शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

खासगीपण जपणारी जागा म्हणजे : बेडरुम

बेडरूम कशी असावी हे प्रत्येकाची गरज, आवड, उपलब्ध जागा, खर्च करण्याची तयारी या सर्व गोष्टीवर अवलंबून असते. आधुनिक सुखसोयींयुक्त घरात बेडरूम, तिची सजावट, सूर्यप्रकाश, मोकळी हवा यासोबतच रात्रीचा चंद्रप्रकाश अनुभवण्याची सुविधा या सर्वांचा विचार केला जातो. दिवसभराचा थकवा, ताण, चिंता यापासून मुक्त होऊन उद्याचे आव्हान पेलण्यासाठी उमेदीने, ताजेतवाने होण्याकरिता शांत झोप आवश्यक असते. बेडरूम सर्व व्यत्ययापासून मुक्त असायला पाहिजे. आपल्या कल्पनेतील बेडरूम प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःच्या कल्पनाशक्तीसोबतच बहुतेकजण वास्तुशास्त्राचा आधार घेतात.

वास्तुशास्त्रानुसार बेडरूम नैऋत्येस असायला हवी. घर बहूमजली असल्यास बेडरूम सहसा तळमजल्यावर ठेवावी. देऊळ किवा देवघर शयनगृहात कधीही ठेवू नये. देवघर सहसा स्वयंपाकघरात ठेवणे पसंत केले जाते. बेडरूमची दारे, खिडक्या, तावदाने, खिडक्यांचे पडदे यासारख्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. बेडरूमचे दार सहसा पूर्व किवा पश्चिमकडे असावे. खिडक्या ईशान्येस ठेवाव्यात. रंगसंगती फिक्कट, सुंदर आणि मुख्य म्हणजे रोमँटिक रंगांची असावी.

झोपताना बहुतेकांना पूर्ण काळोख करून झोपण्याची सवय असते. विशिष्ट प्रकारचे दिवे बसवून सगळीकडे मंद प्रकाश पसरेल अशा प्रकाशाची व्यवस्था करावी. मुलांची झोपण्याची खोली, त्यांचे वय, आवडी- निवडी, ते खेळत असलेले खेळ, यानुसार सजवावी. बेड शीट्स, उशांच्या खोळा रंगीबेरंगी, प्राणी, पक्षी, फुलपाखरू यांची चित्रे काढलेली असावीत. भितींवर निसर्ग, मुलांचे आवडते खेळ, खेळाडूंची चित्रे लावलेली असावीत. मुलांच्या बेडला लागून दिव्यांची बटणे, टेलिफोन सेट ठेवावा. त्यांची झोपण्याची खोली उत्तरेकडे असावी. यामुळे त्यांना गोड झोप लागण्यास मदत होईल. 

बेडरूममध्ये झोपताना डोके पूर्व किवा दक्षिण दिशेने ठेवावे. हा समज पूर्वापार चालत आलेला आहे. पाहुणे मंडळीसाठी स्वतंत्र बेडरूम असल्यास उत्तम. वडिलधारी मंडळी व घरातील कर्ते मंडळींनी बेडरूमच्या नैऋत्य दिशेस झोपायला हवे.