सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (12:48 IST)

मनोकामना

पावसाच्या पाण्याचा घराच्या पत्र्यावर एकसारखा एका लयीत आवाज येत होता... कोणीतरी ताड ताड ताशाँर वाजवावा तसा. मधूनच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ती लय थोडी बिघडत होती. त्यामुळेच पत्र्यावरील ताशा क्षण दोन क्षणांसाठी थांबल्यासारखा वाटे अन पुन्हा सुरू होई. रात्रभर पाऊस असाच कोसळत होता. आता चांगलं उजाडून गेलेलं १० - ११ चा सुमार पण तरीही अगदी पहाट किंवा तिन्हीसांजेची वेळ असावी असे वातावरण. गावामध्ये काय दिवे जायला निमित्तच हवे. कालपासून धो धो पाऊस कोसळत होता मग तर काही विचारूच नका, दिवे गेले नसते तरच नवल होते.
 
विसू तात्या त्यांची सकाळची सगळी कार्ये आटपून ओसरीवर बसले होते. खरेतर विश्वनाथ कुलकर्णी असे त्यांचे नाव पण गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्या नावाचा उल्लेख कागदी पत्रव्यवहार सोडला तर कुठेही नव्हता. सगळ्या गावाचे ते विसू तात्याच आहेत. अगदी सज्जन गृहस्थ. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण भले अन आपले काम भले अशा खाक्याच माणूस तितकाच मावळ स्वभावाचा अन धार्मिक वृत्तीचा. तसे त्यांना रिटायर होऊन १५ वर्षे झालेली. म्हणजे त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी गाठलेली. निस्सीम विठ्ठल भक्त. दरवर्षी वारीला जाणारा मनुष्य. घरच्या देवघरात अतिशय सुबक पितळेची विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती. काय असेल ते असेल पण जे काही असेल ते पांडुरंगाला सांगावे आणि 'ठेविले अनंते तैसेचि राहावे... चित्ती असू द्यावे समाधान' असे त्यांचे वर्तन होते. पण तरीही मनात कसलीतरी रुखरुख होती अन ती स्पष्ट जाणवत देखील होती त्यांच्या चेहऱ्यावर.
 
दुपारच्या जेवणानंतर द्वारका माई म्हणजे तात्यांच्या सौभाग्यवती आणि गावाच्या माई बाहेर येऊन बसल्या. तात्यांची घालमेल त्यांना समजत का नव्हती? उगाच का पण्णास वर्षे संसार केला होता त्यांच्या सोबत? पण करणार काय? गेली कित्येक वर्षे पायी वारीला जाणाऱ्या तात्यांना गेल्या ४ वर्षांत चालताना होणाऱ्या त्रासामुळे जाता आले नव्हते. मग आनंदा… तात्यांचा मुलगा दरवर्षी न चुकता त्यांना पंढरपूरला नेऊन आणत असे. पण ह्या वर्षी तेही अवघड वाटत होते.
 
तात्या - आनंदाचा काही फोन?
 
माई - अहो मेली रेंज कुठे आहे फोनला. अन त्याचे चार्जिंग देखील संपले. तरी सांगत होते आनंदास तो घरचा फोन ठेव म्हणून. हे मोबाईलच काही खरे नाही.
 
तात्या - उद्या एकादशी आली. आनंदाचा पत्ता नाही. फोन नाही.
 
माई - अहो मुद्दाम का करत असेल तो. नेमके त्याला जावे लागले ना कंपनीच्या कामासाठी. अन सुनिलाला सुद्धा सुट्टी मिळत नाहीये. गेल्या खेपेस तीच नव्हती आली मोटार चालवीत तुम्हाला पंढरपूर दर्शनाला न्यायला. मारे ऐटीत सगळ्यांना सांगितले होतेत ना... माझी सून आली मोटार घेऊन म्हणून.
 
तात्या - होय खरे. गेल्या खेपेस पण आनंदाला असेच काहीतरी काम होते अन यायला जमले नव्हते.
 
माई - आता आपणच समजून घ्यायला हवे नाही का? शेवटी पांडुरंग काय तुम्ही पहाल तिथे उभा आहे. इथूनच हात जोडू त्यास. त्यास का आपल्या अडचणी दिसत नाहीत? देव ना तो? मग? उगाच तुम्ही मनाला रूखरूख लावून घेऊ नका...
 
माईंच्या प्रेमळ दटावणीने, तात्या जरा स्वस्थ झाले. मुखाने पांडुरंग हारी... वासुदेव हारी नामजप सुरूच होता.
 
काही वेळातच पाऊस जरा उघडला. दिवेलागणीच्या वेळी तर पूर्णपणे थांबला. पूर्ण दोन दिवसांनी गावात दिवे आले. जरा प्रसन्नता लाभली. देवापुढे दिवा लावून माई तुळशीपुढे दिवा लावण्यास गेल्या तोच दारात मोटारीचा उजेड अन हॉर्न ऐकू आला.
 
‘अहो आनंदा... आला हो’ अशी गदगदलेली हाक माईंच्या तोंडून बाहेर पडली. तात्या उठून बाहेर आले अन एकदम प्रसन्न हसले.
 
चहा पाणी, गप्पा, जेवणं ह्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. आनंदाने सकाळी लवकरच पंढरपूरला जायला निघायचे आहे असे सांगून लवकर उठायला हवे असे सांगितले. मला पुन्हा माघारी जायचे आहे फक्त एक दिवस सुट्टी काढून आलो आहे असे सांगितले. पहाटे उठून आवरून आंनदाने आपल्या आई वडिलांना घेऊन पंढरपूरचा रस्ता धरला. दोन तासात पंढरपूर गाठले. एकादशीमुळे प्रचंड गर्दी... अशा गर्दीतही अगदी छान दर्शन झाले तात्या आणि माई सुखावून गेले. एवढा प्रवास करून शिवाय दर्शनाला थांबूनही पाय अजिबात दुखले नाहीत म्हणून तात्या आणखीनच खुश होते.
 
