अण्णा तुळपुळे हा एंडवास इंजिनियरिंग लिमिटेड या कारखान्यात जॉबर होता. तो या युनिटमध्ये लेबर म्हणूनच लागला होता. पण कामाबद्दल त्याची निष्ठा व प्रामाणिकपणा पाहूनच कंपनीचे मालक विपुल शाह यांनी त्याला प्रमोशन दिले. अण्णा कामाबद्दल जेव्हा समर्पित होता तेवढाच कामगार बांधवांप्रतीही होता. कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी तो प्रयत्नशील होता. यासाठीच त्याने उत्कर्ष जागतिक युनियन या नावाच्या कामगार युनियनची स्थापना केली. डाव्या आघाडीचे खासदार नानासाहेब साने हे या संघटनेची प्रेरणा होते. त्यांच्या सल्ल्यानेच अण्णा युनियनचे काम पाहत होता.
मी सदाशिव गुप्ते. अण्णाच्याच कंपनीत एडमिनीस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये क्लार्क होतो. घरी म्हातारी व आजारी आई, लग्नच्या वयात आलेली मुलगी व बी. ई करून नोकरीसाठी खटपट करणारा मुलगा व त्यांच्या काळजीमध्ये झुरणारी माझी बायको. हा माझा संसार. माझ्यावर एवढी जबाबदारी असल्यामुळे युनियनच्या भानगडीत काही मी पडलो नाही. अण्णा माझा मित्र होता तरीही मी युनियनपासून दूरच राहिलो. कारण एकच, कधी शेठजींना माझा राग आला तर ते मला बाहेरचा रस्ता दाखवतील. या वयामध्ये मला नोकरी कोण देणार? मी काही अण्णासारखा 'स्कील्ड लेबर' नव्हतो. तरीही मी अण्णाशीही जमवून घेतलं होत नि शेठजीच्या मर्जीनेही वागत होतो.
एकंदरीत मी मध्यमवर्गीय परिवारातला, भित्रा कारकूनी करणार्या जमातीतला किरकोळ मनुष्य होतो. मधून-मधून मी अण्णाच्या घरी जायचो. त्याची विचारपूस करून यायचो. अण्णाच घर म्हणजे एका साधारण कामगाराचं असतं तसच होतं. तीन मुली, म्हातारे आई-वडील व आजारी बायको हा त्याचा संसार. बैठकीत एक साधा सोफा, तीन खुर्च्या, मध्ये एक टेबल व शेजारी एक मांडणी हे त्याच्या घरचे सामान. मांडणीत मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारधारेशी संबंधित बरीचशी पुस्तके होती. शिवाय कोपर्याच्या खणात कार्ल मार्क्स यांचा एक ओबडधोबड पुतळा होता. हा पुतळा कोणी गावठी मूर्तिकाराने बनवला असावा. कारण त्यामध्ये नाक-डोळे काहीच स्पष्ट दिसत नव्हते.
मला अण्णा म्हणायचा - 'सदाशिव तुला या मार्क्सच्या पुतळ्याच्या डोळ्यामध्ये काय दिसतंय, त्यावर म्हटलं 'मला तर काहीच दिसत नाही.अण्णाने बरीच पुस्तके वाचलेली होती त्यामुळे त्याचं इंग्रजीपण छान होत. तो मला म्हणाला ' यू मिडिल क्लास कावर्ड पिपल्स' तुम्हाला यात काय दिसणार मला तर या मूर्तीच्या डोळ्यामध्ये आग दिसते. जगातल्या सर्व कामगाराच्या कल्याणाची इच्छा दिसते. माझी कोणत्याही देवाच्या मूर्तीपेक्षा या मूर्तीवरच श्रद्धा वाटते. खरंच अण्णाच्या घरात देवाचे फोटो किंवा मूर्ती शोधूनही सापडायची नाही. गणपती, देवीच्या मूर्तीच्या ठिकाणी मार्क्स व लेनिन यांचेच फोटो दिसायचे. अण्णा मला म्हणायचा, - 'बघ सदाशिव एक दिवस असा येईल ज्या दिवशी जगात सर्व दूर समाजवाद येईल व भांडवलशाही समाप्त होऊन जाईल. कामगारांचेच राज्य स्थापित होईल.
