शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (17:45 IST)

मंदिरातील सेवकांचा महिलेवर सामूहिक बलात्कार आणि खून; अनेक प्रश्न अनुत्तरित

murder
घरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा 17 किमी अंतरावर थेट मृतदेहच सापडला. कुणालाही न सांगता निर्मनुष्य ठिकाणी ही महिला कशी पोहोचली, पुढे काय झालं, तिथे जाण्याआधी काय घडलं असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 
30 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर ठाणे जिल्हा हादरला. 9 जुलै रोजी ही घटना उघडकीस आल्यापासून अनेक प्रश्नांची मालिका उभी राहिली आहे. बीबीसी मराठीने घटनास्थळाला भेट देऊन, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 
ठाणे जिह्यातील शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिर परिसरात 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना मागच्या 9 जुलै रोजी उघडकीस आली.
 
या प्रकरणी शिळ-डायघर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
 
श्यामसुंदर शर्मा (62), संतोषकुमार मिश्रा (45) आणि राजकुमार पांडे (54) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अटक झालेल्यांपैकी एकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
 
शनिवारी (6 जुलै रोजी) सकाळी घराजवळच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्या राहत्या घरातून बाहेर पडलेली पीडित महिला दोन तासांनी घरी परत न आल्याने तिच्या घरच्या मंडळींनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली.
 
परंतु पुढील दोन दिवस तिचा कोणताही ठावठिकाणाला लागला नाही आणि 9 जुलै रोजी थेट तिच्या मृत्यूची बातमी कानी पडली.
 
आपल्या घरापासून 17 किलोमीटर दूर असणाऱ्या दुर्गम परिसरातील श्री गणेश घोळ मंदिरात कशी पोहोचली याबाबत कुटुंबीयांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहे.
 
6 जुलै रोजी नेमकं काय घडलं?
मंगळवारी (9 जुलै रोजी) वाशीचे एक डॉक्टर आपल्या पत्नीसह मंदिर परिसरात फिरायला आले असताना त्यांना महिलेचा मृतदेह आढळला.
 
ही बाब त्यांनी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.
मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर महिलेच्या मोबाईलमधील कॉलचा तपशील काढण्यात आला. सकाळी महिलेने आपल्या मैत्रिणीला फोन लावला होता. त्यावरून आम्ही मैत्रिणीला बोलवून घेऊन तिची चौकशी केल्याची माहिती शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी दिली.
 
दरम्यान महिलेच्या पतीलाही बोलावून त्याची कसून चौकशी करण्यात आली. संशयित म्हणून ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसाचे पतीच्या मोबाईलच्या फोनचे लोकेशन देखील तपासण्यात आले, मात्र त्यात कुठलाही पुरावा सापडला नाही, असंही शिंदे यांनी सांगितलं.
 
महिलेच्या पतीने सांगितले की, "घरात आम्ही सर्वजण झोपलो होतो. माझ्या पाऊणे तीन वर्षाच्या मुलाला साडेआठ वाजता जाग आली. मुलाच्या रडण्याच्या आवाजाने मी देखील उठलो. बायको घरात नव्हती. ती मंदिरातून परत आली नाही, म्हणून आम्ही शोधाशोध सुरू केली.
 
"सकाळी सव्वानऊच्या आसपास माहेरच्या मंडळींना फोन करून तसं कळवलं. तिचा फोनदेखील स्वीच ऑफ येत होता. त्यानंतर दहा वाजून सतरा मिनिटांनी माझ्या फोनवर तिचा संदेश आलेला."
 
“माझं काही चुकलं असेल तर माफ करा, आणि त्यापुढे लव्हचा सिम्बॉल होता," असे पतीने सांगितले.
त्याच दिवशी सकाळी मुलीचे वडील आणि घरातील इतर मंडळी त्यांच्या फार्महाऊसवर जाण्यासाठी निघाले असताना वाटेत आठ वाजताच्या सुमारास महिलेचा वडिलांना फोन आला होता.
 
महिलेच्या वडिलांनी काही कामासाठी त्यांचे रेशन कार्ड मुलीला दिले होते. ते रेशन कार्ड परत हवे आहे का, अशी विचारणा महिलेने वडिलांकडे केली. रेशन कार्डाची आत्ता काहीच गरज नसल्याचे वडिलांनी मुलीला सांगितले. दोघांमध्ये एवढेच संभाषण झाले.
 
पत्नी सापडत नाही म्हणून महिलेच्या पतीने मुलीच्या काकांना फोन करून कळवले. मुलगी सापडत नसल्याचे कळताच वडील आणि इतर मंडळी पुन्हा माघारी फिरली आणि शोधाशोध करण्यास सुरूवात झाली.
 
