शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 18 मे 2021 (08:31 IST)

चक्रीवादळामुळे मुंबईत झालेले नुकसान 'असे'

मुंबईत तौत्के चक्रीवादळामुळे शहर व उपनगरात ४७९ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये, मंत्रालय, घाटकोपर, दादर सेनाभवन, भायखळा आदी ठिकाणच्या दुर्घटनांचा समावेश आहे. या झाडे व फांद्या पडल्याच्या दुर्घटनांमुळे काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वाळवावी लागली. तर घाटकोपर रेल्वे स्थानक ते विक्रोळी दरम्यान झाड रेल्वे ओव्हरहेड वायरवर पडून झालेल्या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेच्या धीम्या गतीच्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचा रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसला.
 
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, भायखळा येथे रस्त्यावर झाड पडल्याने सदर ठिकाणी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. तर दुर्घटनाग्रस्त झाडे, फांद्या उचलण्याचे काम भर पावसात पालिका कर्मचारी, अग्निशमन दल यांच्या मार्फत अविरत सुरू होते. चक्रीवादळामुळे शहर भागात १५६ ठिकाणी, पूर्व उपनगरांत – ७८ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात सर्वाधिक म्हणजे २४५ ठिकाणी अशा एकूण ४७९ ठिकाणी झाडे/ फांद्या पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनांत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त पालिकेकडून प्राप्त झालेले नाही.
 
मुंबईत १७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना
मुंबईत तौत्के चक्रीवादळामुळे शहर व उपनगरात भर पावसात १७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या दुर्घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाल्याचे अथवा जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, शहर भागात ६ ठिकाणी , पश्चिम उपनगरात ९ ठिकाणी तर उर्व उपनगरात २ ठिकाणी अशा एकूण १७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
 
६० ठिकाणी वीजपुरवठा खंडित
शहर भागात वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट वीज विभागाकडे अतिवृष्टीमुळे ५०-६० ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबतची माहिती, बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईत चक्रीवादळामुळे जोराने वारे वाहत होते तर त्याच बरोबर जोरदार पाऊस पडला. परिणामी शहर भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात काही तास राहावे लागले. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी प्राप्त होताच भर पावसात बेस्ट उपक्रमाच्या तंत्रज्ञांकडून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली. काही ठिकाणी तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करण्यात बेस्ट उपक्रमाच्या तंत्रज्ञांना यश आले तर काही ठिकाणी थोड्या उशिराने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे तक्रारदार नागरिकांना काही वेळ त्रास सहन केल्यावर वीज पुरवठा पूर्ववत झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.