रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 23 एप्रिल 2020 (11:14 IST)

लॉकडाउनचा फायदा: मुंबई लोकल प्रवास आता अधिक सुरक्षित

लॉकडाउनच्या कालावधीचा फायदा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने करुन घेतला असून लोकल ट्रेनच्या दोन्ही मार्गांवर डागडुजी, दुरुस्ती आणि देखभाल करण्यासंदर्भातील विशेष काम सुरु आहे.
 
मुंबईची लोकल ट्रेनही मुंबईची लाइफलाइन असल्याचे म्हटले जाते. लोकल ट्रेनमधून ८० लाखांहून अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. मात्र मागील काही आठवड्यांपासून लॉकडाउनमुळे मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे. याच कालावधीमध्ये ट्रेनची वाहतूक बंद असल्याने रेल्वे प्रशासनाने सिग्नल सिस्टीम, ट्रॅक, ओव्हरहेड वायर्स आणि सामुग्री यासंदर्भातील कामे हाती घेतल्याचे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
 
अधिकाऱ्यांप्रमाणे पश्चिम रेल्वेवर मोठा ब्लॉक घेणे शक्य नसते. त्यामुळेच आम्ही ही संधी रेल्वे ट्रॅक आणि इतर सुविधांची देखभाल करण्यासंदर्भातील कामे करुन घेण्यासाठी वापरत आहोत. लॉकडाउन सुरु झाल्यापासून रेल्वेचे कर्मचारी आणि कामगार रोज पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण एक हजार ३९४ किमी लांबीच्या ट्रॅकची पाहणी करतात. या ट्रॅकची एकूण लांबी २१० किमी असून त्यावर एक हजार २५० वेल्ड्स आहेत. या वेल्ड्सची अल्ट्रासॉनिक डिटेक्टर्सने तपासणी केली जाते. दोन हजार ५०३ किमी लांबीचे ट्रॅक्सची ‘ऑसिलेशन मॉनिटरिंग सिस्टीम’च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे.
 
दिलेल्या माहितीनुसार ट्रॅकची देखभाल करण्याबरोबरच मध्य रेल्वेने मार्गावरील जुने आणि गंजलेली निकामी झालेली ओव्हरहेड यंत्रे काढून टाकण्याचे महत्वाचे काम केले आहे. याचबरोबर सिग्नल्सची मॅगरींग, मुंबई क्षेत्रातील टेलिकॉम वायर्स बदलणे, ट्रान्सफॉर्मर्सची साफसफाई आणि डागडुजी करणे अशी कामे मध्य रेल्वेने केली आहेत.