शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By अरुणा सबाने|

महिला 'दीन'

ND
येणार येणार म्हणता म्हणता जागतिक महिला दिन आला आहे. पाहता पाहता अलीकडच्या दहा वर्षात हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रत्येक संघटनेला या दिवसाचे, या कार्यक्रमाचे महत्त्व पटले आहे. कोणत्यातरी सामाजिक संघटनेनी एखादा कार्यक्रम घ्यावा आणि मोकळे व्हावे, एवढा साधा सोपस्कार आता राहिलेला नाही. जगभर प्रचंड उत्साहात जवळजवळ सगळ्याच संघटना हा कार्यक्रम पार पाडतात. अक्षरश: आपलाच कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, अशी चुरस प्रत्येकात असते. एकप्रकारे अहमहमिका चाललेली असते. जवळजवळ एक आठवडा हा कार्यक्रम चाललेला असतो.

आपण सारे हा कार्यक्रम अत्यंत आनंदात, उत्साहात साजरा करतो, हे निर्विवान सत्य आहे. यात कुणालाही कुणाबद्दलही शंका असण्याचे कारण नाही. प्रश्न आहे कवळ हा जागतिक ‍महिला दिन साजरा करून आम्हाला काय मिळणार आहे? आम्ही या दिवसाची आठवण का ठेवावी? आम्हाला यापासून काय प्रेरणा ‍घ्यायची आहे?

जागतिक महिला दिन हा महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचा, दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक दिवस आहे. ज्या महिलांनी आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या झोळीत एक उज्ज्वल भविष्य टाकले, त्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्या पायवाटेनी पुढे चालणे हे आमच्या सामाजिक संघटनेचे आज आद्य कर्तव्य असावे.

आजची पिढी खरे पाहिले तर अनेक अर्थाने खुशहाल आहे. त्यांच्यासमोर प्रश्न नाहीत असे नाही. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. पण ज्या फंडामेंटला राईट्ससाठी त्यावेळी आंदोलने झालीत ती जास्त महत्त्वाची यासाठी होती. जर तुम्हाला तुमचे प्राथमिक अधिकारच मिळणार नाहीत, तर तुम्ही पुढच्या गोष्टींसाठी संघर्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रचंड संघर्षातून मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्याचा आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घेण्याचा हा दिवस आहे. या दिवशी आपण सार्‍यांनी समाजोपयोगी काम करण्याचा वसा घेण्याचा दिवस आहे.

आज समाजात फार वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या स्तरावरून भेडसावत आहे. प्रत्येक व्यक्तीने (केवळ सामाजिक संघटनांनी नव्हे) जमेल तसे काम करण्याचा प्रयत्न करायला हवा. पण आज प्रत्यक्ष चित्र वेगळेच दिसत आहे. कार्यक्रम साजरा करण्यात आम्हा सार्‍यांनी खूप हुरूप येतो. मात्र प्रत्यक्ष कृतीच्या नावाने आनंदीआनंद असतो. याहीपेक्षा शोकांतिका अशी आहे की इतरांच्या अधिकारांवर घाला घालण्याचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त वाढत आहे.

जागतिक महिला दिनाच्या आठवड्यात नागपुरातून प्रकाशित होणार्‍या महत्त्वाच्या 10 पेपर्सचा आढावा घेतला तर या सात दिवसात 13 खून व खुनाचा प्रयत्न, हे अनैतिक प्रेमप्रकरणातून झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक खुनाच्या मुळाशी कारण स्त्री आहे. आपल्या सोडून दुसर्‍याच्या पतीवर प्रेम करूनच थांबायचे नाही तर त्याच्यावर पूर्णपणे पत्नीचे अधिकार गाजविले की हे प्रकार घडणारच. प्रेम हा विषय असा आहे की कोणीही कुणावरही प्रेम करू शकते. त्याला तुम्ही चॅलेंज करूच शकत नही. पण खर्‍या प्रेमात अधिकाराला थारा नसतो. नसावा. अधिकार आला की विषयवासना आली, अनैतिकता आली आणि त्यातूनच खून, मारामारी हे प्रकार घडतात.