अण्णा 'एक मे' या कामगार दिनी उधार पाधार करून आपल्या घरावर रोषणाई करायचा, फटाके उडवायचा. घरी गोडधोड पक्वान्न करून शेजारी-पाजारी पण पोचवायचा. याला लोक त्याला खुळचटपणा म्हणायचे. अण्णा म्हातारा होत चालला तसा 'सटकला' आहे, असंही म्हणायचे.
अण्णाचं वापरायचं वाहन म्हणजे एक वडिलोपार्जित खटारा सायकल. चालवताना तिचा आवाजही खूप यायचा. त्याच्यापुढे एक लाल झेंडा लावलेला असे. सायकल व त्याच्या होणारा आवाज व फडफडणार्या झेंड्याला पाहून अण्णा खूश होत असे. मी अण्णाला म्हणालो 'अरे अण्णा कमीत कमी सायकलचा आवाज तरी बंद कर. या वर अण्णा म्हणायचा, 'सदाशिव, अरे ही गोष्ट तुला नाही समजणार. हा आवाज नव्हे भांडवलशाही लोकांना हा सावधगिरीचा इशारा आहे. आता अशाच कामागार वर्गाचं युग येणार आहे, याची ही द्वाही आहे. हा फडफडणारा झेंडा या क्रांतीची मशाल आहे.''
अण्णा नेहमी एक गाणं गुणागुणत असायचा ''हम मेहनतकश जब दुनिया मे अपना हिस्सा मांगेंगे तो एक खेत नाही, एक गांव नाही सारी दुनिया मांगेंगे'' यावर मी त्याला म्हणायचो ''अण्णा तुला काय वाटतं, या सर्व गोष्टी करून तू क्रांती घडविणारं आहेस? अरे हे जग असंच चालेल. नेहमी श्रीमंताची वाहवा होईल आणि गरीबांचे भोग काही सुटणार नाहीत. तुझं असं वागणं खुळचटासारखं दिसतं'''
माझ्या अशा बोलण्यावर अण्णा माझी कीव करायचा. त्याच्या मते माझ्यासारखे मध्यमवर्गीय कारकून लोक फक्त गुलामगिरी करण्यासाठीच जन्माला येतात. त्यांच्या हातून कधीच कोणतेही उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. असेच दिवस जात होते. हळूहळू अण्णा उत्कर्ष जागतिक युनियनचा सेक्रेटरी बनला. आता तो शेठजी बरोबर मीटिंगमध्ये ऐटीने बोलत असे. कामगारांची बाजू मांडत असे. शेवटी शेठजींनी त्याला फॅक्टरीत लेबर ऑफिसर बनायची ऑफर दिली व म्हणाले 'या कामगार व यांच्या युनियनमध्ये काहीच दम नाही. तू इथला 'लेबर ऑफिसर' बनून कामगारांकडून काम करून घे. तुला राहायला बंगला, चालवायला मोटर सायकल शिवाय दर महिना 15 हजार रूपये पगार कंपनी देईल. ''
अण्णा ताडकन म्हणाला '' नाही, शेठजी कामगार आणि त्याचं कल्याण हाच माझ्या जीवनाचा उद्देश्य आहे. या उद्देश्यापासून कोणतीही लालूच मला दूर करू शकत नाही.'' अण्णा युनियनचं कामच करतच राहिला. त्यांच्यात आणि मॅनेजमेंटमध्ये पहिलं भांडण मग लवकरच झालं. फॅक्टरीमध्ये लेथ मशीनवर काम करणार्या शांताराम पांधारे या कामगाराचे दोन्ही हात मशीनमध्ये अडकून जायबंदी झाले. त्याला लगेच फॅक्टरीच्या दवाखान्यात नेण्यात आले. पण शरीरामध्ये विष भिनण्याचा धोका असल्याने डॉक्टरांना त्याचे दोन्ही हात खांद्यापासून कापावे लागले. अण्णा शांतारामाचे प्रकरण घेऊन मॅनेजमेंटमध्ये एम. डी विपुल शहा यांना भेटला. नुकसान भरपाईची मागणी केली. पन्नास हजार रुपये व शांतरामच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी एवढीच मागणी होती. पण मॅनेजमेंटने अण्णाची मागणी धुडकावून लावली. त्यांच्या मते शांताराम एक कॅज्युअल लेबर होता व त्याला कसली नुकसान भरपाई द्यायची?
