शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (16:36 IST)

BJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, वरूण गांधींना वगळलं

भारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होण्याआधीच आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 80 सदस्यांचा समावेश आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुरली मनोहर जोशी यांची नावेही समाविष्ट आहेत. एवढेच नाही तर लालकृष्ण अडवाणी यांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे, पण वरूण गांधींचे नाव कुठेही नाही. केवळ वरुण गांधीच नव्हे, तर त्यांची आई मनेका गांधी यांचाही नवीन कार्यकारिणीत समावेश करण्यात आलेला नाही.
 
या कार्यकारिणीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार प्रकाश जावडेकर, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, खासदार डॉ. हीना गावित, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे. पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.
 
खरं तर, आज जेव्हा भाजपने 80 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली, तेव्हा सर्वांच्या नजरा या गोष्टीकडे गेल्या की वरुण गांधींचे नाव त्यात नाही. काही काळापासून वरुण गांधी केवळ केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्हते, तर लखीमपूर खिरी घटनेबाबत योगी सरकारच्या विरोधात आवाज उठवत होते. लखीमपूर घटनेत वरुण गांधी रोज ट्विट करून योगी सरकारवर दबाव टाकताना दिसत आहेत.
 
कार्यकारिणी सदस्यांमध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुध्दे यांचा समावेश आहे. विनोद तावडे, विजया रहाटकर, पंकजा मुंडे आणि सुनिल देवधर यांचाही कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. त्यांच्यावरील राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. विशेष निमंत्रितांमध्ये महाराष्ट्रातून आमदार सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि लड्डाराम नागवाणी यांना स्थान देण्यात आलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांच्यावर भाजपनं काही महिन्यांतच पक्षात मोठं स्थान दिलं आहे. हीना गावित यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.