खुल्या मैदानात, मोकळ्या जागेत शाळा भरणार
२३ नोव्हेंबरपासून नववी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. चाळीस मिनिटांचे चार तासच भरणारी ही शाळा खुल्या मैदानात, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याची मुभा शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनास दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोकळ्या वातावरणात शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे. चाळीस मिनिटांची चार तासच शाळा होणार आहे. शाळेला मैदान किंवा मोकळी जागा असल्यास हे वर्ग खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याचीही मुभा शाळा व्यवस्थापनास दिली आहे. स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवसआड करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.