जग विरोधात गेलं तरी लढेन- राज
दोन दिवसांच्या मौनानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा उत्तर भारतीयांविरोधात गरजले आहेत. महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी उत्तर भारतीयांना विरोधाच्या आपल्या भूमिकेचा पुनरूच्चार करताना त्यांनी संपूर्ण जग जरी विरोधात गेले तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता, महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषा यासाठीच लढत राहू असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हिंदी वाहिन्यांमधील उत्तर भारतीयांची कड घेणारे पत्रकार आपली व आपल्या पक्षाची बदनामी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात, की भय्यांनी महाराष्ट्रात छट पूजा, उत्तर प्रदेश स्थापना दिवस, राजकीय बळ दाखविण्यासाठी जोरात साजरे करायला सुरवात केली आहे. महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात युपी- बिहारी भय्यांची दादागिरी सुरू आहे. त्यामुळे यांच्याशी आता हात जोडून बोलण्याचे दिवस संपले आहेत, हे लक्षात आलं आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर हात सोडून समोर जायला हवे हे जाणवले. म्हणून आप ण व आपल्या सहकार्यांनी युपी व बिहारवाल्या गुंडांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी व गुंडगिरीविरोधात संघर्ष सुरू केला. महाराष्ट्रात रहायचं असेल तर महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या जीवनपद्दतीप्रमाणे बाहेरून येणआर्यांना जगावं लागेल. महाराष्ट्राशी जुळवून घ्यावं लागेल. हे झालं नाही तर महाराष्ट्रात अराजक माजेल, असा इशाराही त्यांनी दिला. बिहारी व युपीच्या लोकांना नियंत्रणात ठेवले नाही, तर महाराष्ट्रातही तिथल्याप्रमाणेच परिस्थिती निर्माण होईल आणि एकेदिवशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अमराठी झाला तर आश्चर्य वाटणार नाही, असे सांगताना श्री. ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या विधानाचाही संदर्भ दिला. आपल्या आंदोलनाची तुलना शिवसेनेशी करू नये असे सांगून त्यांनी पुढे म्हटले आहे, की दोन्ही आंदोलनात खूप फरक आहे. शिवसेनेचं आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं, प्रामुख्याने नोकरीसाठीचं आंदोलन होतं. आज हे आंदोलन उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक दादागिरी व गुंडगिरीविरूद्ध आहे. बिहारी व युपीमधील गरीब परिस्थिती तेथील लोकांना येथे येण्यासाठी भाग पाडते, असे असले तरी त्या लोकांना गरीब असे संबोधून चालणार नाही. कारण एकेकट्या स्थानिक मराठी भाषिकांना भेटल्यानंतर त्यांची वर्तणूक दादागिरीची असते, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या महाराष्ट्रवादी भूमिकेच्या समर्थनार्थ राज लिहितात, ''फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत: भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रान्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात. करुणानिधी मलेशियातल्या तामिळंसाठी मलेशियन सरकारशी वाग्युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते. दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जनेर्लसिंग भिंद्रनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो . इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही. राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणाऱ्या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्द्यावर थेट संबंध ठेवून असतात. गांगुलीला टीममधून काढल्यावर पं . बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात. हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही ? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत यूपी - बिहारची वकिली करतात , ते प्रांतवादी नाहीत ? अमिताभ बच्चन स्वत : ला ' छोरा गंगा किनारेवाला ' मानतो . ते प्रांतवादी नाही का ? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो ? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे''