शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 22 मे 2022 (14:42 IST)

'भाजपने संपूर्ण देशात रॉकेल शिंपडले आहे, एका ठिणगीने येतील सर्व अडचणीत'

'देशात ध्रुवीकरण वाढत चालले आहे, बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, महागाई वाढत आहे. भाजपने देशात सर्वठिकाणी रॉकेल शिंपडले आहे, फक्त एका ठिणगीने आपण सगळेच मोठ्या अडचणीत सापडू.' असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
 
राहुल गांधींच्या विधानानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षालाच घेरले आहे.
 
राहुल गांधींच्या वक्तव्याची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. काहींनी त्यांना 'जयचंद' देखील म्हटले आहे. ऐतिहासिक घटनांनुसार जयचंदने मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चौहान यांच्या विरोधात पाठिंबा दिला होता.
 
लंडनमध्ये आयोजित 'आयडिया फॉर इंडिया' या परिषदेत राहुल गांधी यांनी जे मुद्दे मांडले, त्यावरून चर्चा सुरू झाली आहे.
 
आपल्या तासाभराच्या चर्चेत राहुल गांधींनी संविधान, अर्थव्यवस्था, काँग्रेसचे चिंतन शिबिर, चीन, अमेरिका अशा सर्व मुद्द्यांवर आपले म्हणणे मांडले.यावेळी राहुल गांधींनी भारताची तुलना युक्रेनच्या संकटाशी केली.
 
ते म्हणाले, "रशिया युक्रेनमध्ये जे काही करत आहे, तीच बाब चीन डोकलाम आणि लडाख परिसरामध्ये भारताला दाखवत आहे. चीनने भारतातील डोकलाम आणि लडाखमध्ये आपले सैन्य तैनात केले आहे. अरुणाचल प्रदेश आणि लडाखला भारताचा भाग मानण्यास नकार दिला आहे."
 
नुकत्याच आलेल्या एका अहवालाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीन पॅंगॉग तलावावर पूल बांधत आहे कारण चीनला काहीतरी करायचे आहे. मात्र भारत सरकार याबाबत काहीच बोलत नाही," असं राहुल गांधी म्हणाले.
 
'आरएसएसच्या विचारसरणीने संस्था काबीज केल्या'
 
मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने राज्यांचे अधिकार कमी करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
 
ते म्हणाले, "भारत हा राज्यांचा संघ आहे. भारत अशा प्रकारे बनवला गेला आहे जिथे प्रत्येक राज्याची स्वतःची ओळख आहे, धर्म आणि संस्कृती आहे. त्यांच्या जवळ बोलण्याची आणि मत मांडण्याची क्षमता आहे. भारत असा तयार झाला नाही जिथे सत्तेचे केंद्र कोणत्या एका सत्तेच्या हातात आहे. पण राज्य आणि त्यांच्या शक्तींच्या मूल्यांवर तयार झालेला देश आहे, परंतु सध्या जे काही घडत आहे ते सुनियोजित आक्रमण आहे. ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून राज्ये, संस्था कमकुवत केल्या जात आहेत. परिस्थिती अशी झाली आहे की आज राज्ये वाटाघाटी करण्याच्या स्थितीत नाहीत."
 
"विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे कि संस्था आरएसएस आणि एका विचारसरणीच्या हातात जाऊ नयेत. देशात प्रत्येक जाती, धर्माच्या लोकांना सुविधा मिळायला हव्यात, असे आमचे मत आहे. पण लोकांना जातीच्या आधारावर सुविधा मिळाव्यात, अशी आरएसएस-भाजपची इच्छा आहे."
 
"ज्यांना असं वाटत कि आम्ही भाजपशी लढत आहोत. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आम्ही एका पक्षाशी लढत नाही, तर आम्ही एका संघटनेच्या, भाजपच्या विचारसरणीने व्यापलेल्या संस्थांच्या संपूर्ण रचनेशी लढत आहोत. त्यामुळे आमच्याकडे फक्त एक पर्याय आहे तो म्हणजे लोकांकडे जाणे आणि हे फक्त काँग्रेसलाच लागू होत नाही तर सर्व विरोधी पक्षांना लागू होते."
 
'सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज'
देशात विक्रमी बेरोजगारी आहे आणि घाऊक महागाई 15% वर पोहोचली आहे पण तरीही भाजप निवडणुका जिंकत आहे आणि काँग्रेस हरत आहे. असं का?
 
