मला माझे अंतिम दिवस भारतात घालवायचे आहे म्हणत ९४ वर्षीय भारतीय वृद्धेने अमेरिकन नागरिकत्व सोडले
एका ९४ वर्षीय महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, त्यांना भारतातच राहायचे असल्यामुळे त्यांनी अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशात जन्मलेल्या एका महिलेने दोन दशकांपूर्वी मिळवलेल्या अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग केला आहे. असा दावा केला जात आहे की, त्यांना त्यांचे शेवटचे दिवस भारतीय नागरिक म्हणून घालवायचे आहेत. कोंड्रागुंटा महालक्ष्मम्मा ९४ वर्षांच्या आहे आणि त्यांची शेवटची इच्छा आहे की, त्यांनी आपले उर्वरित आयुष्य आपल्या मायदेशात भारतीय नागरिक म्हणून घालवावे.
महालक्ष्मम्मा आपल्या पतीच्या निधनानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यावेळी, त्यांचा मुलगा, बुचैया चौधरी, व्हर्जिनियातील पीटर्सबर्ग येथे ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत होता. महालक्ष्मम्मा २००० साली अमेरिकेच्या नागरिक झाल्या.
कोंड्रागुंटा महालक्ष्मम्मा यांनी त्यांच्या भारतीय नागरिकत्वाच्या अर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या भेटीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही ९४ वर्षीय महिला आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील चिनागंजम मंडलातील चिंथागुम्पाला गावची रहिवासी आहे. बुधवारी, त्या बापटला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे. व्यंकट मुरली यांच्यासमोर हजर झाल्या. आपल्या मुलासोबत आलेल्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शक्य तितक्या लवकर भारतीय नागरिकत्व देण्याची विनंती केली. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांनी यापूर्वीच आपले अमेरिकन नागरिकत्व सोडले आहे आणि त्यांना पुन्हा भारतीय नागरिक व्हायचे आहे.
Edited By- Dhanashri Naik
