एकाच कुटुंबातील 5 जणांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सर्व लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या थरवाई येथील खैवाजपूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये दाम्पत्यासह त्यांची मुलगी, सून आणि 2 वर्षांची नात यांचा समावेश आहे. सर्वांवर धारदार शस्त्रांनी वार करून जीवे मारण्यात आले.
हल्ला केल्यानंतर मारेकऱ्यांनी घरातील एका खोलीला आग लावली होती. सकाळी घरातून धूर निघत असल्याचे पाहून लोकांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये रामकुमार यादव (55), त्यांची पत्नी कुसुम देवी (52), मुलगी मनीषा (25), सून सविता (27) आणि नात मीनाक्षी (2) यांचा समावेश आहे.
तर दुसरी नात साक्षी (5) जिवंत आहे. ही हत्या कोणी व का केली याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. पोलीस अधिकारी घटनास्थळी असून तपास सुरू आहे.