त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "देशातील वाढते ध्रुवीकरण आणि भाजपचे मीडियावर पूर्ण नियंत्रण यामुळे हे घडत आहे. जर तुम्ही पाच तास भारतीय न्यूज चॅनल पाहत असाल तर त्यावर मोदी सोडून दुसरं कोणी दिसणार नाही."
 
"आम्हाला हे देखील मान्य करावे लागेल की आरएसएसने एक अशी रचना तयार केली आहे जी मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहचली आहे. आम्हाला एक रचना तयार करावी लागेल आणि 60 टक्के भाजपला मत न देणाऱ्या लोकांपर्यंत आणखी आक्रमकपणे जावे लागेल आणि हे सर्व विरोधी पक्षांना हे एकत्रितपणे करावे लागेल."
 
देशातील परिस्थितीवर ते म्हणाले, "आमच्या देशात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले आहे, बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, महागाई वाढत आहे. देशात सामाजिक समस्या येतच आहेत. त्यामुळे देशात लोकांचा विरोध वाढणार आहे, हे निश्चित आहे."
 
"त्या विरोधाचा आणि जनक्षोभाचा उपयोग विरोधक शांततापूर्ण आणि प्रभावी पद्धतीने राजकारणात सत्ताबदल घडवून आणण्यासाठी करू शकतील का? असा प्रश्न आहे. शक्यता आहे की देशात अनियंत्रित विरोधाची परिस्थिती निर्माण होईल. जसे शेजारच्या श्रीलंकेत पाहत आहोत."
 
सध्या भारताची परिस्थिती चांगली नाही, भाजपने देशभर रॉकेल शिंपडले आहे. एक ठिणगी पडली तर आपण सगळेच मोठ्या संकटात सापडू. लोकांना एकत्र आणण्याची, लोकांचा रोष आणि त्यांच्यामध्ये जी आग आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे."
 
'रशियाने युक्रेनमध्ये जी पद्धत वापरली तशीच पद्धत चीन भारतात दाखवत आहे'
जगातील उदयोन्मुख नवीन महासत्ता चीन आणि अमेरिका यांच्यात भारताने कसे वागावे.
 
या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणतात, "गेल्या शंभर वर्षांत जगासमोर एकच व्हिजन होते, ते म्हणजे मॅरीटाइम व्हिजन अर्थात सागरी विस्ताराची दृष्टी, त्याआधी जमिनीवर आधारित व्हिजन होते. पण आता पहिल्यांदाच जगासमोर दोन व्हिजन आहेत- एक चीनची टेरेस्टिअल व्हिजन (प्रादेशिक विस्ताराचे व्हिजन) आणि दुसरेअमेरिकेचे मॅरीटाइम व्हिजन (सागरी विस्ताराचे व्हिजन).
 
"सध्या चीनची बेल्ट अँड रोड प्रणाली ही खरोखरच जगाला टेरेस्टियल ट्रेडिंग सिस्टममध्ये बदलण्याची मोहीम आहे. चीनची उत्पादन प्रणाली त्यासाठी पैसे देत आहे."
 
"मी हे पाहू शकतो की चीनकडे एक व्हिजन आहे. पण निराशा ही आहे की भारत किंवा अमेरिकेकडे समान काउंटर व्हिजन नाही. चीन अनेक देशांमध्ये जाऊन म्हणतो की आम्ही तुम्हाला पायाभूत सुविधा देऊ. पैसे देत आहेत. तुमचा देश चांगला बनवण्यासाठी. अर्थातच यामागे चीनचा स्वतःचा उद्देश आहे. पण मूलभूत गोष्ट अशी आहे की ते समृद्धीच्या बदल्यात हे करत आहेत, तर पाश्चात्य देश अशी कोणतीही ऑफर न देता, चीनला थांबवा असे म्हणत आहेत."
 
भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण संबंधांवर ते म्हणाले, "आम्हा भारतीयांना गुंतागुंतींना सामोरे जाण्याची सवय आहे. जर एखादी गोष्ट भारतीय बुद्धी करू शकते, तर ती म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न सुंदरपणे सोडवणे. चीनसोबतचे आमचे संबंध खूप क्लिष्ट आहे आणि आपण त्याकडे वरवरच्या नजरेने पाहू नये."
 
"आमच्याकडे असे अनेक अधिकारी आणि परराष्ट्र धोरणांचे तज्ज्ञ आहेत जे मदत करू शकतात. पण हे तेव्हाच होईल जेव्हा पंतप्रधानांना ऐकायचे असेल. आमचे पंतप्रधान ऐकू इच्छित नाहीत आणि त्यामुळे नोकरशाहा देखील ऐकत नाहीत."
 
