बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (15:59 IST)

खाणीत भूस्खलन अपघातात, 2 ठार, काही जखमी, अनेक बेपत्ता

हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील दादम खाण परिसरात शनिवारी भूस्खलनामुळे अर्धा डझन डंपर ट्रक आणि काही मशीन दबल्याने आतापर्यंत किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, तर अनेक जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरियाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलालही घटनास्थळी पोहोचले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा नेमका आकडा मी सध्या देऊ शकत नाही, असे मंत्री म्हणाले. डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करू.
 
जेपी दलाल म्हणाले की, आतापर्यंत तीन जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अजून 3-4 लोक असू शकतात. अडकलेल्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
भूस्खलनाच्या वेळी सुमारे अर्धा डझनडंपर ट्रक आणि काही मशीन ढिगाऱ्याखाली अडकल्या गेल्या. या घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
 
बेपत्ता लोकांची नेमकी संख्या शोधण्यासाठी पोलीस ठेकेदार आणि घटनास्थळी उपस्थित लोकांकडून माहिती गोळा करत आहेत. यासोबतच पोलीस मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
 
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ट्विट केले की, "भिवानीतील दादम खाण परिसरात झालेल्या दरड कोसळण्याच्या दुर्दैवी दुर्घटनेने दु:ख झाले आहे. बचाव कार्य आणि जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठी मी स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे."