सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (13:32 IST)

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती काय?

मुंबईत 20 डिसेंबरपासून कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली. नाताळ, नवीन वर्ष आणि सुट्टी यामुळे कोरोनारुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती.
 
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,
27 डिसेंबरला 809 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
26 डिसेंबरला 922 नवीन कोरोनारुग्ण आढळले
25 डिसेंबरला 757 रुग्ण कोरोनापॉझिटिव्ह
24 डिसेंबरला ही संख्या 683
तर 23 डिसेंबरला 602 रुग्ण
22 डिसेंबरला 490
21 डिसेंबरला 327
तर 20 डिसेंबरला 204 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील कॅबिनेट बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोनासंक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण वाढवावं लागेल. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पावलं उचलावी लागणार आहेत."
 
कोरोनासंसर्गाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी टास्कफोर्सची बैठक येत्या एक-दोन दिवसात होणार आहे.
 
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीदेखील मुंबईतील वाढत्या कोरोनारुग्ण संख्येवर चिंता व्यक्त केलीये. ते म्हणाले, "मुंबईत गर्दी वाढली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष असताना लोक काळजी घेत नाहीयेत."
 
पुढच्या आठवड्यात कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा कॉलेजबाबत निर्णय घेऊ असं आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 
दुसरीकडे, कोरोनासंसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती पाहाता मुंबई महापालिकेने ऑक्सिज निर्मिती प्लांटचा ट्रायल-रन सुरू केलाय.
 
कोरोनारुग्णांच्या वाढच्या संख्येबाबत बोलताना महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, "मुंबईत कोरोनारुग्णांच्या संख्यात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय." त्यामुळे, ओमिक्रॉन आणि इतर व्हेरियंटच्या संभाव्य प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता, सर्व पालिका रुग्णालयं आणि जंबो सेंटरला सुसज्ज रहाण्याचं निर्देश देण्यात आलेत.
 
मुंबईत सद्य स्थितीत 4765 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
 
इक्बाल चहल पुढे सांगतात, "ज्या रुग्णालयात आणि जंबो सेंटरमध्ये ऑक्सिजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यांच्या क्षमतेची चाचणी घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय." प्रत्येक बेडपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने होतोय का नाही याची खातरमजा करण्याचं काम सुरू झालंय.
 
मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरूवात झालीये?
मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी दर साधारणत: 2.60 टक्के नोंदवण्यात आलाय.
 
मुंबईत कोरोनासंसर्गाची तिसरी लाट सुरू झालीये? याबाबत बीबीसीशी बोलताना बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशीअन डॉ. गौतम भन्साली सांगतात, "मुंबईत कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झालीये."
 
केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि खार हिंदुजा रुग्णालयाचे क्लिनिकल गव्हर्नन्स संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्याकडून आम्ही तिसऱ्या लाटेबाबत जाणून घेतलं.
 
ते म्हणाले, "मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या वाढताना पहायला मिळतेय. ही कोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते." त्यामुळे, पुढील दोन-तीन आठवडे याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल.
 
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मृत्यूची संख्या खूप कमी आहे. गेल्या सात दिवसात 8 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय.
 
डॉ. भन्साळी पुढे सांगतात, "रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. कोरोनामुळे होणारे मृत्यू अत्यंत कमी आहेत." बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सध्यस्थितीत ओमिक्रॉन व्हेरियंटचे पाच रुग्ण दाखल आहेत, "या रुग्णांना अत्यंत सौम्य किंवा अजिबात लक्षणं नाहीत."
 
गेल्या आठवड्यात मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या वाढण्याचा दर 0.07 टक्के आहे. मात्र रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर 1139 दिवसांवरून कमी होऊन 967 दिवसांवर आलाय.
 
महाराष्ट्र टास्कफोर्सचे डॉ. शशांक जोशी यांच्यामते मुंबईत तिसरी लाट आलीये असं म्हणायला आणखी एक आठवडा वाट पहावी लागेल.
 
ते सांगतात, "मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंट पसरला तर कोरोनासंसर्गाची तिसरी लाट नक्की येईल. सद्य स्थितीत हे केवळ अंदाज लावण्यासारखं (Speculative) होईल."
 
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका ट्विटरवर लिहितात, "मी मुंबईतील ज्या रुग्णालयाशी संलग्न आहे त्यात पाच दिवसांपूर्वी सर्वात कमी रुग्ण आढळले होते." आज, कोव्हिड वॉर्ड पूर्ण भरलेला आहे आणि त्याची क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे.
 
मुंबईत तिसरी लाट ओमिक्रॉनची?
भारतात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 415 वर पोहोचलीये.
 
महाराष्ट्रात आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 167 रुग्ण आढळून आले असून त्यातील 72 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय.
 
डॉ. गौतम भन्साळी सांगतात, "बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काही ओमिक्रॉनबाधित आणि काही संशयित रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांना अत्यंत सौम्य किंवा अजिबात लक्षणं दिसून येत नाहीयेत."
 
मुंबईत सद्य स्थितीत ओमिक्रॉनचे 84 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत किंवा अत्यंत सौम्य लक्षणं आहेत.
 
मी काही दिवसांपूर्वी लंडनवरून आलेल्या अजिबात लक्षणं नसलेल्या तीन ओमिक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार केलेत, असं डॉ. गौतम पुढे सांगतात.
 
मुंबई महापालिकेने केलेल्या जिनोम सिक्वेंसिंगमधील 35 टक्के नमुन्यात डेल्टा आणि 62 टक्के नमुने डेल्टाच्या उपप्रकारांचे आहेत. तर, ओमिक्रॉनचे फक्त 2 टक्के रुग्ण आढळून आलेत.
 
उद्योगपती हर्ष गोयंका पुढे लिहीतात, ओमिक्रॉन इथे आहे आणि तीव्रतेने पसरतोय. पार्टी थांबवा, मास्क घाला आणि लस घ्या.
 
व्होकार्ड रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिनतज्ज्ञ डॉ. हनी सावला बीबीसीशी बोलताना सांगतात, "ओमिक्रॉन संक्रमिक रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल न करता होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात येतोय." त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली पहायला मिळत नाही.
 
डॉ. सावला पुढे सांगतात, अनेक रुग्णांनी स्नायू आणि अंग दुखत असल्याची तक्रार केलीये. चव किंवा वास जाण्याचे प्रकार अत्यंत कमी आहेत. त्यामुळे याची लक्षणं वेगळी आहेत.