"रशियाने युक्रेनमध्ये काय केले, रशियाने युक्रेनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की आम्ही दोन राज्यांना आपले मानत नाही आणि तुम्ही नाटोमध्ये सामील होऊ नका, पश्चिमेसोबतचे संबंध कमी करा."
 
"फक्त या मुद्द्यावर रशियाने आंतरराष्ट्रीय सीमेचा आदर न करता युक्रेनवर हल्ला केला."
 
"आता तुम्ही समांतर तुलना पैहा. चीनने डोकलाम आणि लडाखमध्ये आपले सैन्य तैनात केले आहे. ते असेही म्हणत आहेत की आम्ही अरुणाचल आणि लडाखला भारताचा नाही तर आमचा भाग मानतो. आम्ही ही समस्या स्वीकारली पाहिजे आणि त्यासाठी स्वत: ला तयार केले पाहिजे. पण आमच्या सरकारला बोलायचे नाही. चिनी सैनिक आज भारतात बसले आहेत. त्यांना काहीतरी करायचे आहे म्हणून ते पॅंगॉग तलावावर पूल बांधत आहेत. पण सरकार बोलत नाही. ते म्हणतात मी पुन्हा पुन्हा चीनचा मुद्दा मांडतो. होय, मी चीनबद्दल बोलतो कारण मी येणाऱ्या संकटांना पाहू शकतो आणि युक्रेनमध्ये काय घडत आहे ते आम्ही पाहिले आहे."
 
उदयपूरमध्ये काय घडलं?
काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात काय चर्चा झाली आणि पक्षासाठी कोणती उद्दिष्टे ठेवण्यात आली याला उत्तर देताना ते म्हणाले, "उदयपूरमध्ये आम्ही ठरवले आहे की मीडिया आणि कम्युनिकेशन भाजपने काबीज केले आहे, त्यामुळे आम्हाला मीडिया आणि संवादाचे इतर पर्याय पहावे लागतील.
 
निधी मिळविण्याचेही नवे मार्ग शोधावे लागतील. आम्हाला जनआंदोलन उभे करावे लागेल. भारताला परत मिळवण्यासाठी हा लढा आहे. काँग्रेस कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा मोठी नाही, पण काँग्रेसकडे राष्ट्रीय दृष्टी आहे. प्रादेशिक पक्षांकडे ती स्वतःच्या राज्यांसाठी असते."
 
भाजपची प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
 
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, "एक हतबल काँग्रेस आणि त्यांचे अपयशी नेते राहुल गांधी जेव्हाही परदेशी भूमीवर जातात, मग ते लंडन, अमेरिका, सिंगापूर असोत, त्यांच्या अभिव्यक्तीतून कुठेतरी दिसून येते की आजचा काँग्रेस पक्ष 1984 पासून आजतागायत, देशाच्या राजकारणात आग लावणे, सुसंवाद बिघडवण्यामध्ये गुंतलेला आहे."
 
गौरव भाटिया पुढे म्हणाले, "लंडनमध्ये राहुल गांधी म्हणतात की भाजपने देशात रॉकेल शिंपडले आहे. राहुल गांधी जी, काँग्रेस पक्ष रॉकेल शिंपडतो. 1984 मध्ये जे हत्याकांड झाले, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हत्या घडवल्या. तेव्हा रॉकेल ओतणारे काँग्रेसचे नेते होते."
 
लोक काय म्हणत आहेत?
सोशल मीडियावर काही लोक परदेशी व्यासपीठावर अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत.
 
अभी त्रिपाठी नावाच्या युजरने ट्विटरवर लिहिले - "जयचंद हे नाव किंवा एक व्यक्ती नाही, ती एक अशी पदवी आहे. जी वेळोवेळी आपले अधिकारी निवडते, यावेळी त्यांनी राहुल गांधींची निवड केली आहे."
 
गुरिंदर संधू नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले की, "मला आठवत नाही की एखादा परदेशी नेता आपल्या देशाच्या अंतर्गत चर्चा करण्यासाठी भारतात आला होता. पण राहुल गांधी यांनी देशात असो किंवा परदेशात नेहमी आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल न बोलून भारताला कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न केला."
 
विकास नावाच्या आणखी एका युजरने लिहिले, राहुल गांधी तुम्ही परदेशी मंचावर भारत आणि भारतीयांचा अपमान करत आहात, तुमचा भाजपविरोधी अजेंडा देशातच असला पाहिजे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.