नवी मुंबई परिसरात शोध घेतल्यानंतर महिला कुठेच सापडत नसल्याने नवरा आणि माहेरच्यांनी त्याच दिवशी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नवी मुंबई येथील पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
 
मंदिर परिसरात काय घडले?
संदिपान शिंदे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, महिलेने महापे येथे नाश्ता केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समजल्याचे सांगितले.
 
शनिवारी सकाळी 10 वाजता ही महिला मंदिर परिसरात दाखल झाली. मंदिर उंच ठिकाणी असून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत आणि पायऱ्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
 
ती महिला पायऱ्या चढून वर गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरॅमध्ये कैद झाले आहे. परंतु त्यानंतर ती खाली आल्याचा कोणताच पुरावा उपलब्ध नाही. मंदिराचा परिसर एकांतात असून तिथे दररोज भाविकांची ये-जा नसते.
 
सुट्टीच्या दिवशी किंवा सण-उत्सवाच्या दिवशीच लोकांचीच रेलचेल याठिकाणी पाहायला मिळते, असंही शिंदे पुढे म्हणाले.
मंगळवारी (9 जुलै रोजी) वाशीचे एक डॉक्टर आपल्या पत्नीसह मंदिर परिसरात फिरायला आले असताना त्यांना महिलेचा मृतदेह आढळला. ही बाब त्यांनी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तिच्या मोबाईलमधील कॉलचा तपशील काढण्यात आला.
 
सकाळी महिलेने आपल्या मैत्रिणीला फोन लावला होता. त्यावरून आम्ही मैत्रिणीला बोलवून घेऊन तिची चौकशी केल्याची माहिती संदिपान शिंदे यांनी दिली.
श्री गणेश घोळ मंदिराचे मुख्य बालकदास महाराज काही कामानिमित्त उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गेले असल्याने त्यांच्याजागी उत्तर प्रदेशातील संतोषकुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोन सेवकांची तेथे नियुक्ती करण्यात आली होती.
 
त्यापैकी एकजण आधीच तिथे होता, दुसरी व्यक्ती 5 जुलै रोजी घटनास्थळी आली. त्याचबरोबर मूळचा राजस्थानचा असलेला श्यामसुंदर शर्मा 6 जुलै रोजी घटनास्थळी आला होता. घटना घडली त्यावेळी केवळ तिघेजण तिथे उपस्थित होते.
ती महिला संपूर्ण रात्रभर या परिसरात होती. महिला एकटी असल्याने तिचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी तिला चहा देऊन त्यामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या महिलेवर तिघांनी बलात्कार केला.
 
महिलेला शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरड करून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, या तीनही आरोपींनी महिलेला मारहाण करुन तिची हत्या केली आणि मंदिर परिसरातील झाडीमध्ये मृतदेह फेकून दिला. मृतदेह सापडला तेव्हा तिच्या डोक्यावर आणि कमरेवर जखम असल्याचं पोलिसांनी नमूद केलं.
 
या गुन्ह्याची माहिती कोणालाही कळू नये यासाठी या तिन्ही आरोपींनी श्री गणेश घोळ मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची केबल तोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मात्र मंदिराच्या पायऱ्यांवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती पायऱ्या उतरत असताना दिसत आहेत.
 
घटना घडली त्या ठिकाणी इतर कुणीही नसल्याने पोलिसांचा मंदिरातील सेवकांवरील संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
 
तिघांपैकी एकाला ट्रॉम्बे येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सर्व हकीकत सांगून गुन्हा कबूल केला.
 
माहेरच्या मंडळींकडून सासरच्यांवर छळाचा आरोप
सदर महिलेचा सासरच्यांकडून छळ झाला आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली असा मुलीच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे.
 
लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसांनीच सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला होता अशी माहिती महिलेच्या काकांनी दिली.
 
"तिला शाकाहारी पदार्थ फारसे बनवता यायचे नाहीत, ते सुद्धा ती बनवायला शिकली होती. मूल होत नाही म्हणूनही तिला त्रास दिला जात होता. त्यातून प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं होतं. परंतु सासरच्या मंडळींनी येऊन माफी मागितल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला होता", असं काकांनी सांगितलं.
 
"सासरच्या मंडळींनी आमच्याकडे कधी थेट पैसे मागितले नाहीत, परंतु तिच्या खात्यावर आम्ही पैसे टाकायचो. ते पैसे नवरा काढून घ्यायचा," असा आरोप महिलेच्या वडिलांनी केला.
 
