मध्यरात्री २० वर्षांच्या नातीने क्रिकेट बॅटने डोक्यात वार करून ७५ वर्षीय आजोबां संपवले; कारण ऐकून पोलीसही सुन्न!
Indore Crime News मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका २० वर्षीय मुलीने क्रिकेट बॅटने हल्ला करून आपल्या ७५ वर्षीय आजोबांची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी नातीच्या दाव्यानुसार, १० वर्षांपूर्वी तिच्या आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले होते आणि त्या घटनेमुळे तिच्या मनात राग होता. पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीला अटक केली आहे. मुलीचे तिच्या आई-वडिलांशी भांडण झाले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थिनीचे वडील चार्टर्ड अकाउंटंट असून ते महालक्ष्मी नगरमध्ये राहतात. शनिवारी रात्री, घरातील किरकोळ वादावरून तिचे तिच्या आई-वडिलांशी भांडण झाले. संतापलेल्या मुलीने पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या बुलेट बाईकवरून क्रिकेट बॅट घेऊन स्कीम ५१ मधील तिच्या आजी-आजोबांच्या घरी पोहोचली. घरात शिरताच, गाढ झोपेत असलेल्या आजोबांच्या डोक्यावर तिने बॅटने वारंवार प्रहार केले.
हल्ल्याच्या वेळी आजीदेखील तिथेच झोपलेल्या होत्या. अचानक ओरडण्याचा आवाज ऐकून आणि रक्ताने माखलेले शरीर पाहून, कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ सांवर रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर आजोबांना मृत घोषित केले.
नातेवाईकाच्या घरातून अटक
डीसीपी झोन १ नरेंद्र सिंह रावत यांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा केल्यानंतर आरोपी विद्यार्थिनी जवळच्याच एका नातेवाईकाच्या घरी गेली, जिथे त्याच रात्री एअरड्रोम पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. रविवारी जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
नातीने आजोबांचा जीव का घेतला?
चौकशीदरम्यान, मुलीने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती फक्त १० वर्षांची होती, तेव्हा तिचे आजोबा, जे विशेष सशस्त्र दलात (SAF) निवृत्त होते, त्यांनी तिचा विनयभंग केला होता. सार्वजनिक बदनामी आणि कौटुंबिक मानहानीच्या भीतीने तिने ही घटना कोणालाही सांगितली नाही, पण तिच्या मनात द्वेष खदखदत होता. पोलीस आता आरोपी मुलीच्या दाव्यांची कसून चौकशी करत आहेत. १० वर्षांपूर्वी अशी घटना खरोखरच घडली होती का, किंवा या वादासंदर्भात कुटुंबात यापूर्वी काही तक्रारी किंवा पंचायती झाल्या होत्या का, हे ते निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