ND
एखादी व्यक्ती आपल्याल आवडते. आपण तिच्यावर प्रेम करतो. आपल्याला शक्य असेल तेवढे आपण तिच्या भल्यासाठी काही करतो, हे अनैतिक असूच शकत नाही. पण आवडले म्हणून तिच्या घरातच घुसायचे, तिच्या किंवा त्याच्या पतीचे/पत्नीचे अधिकार डावलून आपला अधिकार स्थापन करायचा आणि जिचा खरा अधिकार आहे, त्याचाच नायनाट करायचा, याला प्रेम म्हणतच नाही. या आठवड्यातल्या या सगळ्या घटना ‍जागतिक महिल ‍दिनाला कलंक लावणार्‍या आहेत. हा दिन साजरा करण्याचा आमचा अधिकार गमावण्याच्या आहेत.

अलीकडचा गुन्हेगारीचा अभ्यास जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त महिला गुन्हेगारीचे प्रमाण आहे. 9टक्के हा आकडाच अत्यंत धक्कादायक आहे. संपूर्ण राज्यात सद्यस्थितीत 23 हजार 1 75 कैदी (महिला) आहेत. माझ्या मते हा आकडा अधिक जास्त असण्यची शक्यता आहे. तोंडात बोट घालायला लावणारा हा आकडा आहे आणि त्या आठवड्यातला 13 खुनाचा प्रयत्न हा आकडा तर आमच्या थोबाडात मारून घेण्याचा प्रकार आहे. दुसर्‍यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यापेक्षा, अन्यायग्रस्त व्यक्तीला त्याचे अधिकार मिळवून देण्यात काय आनंद मिळतो, हे एकदा जोखून बघायला काय हरकत आहे?

सामाजिक संघटनांनी कार्यक्रमांची रेलचेल करण्यापेक्षा त्या महिलांच्या आयुष्यात काही पोकळी निर्माण झाली असेल, काही महिलांना मार्ग सूचत नसेल, काहींना मागदर्शनाची गरज असेल, अशा व्यक्ती शोधून त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना सामाजिक कार्याची दिशा दाखविणे ही खरे तर जागतिक महिला दिनाची प्रेरणा ठरेल. स्त्रियांच्या हातून खुनासारख्या क्रूर घयना का घडतात? ही विचार करण्यासारखी बाब आहे.

ज्या खुनाला अप्रत्यक्षरित्या महिला जबाबदार असतात, अशाही घटनांचा यात मी समावेश केला अहे. कुणाला तरी सांगून गुन्हा करवून घेणे हीसुद्धा तेवढीच गंभीर बाब आहे. प्रत्यक्ष खून करणार्‍या एका महिलेबद्दल मात्र मी एक सांगू शकेल की आपल्या कच्च्याबच्च्यांच्या पोटात दोन घास घालण्यासाठी ती स्वत:चा पानठेला चालवायची. नवर्‍याकडून तिचा होणार छळ आणि दारूसाठी तिच्या कष्टाच्या कमाईवर होणारे सततचे अतिक्रमण यामुळे वैतागुन तिच्या हातून ती घटना घडली आणि स्वत:च तिने ती मान्यही केली. त्यामुळे माझ्या मते ती माफीची हकदार निश्चितच आहे.

पण आपल्या मार्गातला अडसर दूर करण्यासाठी निष्ठूर घटना दुसरी कोणतीच असू शकत नाही. अशा महिलांनाही संघटनेत समाविष्ट करून त्यांना कोणतेतरी विधायक काम सोपविण्यात सामाजिक संस्थांनी पुढाकर घेण्यास हरकत नाही. आजार्‍यांची सुश्रृषा करणे, कॅन्सरग्रस्त रोगी, निराधार महिला आश्रम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा अनेक गरजू ठिकाणांसाठी आपण आपल्या आयुष्यातला थोडासा जरी वेळ दिला, तरी बरेचसे प्रश्न समाजातले आपोआप कमी होतील आणि खर्‍या अर्थी जागतिक महिला दिन साजरा करण्यासारखे होईल.