राज ठाकरे यांच्या अटकेने फायदा कुणाचा?
|
ठाकरी शैलीतून आणि शिवसेनेच्या आक्रमक मुशीतून तयार झालेल्या राज यांच्यासाठी अशा प्रकारची अटक तशी फारशी नवी नाहीच. यापूर्वीही त्यांनी अनेक आंदोलने केले आहेत. आणि त्यांनाच काय खुद्द बाळासाहेबांनाही अटकेला सामोरे जावे लागले आहे. तर महाराष्ट्रालाही त्यांच्या अटकेनंतर होणारी निदर्शने नवीन नाहीत. त्यामुळे त्यांना अटक झाल्यानंतर हे सर्व होणार हे राज्य सरकारलाही ठाऊक होतेच.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर अगदी पहिल्याच सभेतून राज यांनी 'मराठी बाणा' हेच आपल्या पक्षाचे प्रमुख ध्येयधोरण राहील हे जाहीर केले होते. त्यामुळेच त्यांनी 'मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा' ही घोषणाही दिली.
आणि त्यानुसार मुंबईत असलेली उत्तर भारतीय आणि बिहारींची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठीचे आंदोलन चालविले. त्यामुळे त्यांना उत्तर भारतीय नेत्यांची नाराजीही ओढवून घ्यावी लागली. म्हणूनच वारंवार त्यांच्या अटकेची मागणी केली गेली. गेल्या 19 ऑक्टोबर रोजी रेल्वे भरती परीक्षेच्या वेळी मनसैनिकांनी उत्तर भारतीयांना दिलेला चोप ही काही नवीन घटना नव्हती. यापूर्वी गेल्या दोन-अडीच वर्षात तशा अनेक घटना घडल्या आहेत. मग इतक्या दिवसांनंतर आताच राज यांना अटक का केली गेली? हा देखिल सध्या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे.
| |
या सर्व गोष्टींच्या मागे आगामी निवडणुकाही आहेत. हे विसरून चालणार नाही. राज यांना अटक करण्यामागे विलासराव देशमुख सरकारने 40 वर्षांपूर्वी वसंतराव नाईक सरकारने केलेल्या राजकीय खेळीची पुनरावृत्ती केली आहे. उत्तर भारतीय राज्यांमध्ये राज ठाकरे हा एक गुंड असल्याची प्रतिमा हिंदी चॅनल्सनी आधीच करून ठेवली आहे. त्यामुळे राजला अटक करण्याची करामत महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या सरकारने करून दाखविली हे दाखवून उत्तर भारतातील राज्यांमध्ये कॉंग्रेसची प्रतिमा उजळ करण्याचाच प्रयत्न केला आहे. राज्यातील अमराठी भाषिकांमध्येही राज्य सरकारच्या कार्यकुशलतेचा यामुळे ठसा उमटण्यास मदत होणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये या राज्यांमध्ये राजच्या अटकेचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतील हे आताच स्पष्ट दिसू लागले आहे.
|
| |
चाळीस वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती
आधीच सांगितल्याप्रमाणे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी तत्कालीन वसंतराव नाईक सरकारने जी खेळी केली होती. तिच विलासराव सरकारने खेळली आहे. त्यावेळी मुंबईत मिल कामगारांच्या चळवळी अतिशय मोठ्या प्रमाणावर चालत असायच्या आणि या चळवळींचे नेतृत्व डाव्यांच्या हाती असे. त्यामुळे साहजिकच राज्याच्या राजकारणातही डाव्यांचे प्रचंड वर्चस्व होते. तत्कालीन विधानसभेत 70 ते 72 जागांवर डाव्यांचे वर्चस्व राहत असे.
| WD |
राजला नकारात्मक प्रसिध्दीचाही फायदा
हिंदी माध्यमांनी आणि चॅनल्सने सुरूवातीपासूनच राज ठाकरे हा एक गुंड असल्याचेच दाखविले. राजला अटक केल्यानंतरही 'राजपर पुलीसकी नकेल', 'राजपर कसा शिकंजा', 'राज के गुंडोंका महाराष्ट्र मे हंगामा' अशाच आशयाच्या बातम्या येत राहिल्या. या बातम्यांमुळे अनेक वर्षांपासून राजला ओळखणारा मराठी माणूस साहजिकच दुखावला गेला. तर दुस-या बाजूला उत्तर भारतीय नेते पक्षभेद विसरून एकत्र आल्यानंतरही महाराष्ट्रातील पक्षांनी राजला गुन्हेगार ठरविल्याने राजबद्दलची सहानुभूती वाढली आहे.
राजच्या अटकेनंतर त्याचे राज्यभर उमटलेले पडसाद पाहता या प्रकरणातून अनेक अर्थी फायदा करू पाहणा-या कॉंग्रेसच्या हाती काय येईल हे येणारा काळच सांगणार आहे.

