रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (00:35 IST)

दिल्ली UPSC कोचिंग सेंटर दुर्घटनेच्या सीबीआय चौकशीचे आदेश, पोलीस-प्रशासनावर न्यायालयाचे ताशेरे

दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर परिसरात 27 जुलैला एका कोचिंग क्लासच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकारणी दिल्ली उच्च न्यालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे. आतापर्यंत दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत होते.
 
पीटीआयच्या माहितीनुसार दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश मनमोहन यांनी केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) याप्रकरणी सीबीआय चौकशीदरम्यान निगराणी ठेवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
 
याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस आणि दिल्ली महानगरपालिका प्रशासनावर ताशेरेही ओढले. तळघरात पूर्ण पाणी भरेपर्यंत विद्यार्थी बाहेर का पडू शकले नाहीत? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
 
राजेंद्र नगर परिसरातील नाल्यांची अवस्था ठीक नसल्याची माहिती तुम्ही आयुक्तांना का दिली नाही? असा सवाल न्यायालायने पालिकेच्या अधिकाऱ्यांना केला.
 
दरम्यान, न्यायालयानं याप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
संसदेतही या प्रकरणी पडसाद उमटले होते. भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी संसदेत केली.
 
दुर्घटनेनंतर परिसरातील विद्यार्थ्यांची कोचिंग सेंटरबाहेर निदर्शनेही केली.
 
विद्यार्थ्यांनी दिल्ली महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
 
एका विद्यार्थ्याने ANI शी बोलताना सांगितलं की, थोड्याशा पावसानेही इथं पाणी साचतंय. दोन वर्षांपासून अशीच परिस्थिती उद्भवत आहे.
 
मृतांमध्ये एक तरुण आणि दोन तरुणींचा समावेश होता. पावसामुळं संध्याकाळी 7 च्या सुमारास इमारतीत पाणी भरू लागलं आणि त्यात विद्यार्थी अडकले.
 
यानंतर दिल्ली पोलिस आणि NDRF च्या पथकाने तळघरात अडकलेल्या विद्यार्थांना आणि इतर लोकांना बाहेर काढलं होतं.
 
कोण आहेत मृत विद्यार्थी
या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेवीन डेल्विन या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 
उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमधील श्रेया यादव दीड वर्षांपूर्वी दिल्या ओल्ड राजेंद्र नगर परिसरात राहायला आली होती.
 
श्रेया एका खासदी कोचिंग संस्थेच परीक्षेची तयारी करत होती. तिचे वडील शेतकरी आहेत. शेतीबरोबरच ते पशुपालनाचं कामही करतात. तर त्यांच्या आई गृहिणी आहेत.
 
तान्या सोनीचं कुटुंब मूळचं बिहारचं आहे. सध्या ते तेलंगणामध्ये राहतात.
 
तर नेवीन डेल्विन केरळच्या एर्नाकुलमचा रहिवासी आहे. नेवीनचे वडील केरळच्या त्रिवेंद्रममध्ये राहतात. ते निवृत्त पोलीस अधीक्षक आहेत. तर त्यांच्या आई कलाडीमध्ये प्राध्यापक आहेत.
 
ज्या कोचिंग इंस्टिट्यूटमध्ये अभ्यासासाठी हे विद्यार्थी बसलेले होते त्या राऊ कोचिंग इंस्टिट्यूटने निवेदन प्रसिद्ध करत घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
दुसऱ्या एका विद्यार्थ्याने म्हटलं की, या भागात 80 टक्के लायब्ररी तळघरातच आहेत.
 
सहा दिवसांआधी पटेल नगर येथे एका विद्यार्थ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.
 
विद्यार्थ्यांच्या विरोध प्रदर्शनानंतर अतिरिक्त DCP सचिन शर्मा घटनास्थळी पोहचून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
“या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 11 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. यातील चार जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. असं या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल,” अशी खात्री त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
DCP सेंट्रल एम. हर्षवर्धन यांच्यानुसार, “कोचिंग सेंटरच्या तळघरातून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आहे आहेत, तर बाकी लोकांना इमारतीच्या वेगवेगळ्या भागातून बाहेर काढण्यात आलयं. ही एक गुन्हेगारी घटना आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
 
डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून इतर लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाऊ शकतं.
बीबीसीची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. ते तिथे हजर असणाऱ्या लोकांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलले.
 
दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, "ज्या भागात हे कोचिंग सेंटर आहे, तिथे पाणी साचण्याची समस्या जुनीच आहे. या भागात सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन नाही आणि नियमितपणे साफ-सफाई देखील केली जात नाही."
 
या भागातील एका कोचिंग इस्टिट्युटमध्ये शिकलेल्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, "इथे विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था देखील चांगली नाही. जागोजागी वीजेच्या तारा पडत असतात. यामुळे विजेचा धक्का लागण्याचा धोकाही असतो."
 
त्याचं म्हणणं होतं की, "इथं भाड्यानं मिळणाऱ्या खोल्यांसाठी द्यावं लागणारं ब्रोकरेज (दलाली) देखील खूपच जास्त आहे. इथे चांगल्या सुविधा नाहीत. मात्र नाईलाजानं विद्यार्थ्यांना या भागात राहावं लागतं."
आशा या कोचिंग सेंटरजवळ खाण्या-पिण्याच्या वस्तूंचं दुकान चालवतात. त्यांनी सांगितलं की, शनिवारी पावसामुळे कोचिंग सेंटर जवळच्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं.
 
त्यांनी सांगितलं, "शनिवारी संध्याकाळी सहा वाजता इथे पाऊस पडल्यानंतर खूप पाणी साचलं होतं. थोड्या वेळानं एक कार खूप वेगानं आली आणि त्यामुळे रस्त्यावर साचलेलं पाणी वेगानं कोचिंग सेंटरच्या तळघरात शिरलं."
 
"कार गेल्यानंतर पाणी इतक्या जोरात कोचिंग सेंटरमध्ये शिरलं की त्यामुळे सेंटरचं गेट तुटलं. गेट तुटल्यामुळे पाणी आत शिरलं."
 
ही दुर्घटना घडल्यापासून या भागात कोचिंग सेंटरच्या बाहेर विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू आहेत.
 
या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. ते दिल्ली महानगरपालिकेच्या विरोधात घोषणा देत आहेत.
 
संतप्त झालेले अनेक विद्यार्थी कोचिंग सेंटरकडे जात होते. मात्र पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखलं होतं.
 
'दिल्लीत अशी घटना घडणं लाजिरवाणं'
एका विद्यार्थिनीनं बीबीसीला सांगितलं, "असं सांगण्यात येतं आहे की तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यानं किंवा प्रशासनानं मृतांचा अधिकृत आकडा सांगितलेला नाही."
 
तिने सांगितलं, "या दुर्घटनेसंदर्भात सर्वात वाईट वर्तणूक कोचिंग सेंटरच्या मालकांची आणि शिक्षकांची आहे. इतकी मोठी दुर्घटना घडली, मात्र इथे एकही शिक्षक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उभा राहिलेला नाही. इथे कोणीच आलेलं नाही."
 
तिने सांगितलं की, या भागातील अनेक इमारतींच्या तळघरात ग्रंथालय (लायब्ररी) बनवण्यात आले आहेत.
 
ती म्हणाली, "या बाबतीत राजकीय नेते, महानगरपालिकेचे अधिकारी आणि जमीन मालक यांचं संगनमत आहे. या भागात 90 टक्के ग्रंथालयं तळघरात आहेत. विद्यार्थी छोट्या खोल्यांमध्ये राहतात. या खोल्यांना खिडक्या नाहीत. तिथे गुदमरल्यासारखं होतं."
 
"पायाभूत सुविधा नाहीत, लोकांनी रस्त्यावर अतिक्रमणं केलेली आहेत. दिल्ली महानगरपालिकेला हे सर्व दिसत नाही का? ही दुर्घटना राजकीय नेते, दिल्ली महानगरपालिका आणि कोचिंग सेंटरच्या मालकांमधील संगनमताचा परिपाक आहे."
कोचिंग सेंटरच्या वृत्तीबाबत आक्षेप
आणखी एका विद्यार्थिनीनं कोचिंग सेंटरच्या मालकांच्या वृत्तीबाबत सांगितलं की, "ते लोक आमच्याशी बोलत नाहीत. सर्वसाधारणपणे त्यांना भेटणं खूप अवघड असतं. अशा परिस्थितीत त्यांना आमच्या अडचणी सांगता येतील अशी अपेक्षा कशी करता येणार."
 
