1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Headless Body Found in a Sack in Nalasopara

नालासोपाऱ्यात शीर नसलेला मृतदेह पोत्यात सापडला; परिसरात खळबळ

नालासोपाऱ्यात शीर नसलेला मृतदेह पोत्यात सापडला; Mumbai Crime news in Marathi
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील नालासोपारा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अंबा पाडा येथील एका निर्जन ठिकाणी प्रभात पेट्रोल पंपाजवळ पोत्यात भरलेला शिर नसलेला मृतदेह आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
 
मृतदेह ओळखणे अवघड होते कारण त्याचे डोके कापून वेगळे करण्यात आले होते. मात्र, मृत व्यक्तीच्या हातावर ‘अशोक सिंग’ असा टॅटू असल्याने पोलिसांना ओळख पटवण्यास मदत झाली. मृत व्यक्तीचे नाव अशोक सिंग असावे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक, श्वानपथक आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलिस आता आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि तपासाच्या दिशेने वेगाने काम करत आहेत.
 
या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि हत्येचा प्रकार शोधण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.
पुढील लेख
कुपवाडा येथील लष्करी तुकडीत गोळीबार, ३ जवान जखमी