“तिच्या वागण्यातून मनात काहीतरी चाललंय हे आम्हाला कळायचं, पण ती कधी मोकळेपणाने बोलायचीच नाही. मी तिला इतकंसुद्धा सांगितलं होतं की, आता तुला मुलगा झालाय. तुला काही त्रास होत असेल तर माहेरी परत ये. माझी सर्व संपत्ती तुझीच आहे. पण ती म्हणायची, मी परत आले तर तुम्हाला मान खाली घालावी लागेल. मला माहेरी परत यायचं नाही. मला संसार करायचाय,” मृत महिलेचे वडिलांनी तिच्या मृत्यूनंतर म्हटले.
 
बेपत्ता तक्रारीची गंभीर दखल न घेतल्याचा पोलिसांवर आरोप
महिला बेपत्ता झाली त्याच दिवशी नवी मुंबईतील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी आम्हालाच दमदाटी केल्याचा आरोप महिलेच्या काकांनी केला.
 
पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांनी आमच्या घरी फोन करून तुम्हीच महिलेला लपवून ठेवलं असेल, असा उलट आरोप आमच्यावर केल्याचं त्यांनी सांगितलं.
आम्हीच आमच्या मुलीला कशासाठी लपवू, असा प्रतिप्रश्न महिलेच्या माहेरच्या लोकांनी उपस्थित केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेजवळ असलेला मोबाईल फोन बंद असल्याने तिचे लोकेशन सापडत नव्हते. महिला बेपत्ता झाल्याची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आली होती.
 
9 जुलै रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर शिळ-डायघर पोलिसांकडून फोन आला आणि बेपत्ता महिलेची ओळख पटली. यावरून हेच सिद्ध होते की तक्रार दाखल करून घेतल्यानंतर तपास सुरू होता.
 
सासरच्या लोकांकडून छळ झाल्याचे उप-मुख्यमंत्र्यांना पत्र
कथित घरगुती हिंसेचे हे प्रकरण बलात्कार आणि खुनापर्यंत पोहोचल्याने सध्या त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. संबंधित गावातील स्थानिक एकत्र येऊ महिलेला न्याय मिळायला हवा, अशी मागणी करत आहेत.
 
माझ्या बहिणीला सासरच्या मंडळींकडून नेहमी मानसिक, शारीरिक त्रास दिला जात होता आणि सतत पैशाची मागणी केली जात होती, असं महिलेच्या बहिणीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
 
आम्ही पैसे देऊनही त्यांनी तिचा छळ थांबवला नाही, तिला उपाशी ठेवायचे असंही त्यांनी पत्रात लिहिलंय.
 
पोलिसांनी आम्हाला कोणतेही सहकार्य केले नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी आम्हालाच उलट धमकी दिल्याचा आरोप, उप-मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
 
'छळ झाला असता तर तक्रार केली असती'
लग्नानंतर मूल होत नसल्यामुळे त्यासाठी उपचार घेण्यावरून आमच्यामध्ये थोडीफार वादावादी होत असे, पण मुलगा झाल्यानंतर आमच्यातील भांडणं थांबली होती, असं महिलेच्या पतीने बीबीसीला सांगितले.
 
"आमचा मुलगा आता पाऊणेतीन वर्षांचा आहे. गेल्याच महिन्यात आम्ही गोव्याला गेलो होतो. इतर अनेक ठिकाणीसुद्धा फिरायला जात असू. माझ्याकडून किंवा कुटुंबीयांकडून छळ झाला असता तर तिने पोलिसात तक्रार केली असती. पण असं काहीही झालेलं नाही," असं पीडित महिलेच्या पतीने बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले.
 
पुजारी, सेवकांची चारित्र्य पडताळणी करण्याची मागणी
या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आरोपींना योग्य शिक्षा व्हावी याकरिता विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत या करिता राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, धार्मिक स्थळांमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, पुजारी व पूर्णवेळ सेवक यांची जवळच्या पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
 
महिलेचे आप्त व कुटुंबीयांना मानसोपचार सेवा व समुपदेशन पुरवण्यात यावे, अशी सूचना देखील नीलम गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
 
पोलीस तपासातून आरोपींनी सामूहिक बलात्कार आणि हत्येची कबुली दिली आहे. परंतु पूर्वी कधीही न गेलेल्या अज्ञात ठिकाणी ही महिला का आणि कशी गेली हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
 
या प्रश्नाचा उलगडा लवकरात लवकर झाला पाहिजे, शिवाय यामागे दुसरा कुणी सूत्रधार आहे का त्याचा शोध लावून त्याला कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी मुलीच्या माहेरच्यांनी केली आहे.
 
Published By- Priya Dixit