पांडुरंग हारी... वासुदेव हारी…
 
संध्याकाळच्या आत माघारी घरी सुद्धा पोहचले. निदान जेऊन जा रे आनंदा... असे माई म्हटल्या "पुढे उशीर होईल अन मला आजच पुण्यास पोहचायला हवे उद्या महत्वाचे काम आहे" . असे म्हणून आनंदा चहा घेऊन नुकताच पुण्याच्या वाटेला लागला होता.
 
तात्या - शेवटी त्यालाच खरी चिंता. त्यानेच धाडला आनंदास अन आम्हाला दर्शन घडवले. पांडुरंग हारी... वासुदेव हारी...
 
तात्यांच्या आनंदाची माईंना कल्पना होतीच खरी. आनंद होता तो त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याचा. चला विठ्ठलापुढे दिवा लावून घेते… असे म्हणून माई उठल्या तोच वरच्या आळीतील दामू लगबगीने येताना दिसला.
 
दामू - अहो माई तुमचा फोन का बंद आहे? तुळशीपुढे उभा राहून दामू विचारात होता.
 
अरेच्चा काल रात्री दिवे आल्यापासून फोन चार्ज करायचा राहूनच गेला. आनंदाचा फोन यायचा म्हणून चार्ज केला जातो. आनंदा स्वतःच आला होता त्यामुळे फोनकडे लक्ष कोणाचे असणार म्हणा.
 
माई - का रे दामू? झाले काय पण?
 
दामू - शिवाय मी आज दिवसात चार वेळा येऊन गेलो तर घराला कुलूप. होतात कुठे तुम्ही दोघे? काळजी वाटू लागली हो.
 
तात्या - अरे पण झाले काय असे?
 
दामू - अहो काही नाही... आनंदाचे मला चार पाच फोन आले. तुमचा फोन लागत नाही म्हणून आलो होतो. बर आता मला जायला हवे. कामं आहेत अजून. तुमचा फोन चालू करा अन आनंदास फोन करा लगेच. असे म्हणून दामू निघून गेला.
 
तात्या अन माई एकमेकांकडे पाहत राहिले. माईंनी फोन चालू केला. तोच फोन वाजला. आनंदाचाच होता. त्याला यायला जमले नाही म्हणून तो माफी मागत होता अन पुढच्या आठवड्यातच येऊन तुम्हाला पंढरपुरास घेऊन जाईन म्हणत होता. माईंना काही कळेनासे झाले. त्यांनी बर म्हणून फोन बंद केला अन घडला प्रकार तात्यांना सांगितला.
 
तात्या म्हणाले - आग कसे शक्य आहे. थट्टा केली असेल तुझी त्याने. मघाशीच नाही का गेला तो आपल्याला सोडून. त्या दामूला पण त्यानेच फोन करून सांगितले असणार. आजकालची मुलं काय थट्टा करतील ती पण इतक्या म्हाताऱ्या आई बापाची… नेम नाही. आता पुन्हा फोन तर येऊ दे चांगला खडसावतो त्यास.
 
माई - नाही हो... आवाज रडवेला होता त्याचा. मला तर थट्टा अजिबात वाटली नाही.
 
तात्या - पण हे कसे शक्य आहे? काल रात्री अन आज दिवसभर आनंदा आपल्या सोबतच तर होता ना.
 
तात्या माई विचारात पडले... काहीसे आठवून तात्या म्हणाले:
 
तात्या – अगं पण काल रात्री आनंदाचा फोन एकदाही कसा वाजला नाही. नेहमी कोणाचे ना कोणाचे फोन येत असतात त्यास?
 
माई - हो ना अहो. शिवाय कधीही भाकरी न खाणारा मुलगा... पण काल रात्री त्याने हट्टाने भाकरी अन पिठलं का करायला लावले त्याने?
 
तात्या - शिवाय गाडी आपली नेहमीची नव्हती. मी विचारले देखील तर जी मिळाली ती घेऊन आलो म्हणाला अन हसला. मला तर काही कळलेच नाही.
 
माई - आहो सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले ते सकाळी… सकाळी गंध अन बुक्क्याचा टिळा लावून कमरेवर हात ठेऊन विठ्ठलासारखा उभा होता तेव्हा.
 
तात्या - काय सांगतेस काय?
 
माई - अहो त्याही पेक्षा पुढे म्हणजे… तुम्ही विठ्ठलाला अर्पण करायला गुंफलेला तुळशीहार उचलून गळ्यात घालणार होता. मी हलकेच त्याला म्हटले 'आनंदा अरे विठ्ठलासाठी गुंफलाय तो त्यांनी पहाटे' तर माझ्याकडे बघून हसला अन म्हणाला ' अगं मीच ना तो विठ्ठल' तर मी आपली बापडी हसले अन म्हणाले ‘चला पांडुरंगा… उशीर होतोय… आता निघायास हवे पंढरपुरास’. हसून "चला चला" म्हणाला मला.
 
तात्या - अगं काय सांगतेस काय?
 
असे म्हणून तात्यांचे डोळे चमकले... 'म्हणजे... म्हणजे तो साक्षात...'
 
म्हातारा म्हातारीच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी आले... अन दोघेही त्यांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या देव्हाऱ्यातील विठ्ठलापुढे बसून साश्रू नयनांनी गदगदू लागले.
 
- सोशल मीडिया