सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (10:19 IST)

गुजरातच्या कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू

गुजरातमधल्या भरूच शहरातल्या कोव्हिड रुग्णालयात लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास पटेल वेल्फेअर रुग्णालयात आग लागली. आयसीयू विभागात ही आग लागल्याचं रुग्णालय अधिकाऱ्यांनी सांगितलं. काही रुग्णांवर व्हेंटिलेटरच्या माध्यमातून उपचार सुरू होते.
 
रुग्णालयाला आग लागल्याचं कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत आयसीयू विभागाचा दरवाजा वेढला गेल्याने खिडक्या तोडून अडकलेल्या माणसांची सुटका करण्यात आली.
 
आतापर्यंत या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेतून सुटका करण्यात आलेल्या रुग्णांना अल महमूद रुग्णालय, भरूच सिव्हिल रुग्णालय, सेवाश्रम रुग्णालय, गुजरात हॉस्पिटल अशा ठिकाणी हलवण्यात आलं. कोव्हिडची सर्वसाधारण लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांवरही उपचार सुरू झाले आहेत.
 
आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अथक मेहनतीनंतर अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत आयसीयू विभाग जळून खाक झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
दुर्घटनेची बातमी कळताच भरूच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.