यावरून अण्णा चिडला व त्याने फॅक्टरीमध्ये बेमुदत संप सुरू केला. संप महिनाभर चालला. कामगारांना पगार काहीच न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार सुरू झाली. शेवटी काही कामगारांनी अण्णांला भेटून काही मध्यममार्ग काढण्याची विनंती केली. पण अण्णाही जिद्दीने पेटला होता. कारण हा कामगारांच्या भावी जीवनाचा व अण्णाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता.
अण्णाचे प्रेरणास्थान, सल्लागार खासदार नानासाहेब साने आता केंद्र सरकारमध्ये कामगार मंत्री झाले होते. अण्णाचे संबंध त्याच्याशी चांगले असल्यामुळे त्यांना भेटून काही मार्ग काढण्याबद्दल अण्णाला सुचवले. त्यांना भेटायला गेला तेव्हा नानासाहेब म्हणाले ' काय अण्णा काय भानगड घेऊन आला आहेस. अण्णाने सर्व हकीकत त्यांना सांगितली, ते म्हणाले अण्णा इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी संप करणे हे काही योग्य नाही. आपल्याला देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे. संप मागे घेतल्याशिवाय कोणतीही मागणी पूर्ण करता येणार नाही, समजलं! नेक्स्ट!!
नानासाहेबांचे 'नेक्स्ट' म्हणणं म्हणजे अण्णाला जायची सूचना होती. नानासाहबे सत्तेमध्ये असल्यामुळे आता त्याचा सूर बदलला होता. अण्णा विचार करत होता, याच नानासाहेबांनी कित्येकदा संप करायला लावून आपल्या मागण्या मॅनेजमेंटकडून मान्य करवून घेतल्या होत्या. अण्णा उठला व तिथून निघून गेला. बातचीत निष्फळ झाल्याने बहुतांश कामगार कामावर रूजू झाले होते. नाना निराश मनाने घरी चटईवर झोपला होता. तेवढ्यात त्याच्या युनियनच्या एका कार्यकर्त्याने शेजारच्या गावांमध्ये असलेल्या फॅक्टरीमध्ये दोन कामगारांना नोटीस न देता कामावरून कमी केल्याची बातमी त्याला दिली. तेव्हा थकलेला अण्णाने कोपर्यातल्या मार्क्सच्या मूर्तीकडे बघितलं व स्वत:लाच म्हणाला 'उठ अण्णा, कामगारांवर अन्याय होत असताना. तुला झोपून आराम करायची मार्क्सबाबाची आज्ञा नाही. तुला कामगाराच्या उत्कर्षाकरिता होणार्या लढ्याची मशाल सतत पेटती ठेवायची आहे.' आणि आपल्या करकरत्या सायकलीवर त्या कार्यकर्त्यासोबत अण्णा शेजारच्या गावाच्या कारखान्यामध्ये निघून गेला.
त्यांच्या खडखडणाऱ्या सायकलीवर लावलेलं लाल झेंड्याचा निशाण फडफडत होत. अण्णाची युनियनबद्दलची आस्था, त्याग व निष्ठा पाहून मला वाटलं खरंच आज कॉम्रेड डांगे, कॉम्रेड फर्नांडिस, मधू लिमये व डॉ. लोहिया यांनी कामगार क्रांतीची पेटवलेली मशाल खुळचट समजणार्या अण्णा तुळपळेनी कायम ठेवली आहे. आज कामगारांना जे काही हक्क मिळाले ते अण्णा तुळपळेसारख्या लोकांमुळेच. नाही काय?