागा सोन्याचं फूलपात्र
 
बाई सहाव्या दिवशीं करा कासाराला बोलवनं
हातीं सोन्याचं कंगवान
 
बाई सातव्या दिवशीं वान्याला धाडा चिठ्ठी
नारळ घाला विटीं
 
बाई आठव्या दिवशीं खिडकीत उभी राही
गोताची वाट पाही
 
बाई नवव्या दिवशीं पुरन पोळीचं जेवायान
गनागोताला बोलवान
 
बाई दहाव्या दिवशीं हळदीकुंकवाचा केला काला
देव इट्टल शांत झाला
 
बाई अकराव्या दिवशीं धई भाताचा काला केला
देव इट्टल शांत शाला
 
बाई बाराव्या दिवशीं वाज चौघडा दारोदारीं
इट्टलरुक्मिनीला केला पोषाक भारी
 
*****************
 
श्री वशिष्ट गुरूची आज्ञा वंदुनी आला
तो राजा दशरथ कौसल्येच्या महाला
स्थुल देह ओसरीवरती नृपवर चढला
देह सूक्ष्म माजघरीं संशयांत पडला
याला कारण कोठडींत पाहे नृप तो
महाकारण माडीवरी जाय त्वरीत तो
ही द्वारीं नच राहे उभी म्हणत तो
शोधितां परस्पर परसीं पाहुनि तिजला
म्हणे रुसून बसलि का निर्विकल्प छायेला
 
डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला
हे राजकुमारी काय आवडे तुजला
जे योगिजनांना योग सांधितां न मिळे
तें कौसल्येन पूर्ण ब्रह्म सांठविलें
तिज जवळी बसूनी राजा दशरथ बोले
पुरवीन कामना इच्छित वद या वेळे
ती नीजानंद आनंदीं रंगली
ती द्वैतपणाची बोली विसरली
तिशीं गोष्ट विचारित राजा मागली
आठवतें तुला का वर्‍हाद बुडवूनि गेला
पौलस्त्य तनय तो मत्स्यमुखीं दे तुजला
 
डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला
हे राजकुमारी काय आवडे तुजला
बोलतो कुठें रावण भुज आपटोनी
ती उठली शत्रूचें नाम ऐकतां श्रवणीं
म्हणे चापबाण दे दाहि शिरें उडवोनी
मी क्षणांत टाकिन कुंभकर्ण मारूनी
त्या इंद्रजिताला बाणें जर्जर करुनी
धाडीन यमपूरा बंधूसाह्य घेवोनी
मम भक्त बिभीषण लंके स्थापूनी
बंधमुक्त करीन सूर सारे या क्षणीं
धाडीन स्वर्गीं सन्मानें त्या झणीं
हें कार्य करीन मी पाळुनी ताताज्ञेला
 
डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला
हे राजकुमारी काय आवडे तुजला
घे शशांक वदनें नवरत्‍नांची माळा
मी चाप भंगितां घालिल भूमीबाला
घे अननस आंबे द्राक्षें ह्या वेळा
मीं प्रिया शोधितां देईल शबरी मजला
घे दास दासी रथ घोडे गे सुंदरी
हनुमंत दास तो माझा महिवरी
नौकेंत बैसूनि जलक्रिडा तूं ग करी
प्रियभक्त गुहक मज नेईल परतीराला
ही लाल पैठणी पांघर भरजरी शेला
 
डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला
हे राजकुमारी काय आवडे तुजला
झडपिली भुतांनीं पंचाक्षरीं कुणी आणा
इज नेऊनि दाखवा वैद्य बघुनिया शहाणा
तव उदरीं येईल वैकुंठीचा राणा
आशीर्वाद दिले मज श्रेष्ठीं नमितां चरणा
हे द्वारपाल गुरुजींना सांगित मम गोष्ट प्रियेची
तूं सांग कहाणी करुनि बहु सायास प्रीतीची
मम गोष्ट ऐकुनी दुत तो शीघ्र घेऊनि आला
त्या ब्रह्मसुताच्या वंदित नृप पदकमला
 
डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला
हे राजकुमारी काय आवडे तुजला
 
*****************
 
श्री भवानी मातेनें वर हा दिधला म्हणूनिया दिवस हा आला
मज वाटतसे आज पासूनी आपुला भाग्योदय खचितचि आला
 
तव मुखचंद्र प्रिये अशा या समयाला बहु खिन्न कशानें झाला
तव मनीं काय आवडतें , तव चित्त कशावरि जडतें , जरि असें फार अवघडत
 
पुरवीन तरी सांग मला तव चित्तीं जे सर्व मनोरथ असती
निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती
 
म्हणे जिजाई आवड स्वातंत्र्याची मज नको बेडी पारतंत्र्याची
हा विप्रछळ मज पहावेना , पारतंत्र्य मला सहवेना , मृत अन्न गोड लागेना
 
परदास्यानें मिळविलेली संपत्ति मज वाटे केवळ माती
निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती
 
मज वाटतसे तलवार ढाल घेवोनी निज घोड्यावर बैसोनी
या कामीं मरण जरी येई , तरी मला सुखदचि होई , या खेरीज इच्छा नाहीं
 
हे डोहाळे ऐकुनि शहाजी म्हणती बाळ हे करील बहु कीर्ति
निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती
 
*****************

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

बेसनाचे लाडू बांधेसूद आणि तोंडात विरघळणारे होण्यासाठी या टिप्स वापरा

हातांना तीव्र खाज आणि जळजळ होतेय? बुरशीजन्य संसर्गापासून बचावासाठी जाणून घ्या ५ उपाय

जपानी, जर्मन आणि फ्रेंच यांसारख्या भाषा शिकल्यास, तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात

करवा चौथपूर्वी चेहऱ्यावर आणा नैसर्गिक चमक; बेसन आणि ज्येष्ठमधापासून बनवा घरगुती फेस मास्क

जेवल्यानंतर पोटफुगीचा त्रास होतोय? जाणून घ्या ५ सोपे उपाय

पुढील लेख
Show comments