तिनं सांगितलं की, "या परिस्थितीशी संघर्ष करत असलेल्या विद्यार्थ्यांशी कोणीही बोलत नाही. हे दररोज घडतं. आमच्यावर कारवाई तर होणार नाही ना, या भीतीने आम्ही आमच्या खोल्यांमध्ये बसतो."
दुर्घटनेमुळे अनेक विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यातील देवांश राजपूत या विद्यार्थ्यांने बीबीसीला सांगितलं की, "दिल्ली हे काही सर्वसाधारण शहर नाही. ही देशाची राजधानी आहे. केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो की स्थानिक प्रशासन असो, या प्रकारच्या दुर्घटनेची त्यांना लाज वाटली पाहिजे. राजधानीत अशा प्रकारची दुर्घटना होते आहे."
 
त्याने सांगितलं, "मागील वर्षी कोचिंग सेंटरमध्ये आग लागल्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरील खाली उड्या माराव्या लागल्या होत्या. मागील आठवड्यात विजेचा धक्का लागल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला."
 
"कोचिंग सेंटरवाले लाखो रुपयांचं शुल्क घेतात. ते विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना स्वप्नं दाखवतात की, त्यांची मुलं अधिकारी-कलेक्टर होतील. मात्र ते मुलांना त्यांच्या घरी जिवंत देखील परत पाठवू शकत नाहीत. कोचिंग सेंटर असो की प्रशासन, कोणीही याबाबत बोलत नाही. आतापर्यत इथे किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती कोणीही देत नाही. हा दुर्घटनेत झालेला मृत्यू नाही तर खून आहे."
 
घटनेवरून राजकारण तापलं
ओल्ड राजेंद्र नगर येथील घटनेवरून दिल्लीतील राजकारण तापलं आहे.
 
भाजपने या घटनेसाठी आम आदमी पार्टीला जबाबदार ठरवलंय. सध्या दिल्ली सरकार आणि दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाची सत्ता आहे.
 
विद्यार्थी या ठिकाणी आपलं भविष्य घडविण्यासाठी आले होते, असं म्हणत भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी म्हणाल्या की, येथील रहिवासी एका आठवड्यापासून वारंवार नालेसफाईची मागणी करत होते.
आम आदमी पार्टीनेही या घटनेवरून दीर्घ काळापासून दिल्ली महापालिकेची कमान सांभाळणाऱ्या भाजपवर पलटवार केलाय.
 
या परिसरातील आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक हे घटनास्थळी पोहचून म्हणाले की, "ही घटना जिथं घडली तो एक सखल भाग आहे. तिथे नाला किंवा गटार फुटल्याने अचानक पाणी आपलं असावं."
 
पाठक पुठे म्हणाले, "यावर राजकारण करण्याची गरज नाही. 15 वर्षे भाजपचे नगरसेवक असताना त्यांनी येथे गटारं का स्वच्छ केली नाही, हेही भाजपने सांगावे. सर्व नाले काही एका वर्षात बांधता येत नाहीत."
 
दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी या प्रकरणी घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हटलंय.
 
दिल्ली सरकारने दिले चौकशीचे आदेश
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून 24 तासांत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आतिशी म्हणाल्या.
 
राजधानी दिल्ली येथील मुखर्जी नगर आणि राजेंद्र नगर हा भाग UPSC कोचिंग सेंटरसाठी प्रसिद्ध आहे.
या भागातील डझनभर कोचिंग सेंटरमध्ये युपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी क्लास घेतले जातात.
 
देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे शिकवणीसाठी येतात. त्यामुळे या भागात विद्यार्थ्यांची गर्दी असते.
 
गेल्या वर्षी जून महिन्यात मुखर्जी नगर येथेही एका कोचिंग सेंटरमध्ये आगीची एक घटना घडली होती, ज्यात एका विद्यार्थीने छतावरून उडी मारून आपला जीव वाचवला होता.
Published By- Priya Dixit