64 विद्यार्थ्यांना कोरोना
रायगड : ओडिशातील रायगड जिल्ह्यात 64 कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याचवेळी आरोग्य अधिकार्यांनी माहिती दिली की, रविवारी राज्यात कोविड-19 चे एकूण 71 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात एवढ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. वृत्तानुसार, 4 मे रोजी रायगड जिल्ह्यातील कोटलागुडा भागात असलेल्या 'अन्वेषा' नावाच्या वसतिगृहातील 257 विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाकडून RT-PCR चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये 44 विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे बिसमक्तक ब्लॉकच्या हातमुनीगुडा सरकारी हायस्कूलमध्येही कोविड-19 चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 20 विद्यार्थिनींना संसर्ग झाल्याचे आढळून आले.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, रायगडचे जिल्हा दंडाधिकारी सरोज कुमार मिश्रा म्हणाले, 'जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जास्त नाही. विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसून त्यांना वेगळे करण्यात आले आहे. वसतिगृहांमध्ये वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. याआधी एका वसतिगृहाच्या अधिकाऱ्यानेही संक्रमित विद्यार्थ्यांमध्ये कोविड-19 ची लक्षणे नसल्याचे सांगितले होते. तरीही त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. वसतिगृहात संसर्ग पसरू नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचेही सांगण्यात आले.