गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By BBC|
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (16:19 IST)

दिल्ली अधिक सुंदर करण्यासाठी मोदींच्या आशीर्वादाची गरज-अरविंद केजरीवाल

arvind kejariwal
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. 250 जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याने दिल्ली महापालिकेत आपचा महापौर बसणार, हे स्पष्ट झालं आहे. आज सकाळी मजमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढाई सुरू होती.
 
कधी आप तर कधी भाजप आघाडीवर असल्याचं सुरुवातीला दिसून आलं. मात्र दुपारनंतर आपने मुसंडी मारत भाजपला मागे टाकलं.
 
दरम्यान, बहुमताचा आकडा गाठल्याचं कळताच आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक कार्यकर्ते आपल्या पक्ष कार्यालयाबाहेर जमून जल्लोष करत असल्याचं दिसून आलं.
 
ताज्या निकालानुसार आप ने 126 जागांवर विजय मिळवला होता. त्याशिवाय आप आणखी आठ जागांवर आघाडीवर आहे.
 
भाजपाला 97 जागांवर विजय मिळवता आला. ते अद्यापही सहा जागांवर आघाडीवर आहे.
 
या निकालाविषयी बोलताना भाजप नेते प्रवेश वर्मा म्हणाले, “अरविंद केजरीवाल किती खोटं बोलतात हे दिल्लीकरांनी पाहिलं आहे आणि भाजपाला मतं दिली आहेतय.”
 
दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले, “बीजेपी ने चांगली लढत दिली आहे. आम आदमी पार्टी आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. ते म्हणाले होते की बीजेपील फक्त 20 जागा मिळतील आणि ते 230 जागांवर विजय मिळवतील. ही अटीतटीची लढत होतीय. निवडणुकीचे निकाल काहीही लागू शकतात आणि भाजपला अजुनही विजयाची आशा आहे.”
 
आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली, “दिल्लीतला चिखल स्वच्छ झाला आहे. भाजपने तो केजरीवालांवर फेकण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही दिल्लीला आणखी चांगलं शहर करू”  
 
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं.
 
दिल्ली अधिक सुंदर करण्यासाठी आम्हाला पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद हवेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
दिल्ली महानगरपालिकेच्या 250 प्रभागांसाठी रविवार (4 डिसेंबर) रोजी मतदान यंत्राद्वारे मतदान पार पडलं होतं.
 
दिल्ली महानगरपालिकेच्या एकत्रीकरणानंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत आहेत.
 
पूर्वी उत्तर दिल्ली महानगरपालिका, दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली अशा तीन महानगरपालिका याठिकाणी अस्तित्वात होत्या.
दिल्ली महापालिकेत एकूण 1 कोटी 46 लाख 73 हजार 847 मतदार आहेत. त्यांच्यासाठी एकूण 13 हजार 665 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.
 
मतदानात दिल्ली येथे फारसा उत्साह दिसून आला नव्हता. एकूण 50 टक्क्यांच्या आसपास मतदान निवडणुकीत झालं होतं.
यावेळी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या सोनमनं ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं, "रस्ते, महिलांची सुरक्षा, पाणी हे मुद्दे मी मतदान करताना विचारात घेतले आहेत. लोकांनी बाहेर पडून मतदान केले पाहिजे आणि त्यांची जबाबदारी समजून घेतली पाहिजे."
 
गेल्या निवडणुकीचा निकाल
शेवटची दिल्ली महापालिका निवडणूक 2017 मध्ये झाली होती आणि तेव्हा एकूण वॉर्डांची संख्या 272 होती.
 
यामध्ये भाजपने 181, आप 48, काँग्रेस 30 आणि इतर 11 जागा जिंकल्या होत्या. दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा हा सलग तिसरा विजय ठरला होता.
 
का आहे ही निवडणूक महत्त्वाची?
दिल्ली महानगर पालिका निवडणूक केवळ एका शहराची आहे तरी देखील या निवडणुकीला महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे अंदाजे दीड कोटी मतदार या निवडणुकीत भाग घेणार आहेत. 250 वार्डमध्ये 1300 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.
 
याआधी दिल्लीत तीन महानगर पालिका होत्या. त्या तीन महानगर पालिकांची एक महापालिका करण्यात आली आहे.
 
राष्ट्रीय राजधानीच्या महापालिकेवर कुणाची सत्ता असेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीचे निकाल 7 डिसेंबरला लागणार आहे.
 
सध्या दिल्ली महानगर पालिका निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप असंच चित्र आहे.
 
नगरसेवकांची संख्या पाहता, तिन्ही महानगर पालिकांच्या एकत्रीकरणानंतर आता दिल्ली महानगर पालिका देशातली सर्वांत मोठी महानगर पालिका बनली आहे. याआधी बृहन्मुंबई महानगर पालिका ही देशातली सर्वांत मोठी महानगर पालिका होती.

Published By- Priya Dixit