कोर्टाने नवाब मलिक यांची 'ईडी'च्या कारवाई विरोधात केलेली याचिका फेटाळली
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना मोठा झटका बसला आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात 'ईडी'च्या कारवाई विरोधात केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. ईडीने केलेली अटक कारवाई आणि त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने सुनावलेला कोठडी आदेश बेकायदा असल्याचा दावा करत दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेतील अंतरिम सुटकेचा विनंती अर्ज न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळला.
नवाब मलिक 23 फेब्रुवारीपासून ईडीच्या ताब्यात आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. अटक आणि कोठडी आदेश बेकायदा असल्याचे नवाब मलिक यांनी याचिकेत म्हटले होते तसेच हेबियस कॉर्पस याचिका करून त्यात अंतरिम सुटकेची विनंतीही नवाब मलिक यांनी केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली आहे.