शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (09:50 IST)

SC-ST आरक्षण उपवर्गीकरणाला दलित संघटनांचा विरोध, आज भारत बंद

suprime court
अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात क्रिमी लेअरबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर त्याविरोधात दलित आणि बहुजन संघटनांनी आज 21 ऑगस्टरोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.
 
दलित संघटनांसह विविध राज्यातील राजकीय पक्षांनीही या बंदला समर्थन दिलं आहे.
 
बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी न्यायालयाच्या निर्णयावर सरकारकडे घटनादुरुस्ती करण्याची मागणी केली आहे तसेच आजचा भारत बंद शांततामय मार्गाने करावा ,असं आवाहन केलं आहे.
 
मायावती यांचे भाचे आकाश आनंद यांनी, भारत बंदच्या दरम्यान बसपा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या झेंड्यासह अहिंसक मार्गाने शांततामय पद्धतीने सहभागी व्हावे असं आवाहन केलं आहे.
 
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं या बंदला समर्थन दिलं आहे तर केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी हा बंद 'विरोधी पक्षांचा भारत बंद' आहे, असं म्हटलं आहे.
 
मात्र एकूण परिस्थिती पाहाता, राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत प्रशासनानं संरक्षण व्यवस्था सतर्क केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे.
 
जयपूर, बाडमेर, भरतपूर आणि डिगसह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश दिले आहे. बालोतरा जिल्ह्यात शाळा सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
 
भिलवाडा जिल्ह्यात बंदच्या दरम्यान शस्त्रं तसेच काठ्यांचा वापर करण्यास बंदी असेल. भावना दुखावतील अशी गाणी डिजेवर वाजवण्यास मनाई आहे. बुंदी जिल्ह्यात सकाळपासून दुपारी 12 पर्यंत कार्यालयं बंद असतील. जैसलमेर, भरतपूर आणि उदयपूरमध्ये इंटरनेट बंद राहील. झुनझुनू, धौलपूरसह अनेक जिल्ह्यांत दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 
परवानगी व्यतिरिक्त इतरत्र आंदोलन करण्यावर बंदी
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये 'मनाई आदेश' लागू केला असून बंद दरम्यान कोणत्याही प्रकारे हिंसा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
 
लखनौ पोलिसांनी 17 ऑगस्टपासूनच कलम 163 (पूर्वीचे 144) लागू केले आहे. हा मनाई आदेश 14 सप्टेंबरपर्यंत लागू करण्यात आला आहे.
 
लखनौ पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलंय, “परवानगीविना निश्चित करण्यात आलेले आंदोलनस्थळ सोडून कोणत्याही इतर जागी आंदोलन, निदर्शन अथवा ड्रोन शुटिंग, ट्रॅक्टर, बैलगाडीचा प्रवेश आणि घातक पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.”
 
मध्य प्रदेशात प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 
2 एप्रिल 2018 रोजी दलित संघटनांनी केलेल्या भारत बंदमध्ये अनेक ठिकाणी हिंसा झाली होती आणि मध्यप्रदेशात 6 लोकांचे प्राण गेले होते.

Published By- Dhanashri Naik