गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2023 (23:32 IST)

डेव्हिल ट्री: 'या' झाडांची विशाखापट्टणममधल्या लोकांनी दहशत घेतली आहे, कारण...

dreem tree
विशाखापट्टणम मधील रस्त्यांच्या दुतर्फा आणि दुभाजकांमध्ये सुशोभीकरणासाठी वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र, या झाडांचा स्थानिक लोकांनी धसका घेतलाय.एवढंच नाही तर ही झाडं काढून टाकावीत यासाठी लोकांनी विशाखापट्टणम महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. या झाडांना 'डेव्हिल ट्री' असं म्हटलं जातंय.
 
पण विशाखापट्टणम मध्ये ही 'डेव्हिल ट्री' कुठून आली? महापालिकेने अशी झाडं संपूर्ण शहरात का लावली आहेत?
 
उंचच उंच आणि सदाहरित असणारी ही झाडं काढावीत अशी तक्रार का केली जाते आहे? शहरवासीयांना घाबरवणाऱ्या या झाडांबद्दल वनस्पतिशास्त्रज्ञ काय म्हणतात?
 
नेमकी अडचण काय आहे?
या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते. संबंध वर्ष ही झाडं हिरवीगार असतात. हिवाळ्यात या झाडाला फुलांचा बहर येतो.
 
ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये तीन-चार टप्प्यांत या झाडाला फुलं येतात. मात्र दिवसभर या फुलांचा उग्र वास येत असतो.
 
हा उग्र दर्प सहन होत नसल्याने शहरातील रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. या झाडामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
 
विशाखापट्टणम शहरातील निवृत्त कर्मचारी वासुदेव राव यांच्या घरासमोर हे झाड आहे. झाड दुमजली इमारती एवढं उंच वाढलं असून
 
या झाडातून येणाऱ्या उग्र दर्पामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं वासुदेव राव यांनी सांगितलं.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "हिवाळ्यात झाडातून येणाऱ्या उग्र वासामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. माझे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे. आमच्या मुलांनाही याचा त्रास होतोय. मी महापालिकेकडे याची तक्रार केली आहे. पण त्यांनी ही झाडं काढून टाकण्यास नकार दिला आहे."
 
ही झाडे लहान असताना काही अडचण नव्हती. पण गेल्या दोन वर्षांपासून आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्याचं टीव्ही मेकॅनिक श्रीनिवास राव यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, "झाडांना फुलं येताना आणि ती झडून जाईपर्यंत आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. या हिवाळ्यात तीन-चार वेळा झाडाची फुलं झडल्याने रस्त्यावर कचरा झाला आहे. जीव्हीएमसीकडे तक्रार करूनही ही झाडं काढली जात नाही. ही झाडं आम्ही स्वतः काढायची तर ती खूप मोठी आहेत, त्यामुळे ते शक्य नाही."
 
ही झाडं शहरात कशी आली?
2014 मध्ये 'हुदहुद' चक्रीवादळाने विशाखापट्टणम शहरात कहर केला होता. शहर उद्ध्वस्त झाल्यात जमा होतं. यावेळी शहरातील जवळपास 70 ते 80 टक्के झाडं उन्मळून पडली होती.
 
त्यामुळे शहरात पुन्हा झाडं लावण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सरकारने विविध प्रकारची झाडे आणून वाढवली. अशा प्रकारे या 'डेव्हिल ट्री'चं ही रोपण करण्यात आलं.
 
वनविभाग आणि व्हीएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सर्वत्र वृक्षारोपण करण्यात आले. या गोष्टीला आज सात वर्षे झाली आहेत.
 
आज या झाडांची पूर्ण वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत या झाडांवर मोठ्या प्रमाणात फुलांचा बहर येत असल्याने लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं स्थानिक सांगतात.
 
सततच्या उग्र वासाने लोकांना मळमळ, डोकेदुखी आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे.
 
वनस्पतिशास्त्र विभागाने माहिती दिल्याप्रमाणे, "डेव्हिल ट्री नावाच्या या झाडांचे वैज्ञानिक नाव अल्स्टोनिया स्कोलारिस आहे. हे झाडं सदाहरित वर्गातील असून वेगाने वाढतं. या झाडाला वाढीसाठी कमीत कमी पाण्याची आवश्यकता असते.
 
शहरात लवकरात लवकर हिरवळ वाढावी यासाठी 500,000 हून अधिक रोपं लावण्यात आली आहेत. त्यांना सप्तपर्णी किंवा एडकुला वृक्ष असंही म्हणतात."
 
हिवाळ्यात या झाडांना खूप उग्र वास येतो. या झाडांच्या फुलांमधून बाहेर पडणारे परागकण हवेत मिसळतात आणि श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते. पण या झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहेत. म्हणूनच ही झाडं काढून टाकणं योग्य नसल्याचं वनस्पती शास्त्रज्ञ म्हणतात.
 
हे झाड चांगलं की वाईट?
वनस्पती शास्त्रज्ञ सांगतात की, शहराच्या अनेक भागातील लोकांनी या झाडांविरोधात तक्रारी केल्या आहेत.
 
मग ही झाडं ठेवावीत की काढून टाकावीत या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बीबीसीने तेलंगणातील सातवाहन विद्यापीठ आणि आंध्र विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
 
आंध्र विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून कार्यरत असलेल्यांनी या झाडांवर संशोधन केलं आहे. डॉ. के. व्यंकटरमण हे त्यापैकीच एक आहेत.
 
