सिक्कीमच्या बोगद्यात मिथेन वायू गळती आणि भूस्खलनात 7 जणांचा मृत्यू
सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील समरदुंग (झोलुंगे) बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या अपघातामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. मिथेन वायू गळती आणि त्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक कामगार बोगद्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू आहे.
हा बोगदा तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पाचा भाग म्हणून बांधला जात आहे. पटेल इंजिनिअरिंग एनएचपीसीच्या प्रकल्पासाठी याचे बांधकाम करत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, २७ कामगार अजूनही बोगद्यात अडकले आहेत. यापैकी २१ पटेल इंजिनिअरिंगचे, तर ६ एनएचपीसीचे आहेत. तथापि, बोगद्यात अडकलेल्या लोकांच्या संख्येला प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही.
भूस्खलनानंतर ढिगाऱ्यामुळे बोगद्याचे प्रवेशद्वार बंद झाले होते. मृतांचे मृतदेह सिंगतम जिल्हा रुग्णालय, एसटीएनएम रुग्णालय (गंगटोक) आणि नामची जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, असे माहिती आणि जनसंपर्क विभागाने एका निवेदनात म्हटले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. पश्चिम बंगालमधून एक विशेष बचाव पथकही बोलावण्यात आले होते.
विषारी वायू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बचावकार्याला अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. वायूमुळे अनेक बचाव कर्मचारी गंभीर अवस्थेत आहेत. बोगद्यामध्ये मिथेन वायू असण्याची शक्यता आहे.
Edited By - Priya Dixit
