गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2023 (21:33 IST)

भारत न्याय यात्रा: राहुल गांधी करणार 14 राज्यं आणि 6,200 किमीचा प्रवास

काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार असून 20 मार्चपर्यंत सुरू राहील.
 
काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी या यात्रेची घोषणा केली.
 
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वेणुगोपाल म्हणाले, "राहुल गांधींनी पूर्व ते पश्चिम अशी एक यात्रा काढावी असं मत काँग्रेस कार्यकारिणी समितीने 21 डिसेंबर रोजी मांडलं होतं.
 
"राहुल गांधी यांनीही काँग्रेस कार्यकारिणीचं मत मान्य करत ही यात्रा काढण्यास सहमती दर्शवली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे," वेणुगोपाल यांनी सांगितलं.
 
65 दिवसांच्या या यात्रेत राहुल गांधी 6,200 किलोमीटर एवढं अंतर कापतील. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे.
 
यावेळी राहुल गांधी मणिपूर, मेघालय, नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
 
या काळात राहुल गांधी तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी चर्चा करतील असं काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं.
 
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पायीच पूर्ण केली होती. पण यावेळेसची भारत न्याय यात्रा बसमधून पूर्ण केली जाईल. वेणुगोपाल यांनी सांगितलं की, या बसमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या प्रवासात राहुल पायीही प्रवास करतील. मात्र लांबचं अंतर बसमधून पार केलं जाईल.
 
यात्रेचा उद्देश
राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी 6 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा सलग 150 दिवस सुरू होती. या प्रवासात राहुल गांधींनी 4500 किलोमीटर इतका प्रवास पूर्ण केला होता. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींनी आणखीन एक यात्रा काढावी अशी विनंती काँग्रेस पक्षाने केली होती.
 
गेल्या आठवड्यात 21 डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यात राहुल गांधींनी दुसरी यात्रा काढावी असं ठरलं.
 
वेणुगोपाल म्हणाले की, 'सर्वांसाठी न्याय' मिळवणं हा या यात्रेचा उद्देश आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, "आम्हाला महिला, तरुण आणि सर्वसामान्यांसाठी न्याय हवा आहे. सध्या श्रीमंतांकडे सगळ्या गोष्टींचा ओघ सुरू आहे. त्यामुळे ही यात्रा गरीब लोकांची, तरुण शेतकरी आणि महिलांची आहे."
 
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त तेलंगणामध्येच विजय मिळवता आला. उर्वरित चार राज्यांमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.
 
छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, पण दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा दौराही केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आलं नाही.
 
देशातील केवळ तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. यात कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
 
काँग्रेस पक्षातील संपर्क विभागाचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत न्याय यात्रा यातील फरक स्पष्ट केला आहे.
 
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, "भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी तीन मुद्दे मांडले. यात आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही यांच्या विरोधात आवाज उठविण्यात आला. त्यांनी लोकांमध्ये जाऊन लोकांना या भयाण वास्तवाची जाणीव करून दिली. ही यात्रा कोणाच्याही भावना व्यक्त करण्यासाठी नव्हे तर लोकांविषयी असलेल्या काळजीपोटी काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान राहुल गांधींनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या."
ते म्हणाले, "आता भारत न्याय यात्रा सुरू होईल. ती आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी आहे. लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं आणि महागाईने होरपळणाऱ्या कोट्यवधी कुटुंबांमध्ये उज्ज्वल भविष्याचा आत्मविश्वास निर्माण करणं हा या यात्रेचा उद्देश आहे."
 
राहुल गांधींचा हा प्रवास अशा वेळी सुरू होणार आहे जेव्हा देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. दरम्यान, भारतातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीतही बैठका सुरू आहेत.
 
काँग्रेस नेतृत्वासोबात अनेक राज्यांतील स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी बिहार आणि उत्तरप्रदेश नंतर आंध्रप्रदेशातील नेत्यांची बैठक घेतली आहे.
 
यावर भाजप काय म्हणालं?
राहुल गांधींच्या नव्या यात्रेवर भाजपने निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, "देशातील जनतेने भारत जोडो यात्रेची संकल्पना नाकारली होती. कारण काँग्रेस आणि राहुल गांधींच्या बोलण्या-वागण्यात फरक आहे. त्यांना आजही वाटतं की भारतातील जनतेला मूर्ख बनवता येतं. पण सत्यता तपासल्यावर कळेल की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार 2014 पासून खरा न्याय देत आहे."
 
कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय काँग्रेस नेते भारत जोडो यात्रेला देत आहेत.
 
इंडिया आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. झारखंड हा देखील राहुल गांधींच्या यात्रेचा एक भाग आहे.
 
या भेटीबद्दल जेएमएमचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले, "राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेली भारत जोडो यात्रा सकारात्मक वातावरण निर्माण करणारी होती.
 
राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा तसा फायदाही झाला. राहुल गांधी ही व्यक्ती सामान्य माणसांशी जोडलेली वाटते, हे लोकांना पटलं. ते प्रेमाबद्दल बोलतात, दंगलीबद्दल बोलत नाही. आता पूर्व ते पश्चिम हा प्रवासही अभूतपूर्व असेल आणि संपूर्ण इंडिया आघाडीला त्याचा फायदा होईल."
 
Published By- Priya Dixit