ते सांगतात, "हे झाड आपल्या देशात जलद आणि नैसर्गिकरित्या वाढते. त्यासाठी जास्त ाण्याची गरज नसते. या झाडाला कोणत्याही देखरेखीची किंवा काळजीची आवश्यकता नसते. म्हणून हिरवळ आणि सुशोभीकरणासाठी महापालिकेने या झाडांची निवड केली. हुदहुद चक्री वादळानंतरच ही झाडं शहरात लावण्यात आली. परंतु राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या किंवा दाट लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी अशी झाडं लावणं चांगलं आहे. कारण काही लोकांना आधीपासूनच आरोग्याच्या समस्या असतात, आणि झाडातून येणार्‍या तीव्र वासामुळे आणखीनच भर पडण्याची शक्यता असते."
आपल्या घरासमोर किंवा रस्त्याच्या दुतर्फा उग्र वास येणारं झाड असल्यावर आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवतात यावर डॉ. के. व्यंकटरमण सांगतात की, "यापैकी शेकडो झाडे एकाच ठिकाणी लावली आहेत. या झाडाला येणारी फुलं गुच्छात उमलतात. प्रत्येक फुलातून ऑस्मोफॉर्म नावाचं रसायन बाहेर पडतं. त्यामुळे उग्र वास येतो. पण कळीच्या अवस्थेतच फुलं तोडल्यास ही समस्या उद्भवणार नाही. मग या झाडाचा वास येणार नाही. केवळ हिवाळ्यातच हा प्रश्न उद्भवतो."
 
हे आहेत या झाडाचे उपयोग...
तेलंगणा येथील सातवाहन विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाचे डॉ. नरसिंहमूर्ती यांनी या झाडाचे उपयोग सांगितले.
 
ते म्हणाले की, या झाडाला येणाऱ्या उग्र वासामुळे डेव्हिल ट्री म्हटलं जातं, परंतु प्रत्यक्षात या झाडाचे अनेक उपयोग आहेत.
 
"या झाडांची पानं जाड असतात. वाहनांमधून होणारे प्रदूषण यामुळे नियंत्रित होते. हे झाड वर्षभर हिरवेगार असते. त्यामुळे जास्त ऑक्सिजन मिळतो. उन्हाळ्यात या झाडापासून सावली मिळते. त्यावर पक्षी घरटी बांधतात. त्याच्या लाकडापासून फरशा आणि माचिस बनवले जाते."
 
डॉ. नरसिंहमूर्ती म्हणाले, "फुलं एकाचवेळी उमलल्याने थोडा वास येऊ शकतो. त्यामुळे सायनस आणि ब्राँकायटिस सारख्या आजारांनी ग्रस्त लोकांना त्रास जाणवू शकतो. त्यापलीकडे या झाडामुळे कोणतीही अडचण येत नाही."
 
काय म्हणतात महापालिका अधिकारी...
ही झाडं बहुतेक विशाखापट्टणमच्या एनव्हीपी कॉलनी, उषोदय जंक्शन, जीव्हीएमसीच्या आजूबाजूच्या भागात, अक्कयापलेम आणि राष्ट्रीय महामार्ग दुभाजकांमध्ये लावली आहेत.
 
ही झाडं तोडण्यासाठी या भागातील लोकांनी जीव्हीएमसीकडे तक्रारी केल्या आहेत.
 
"या झाडामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. मात्र, या झाडांमुळे लोकांना श्वसनाचा त्रास, खोकला होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. दमा, क्षयरोग आणि हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे."
 
यावर जीव्हीएमसीच्या फलोत्पादन विभागाचे अधिकारी दामोदर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या झाडांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही.
 
पण लोकांच्या तक्रारींमुळे आम्ही ही झाडं तोडणार आहोत. त्याच्या जागी कडुलिंबाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलं आहे. मात्र, अलीकडच्या काळात या झाडांबाबतच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. लोकांनी स्वेच्छेने ही झाडे काढली तरी त्याच्या जागी इतर झाडे लावावीत. यासाठी जीव्हीएमसी त्यांना नव्या रोपांचा पुरवठा करेल."
 
यापुढे ही झाडे लावू नयेत का?
ही झाडे पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा खबरदारी घेऊन ती जपली पाहिजेत असं वनस्पती शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
 
या प्रकारची झाडे लावण्याआधी संस्था, सरकार आणि महामंडळाने काही खबरदारी घेतल्यास झाडे उपयोगी पडतील असं त्यांचं म्हणणं आहे.
 
आंध्र विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागाचे पोस्ट डॉक्टर फेलो के. प्रकाश राव म्हणाले.,
 
कोणतीही संस्था जेव्हा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करते तेव्हा काही अडचणी येतात का? ती झाडे किती उपयुक्त आहेत याबाबत वनस्पतिशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा.
त्या झाडांना भविष्यात फुले किंवा फळे येतील का? त्यातून काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे का? जाणून घ्यायला हवे.
आता ज्या ठिकाणी जास्त रोपे लावली आहेत, त्या ठिकाणी येत्या काळात रहिवासी क्षेत्र झाल्यास समस्या निर्माण होणार नाहीत अशा रोपांची निवड करावी.
रोपं लावताना त्या क्षेत्रासाठी योग्य आहेत का आणि तेथील हवामानाचा समतोल साधता येईल का हे देखील जाणून घेतले पाहिजे.
विशाखापट्टणमचे डॉ. कुटीकुप्पाला सूर्य राव बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "या झाडामुळे आजार होतात असा निष्कर्ष काढणारा कोणताही अभ्यास नाही. झाडांचे परागकण झाडांवरून येणाऱ्या वाऱ्यात मिसळतात. ही हवा जेव्हा फुफ्फुसात जाते किंवा शरीराला स्पर्श करते तेव्हा व्यक्तीमध्ये काही बदल होतो का? अशा गोष्टींवर संशोधन व्हायला हवे. त्यामुळे ही झाडे चांगली नाहीत असं आम्ही सध्या म्हणू शकत नाही."
 
Published By- Priya Dixit