पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्माई
बेंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बेळगाव येथील पाटबंधारे आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना, पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील त्यांच्या समकक्षांशी समन्वय साधून जलाशयांमधून पाणी सोडण्यास सांगितले.
शनिवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या बैठकीत ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी धरणांमधील पाणी आणि नदी खोऱ्यातील पर्जन्यमानाची माहिती रोजच्या रोज अपडेट करून ती महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना शेअर करावी. तसेच “अधिकार्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या समकक्षांना पूर्व सूचना न देता जलाशयांमधून पाणी सोडू नये” अशा सुचना देखिल केल्या.
मुख्यमंत्र्यांनी उपायुक्त नितेश पाटील आणि इतर अधिकाऱ्यांना पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पुरग्रस्तांचे जलद स्थलांतर करण्यासाठी योजना सुनिश्चित करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी अल्पकालीन आणि दीर्घकालीन पुनर्वसन योजनाही तयार कराव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या ऑनलाईन मिटिंगमध्ये उमेश कट्टी, गोविंद करजोल इत्यादी मंत्री तसेच पोलीस आयुक्त एम.बी. बोरलिंगय्या, एसपी लक्ष्मण निंबर्गी आदी उपस्थित होते.