शुक्रवार, 17 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2026 (15:03 IST)

धक्कादायक! नातवाने थार पार्क करताना अचानक पडला रिव्हर्स गिअर; भिंत आणि गाडीच्या मध्ये चिरडून आजीचा जागीच मृत्यू

death
फर्रुखाबाद: उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरच्या अंगणात थार (Thar) गाडी पार्क करत असताना झालेल्या एका भीषण अपघातात एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपल्या घराचा मुख्य दरवाजा (गेट) लावण्यासाठी बाहेर उभी होती. त्याच वेळी तिचा नातू घराच्या आत थार गाडी पार्क करण्याचा प्रयत्न करत होता. गाडी पार्क करत असताना अचानक गाडीला 'बॅक गिअर' लागला आणि गाडी वेगाने पाठीमागे आली.
 
गाडी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून महिला घाबरली आणि तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिने गाडी थांबवण्याचा प्रयत्नही केला, मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने ती स्वतःला वाचवू शकली नाही. काही सेकंदातच ती गाडी आणि मागच्या भिंतीच्या मध्ये चिरडली गेली.
 
कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर:
महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्य तातडीने धावून आले. त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण गंभीर जखमी झाल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. एका छोट्याशा चुकीमुळे नातवाच्या डोळ्यादेखत त्याच्या आजीचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
पोलीस तपास सुरू:
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा एक अपघात असल्याचे दिसून येत आहे. तरीही, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 
या घटनेमुळे वाहन चालवताना आणि विशेषतः रिव्हर्स घेताना किती काळजी घेणे आवश्यक आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.